शहरातील अर्बन स्ट्रिटचे काम कासवगतीने सहा महिन्यांपासून अर्धवट कामांमुळे वाहतुकीस अडथळा व अपघातांत वाढ
पिंपरी, ता. २९ : अर्धवट खोदकाम, रस्त्याची कमी झालेली रुंदी, परिणामी पावसामुळे रस्त्यावर साचणारे गुडघाभर पाणी यामधून वाहन चालविणाऱ्यांची होणारी कसरत तर पादचाऱ्यांची दैना असे दयनीय चित्र पिंपरी-चिंचवड शहरातील अर्बन स्ट्रीट अंतर्गत सुरु असलेल्या कामाचे आहे. शिवाय कामही कासव गतीने सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मार्गाचे काम रखडले आहे. यामुळे वाहन चालकांसह स्थानिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत, आकुर्डी, निगडी-प्राधिकरण, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, चिंचवड व वाकड या भागातील पदपथ अर्बन स्ट्रीट उपक्रमांतर्गत बनविण्यात आले तर पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते पिंपरी व पिंपरी ते दापोडी अशा दोन टप्प्यात अर्बन स्ट्रिटचे कामे पूर्ण होणार आहे. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते निगडीपर्यंतच्या कामांना सुरवात झाली आहे. आंबेडकर चौकातील काम पूर्ण झाले तर मोरवाडी चौक ते चिंचवड येथील एम्पायर इस्टेटपर्यंतचे काम अर्धवट आहे. तसेच पिंपरी येथील ज्वेल ऑफ पिंपरी इमारतीसमोर मेट्रोच्या पिलरचे बांधकाम होत आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसापासून खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. एकीकडे अर्बन स्ट्रीट तर दुसरीकेडे मेट्रोचे काम यामुळे हा मार्ग अरुंद बनला असून, रस्त्याच्या बाजूला असलेल्या पार्किंगमुळे वाहने रस्त्याच्या मधोमध पार्क होत आहेत. याकारणाने वाहतुकीची समस्या उद्भवत आहे. चालकांना वाहन पार्क करण्यास जागा उपलब्ध होत नसल्याने ‘नो पार्किंग झोन’मध्ये वाहन पार्क करण्यात येत आहेत. परिणामी कामानिमित्त्त घराबाहेर पडलेल्या मंडळींना सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडीच्या समस्येचा त्रास सहन करावा लागत आहे. कामांना होणाऱ्या विलंबामुळे ठेकेदारावर कारवाई होणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
.....
अर्बन स्ट्रीट अंतर्गत पूर्ण झालेले पदपथ :
- औंध-रावेत.
- नाशिक फाटा-वाकड.
-काळेवाडी फाटा-एम. एम. स्कूल.
- चिंचवडगाव-वाल्हेकरवाडी.
-लिंकरोड, चिंचवड.
- आकुर्डी, रावेत येथील अभियांत्रिकी महाविद्यालये, गुरुद्वारा.
..........
अर्बन स्ट्रीट अंतर्गत रखडलेले पदपथ :
पिंपरी ते निगडीपर्यंतची कामे.
............
‘‘पिंपरी ते निगडीपर्यंतचे काम सहा महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे वाहन चालविणे अवघड होऊन बसले. पावसामुळे या मार्गात पाणी साचल्याने वाहनांमध्ये बिघाड होतो तर दुचाकी चालकांना कसरत करावी लागत आहे. पादचाऱ्यांच्या तर नाकीनऊ येत आहे. मात्र हे काम अद्यापर्यंतही पूर्ण झाले नाही. महापालिकेने ही कामे त्वरित पूर्ण करावी.
- मनोज शेटे, नागरिक.
.........
‘‘या मार्गातील एम्पायर इस्टेट परिसरातील बीआरटी मार्गामधून पाइप लाइन टाकण्याचे काम सुरू असल्याने विलंब होत आहे. पाइप लाइनचे काम पूर्ण झाल्यास या मार्गाचे काम पूर्णत्वास येईल.
- बापूसाहेब गायकवाड, सहशहर अभियंता, महापालिका.
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.