कोंडीमुक्त हिंजवडीसाठी हवे रस्त्यांचे जाळे

कोंडीमुक्त हिंजवडीसाठी हवे रस्त्यांचे जाळे

Published on

पिंपरी, ता. ३० : आयटीनगरी हिंजवडीतील वाहतूक समस्या कायमस्वरुपी सोडविण्यासाठी येथील रस्त्यांचे चौफेर जाळे वाढविणे गरजेचे आहे. सध्याच्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि नवे-प्रशस्त रस्ते विकसित करणे ही काळाची गरज आहे. सध्या हिंजवडीत विविध प्रशासकीय यंत्रणांमुळे सर्व रस्ते विकसित करणे अडचणीचे ठरत आहे. पण, उत्तम ‘कनेक्टिव्हिटी’शिवाय आयटी पार्कमधील परिस्थिती बदलणार नाही हे वास्तव आहे.
हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कच्या फेज-१, २ आणि ३ या तीन टप्प्यांमधील कंपन्यांमध्ये अडीच ते तीन लाख कर्मचारी रोज प्रवास करतात.
यातील बहुतांश पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, सांगवी, चिंचवड, रावेत, निगडी, पुनावळे, ताथवडे या भागांतून प्रवास करतात. त्यांना भुजबळ चौक किंवा भूमकर चौक या दोन चौकातूनच हिंजवडीकडे यावे लागते. तर पुण्यातील बाणेर, औंध, बावधन, कोथरूड येथूनही येणाऱ्या आयटीयन्सलाही याच चौकांतील रस्त्यांचाच वापर करावा लागतो. हिंजवडीतील वाढणाऱ्या रहदारीचा ताण या रस्त्यांवर येत असल्याने रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासोबतच नवीन रस्ते निर्माण करणे आवश्यक असल्याची अपेक्षा आयटी कर्मचारी व्यक्त करत आहेत.

तीस वर्षांचे नियोजन आवश्यक
गेल्या दहा वर्षांत हिंजवडी आणि परिसरात अनेक मोठ्या टाउनशिप उभ्या राहिल्या. मात्र, वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी मोठे रस्ते पुरविण्यात प्रशासन अपयशी ठरले. सध्या रस्त्यांवर केवळ डागडुजीचे काम केले जात आहे. पण, हिंजवडीत ज्या वेगाने बांधकामे सुरू आहेत, त्या दृष्टीने पुढील किमान तीस वर्षांचा विचार करून रस्त्यांचे नियोजन करणेही गरजेचे आहे. अन्यथा हीच परिस्थिती काही वर्षांनंतरही उद्भवेल अशी भीती आयटी कर्मचारी व्यक्त करत आहेत.

वाहतुकीसाठी वापरले जाणारे मुख्य रस्ते
- भुजबळ चौक - शिवाजी चौक- फेज १- माण
- भूमकर चौक- कस्तुरी चौक- लक्ष्मी चौक - विप्रो सर्कल- फेज २- फेज ३

या कच्च्या रस्त्यांचे काम आवश्‍यक (अंतर)
- हिंजवडी-माण- म्हाळुंगे रखडलेला रस्ता : ६ कि.मी.
- फेज १ ते फेज ३ प्रस्तावित उड्डाणपूल - ५ कि.मी.
- पुनावळे - मारुंजी
- लक्ष्मी चौक ते मारुंजी रस्ता
- भुजबळ चौक ते रावेत सेवा रस्त्यांचे काम
- राधा चौक - म्हाळुंगे - चांदे-नांदे रस्ता रुंदीकरण

या नवीन रस्त्यांची आवश्यकता
- फेज २ ते मारुंजी रस्ता
- फेज १ ते म्हाळुंगे दरम्यान मुळा नदीवर नवीन पूल उभारणे
- हिंजवडी ते नेरे रस्ता
- पुनावळे - ताथवडे भुयारी मार्गांचे रुंदीकरण

हिंजवडीत पुण्यातून येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या पाहता माण- म्हाळुंगे रखडलेल्या रस्त्यांचे काम त्वरित पूर्ण करणे गरजेचे आहे. तसेच हिंजवडीला मारुंजी, पुनावळे, नेरे, कासारसाई, पिंपरी-चिंचवड या भागांना जोडणारे नवीन रस्ते होणे आवश्‍यक आहे. हे काम आताच हाती घेतले, तर भविष्यात वाहतुकीचा प्रश्‍न पूर्णपणे मिटेल.
- पवनजीत माने, अध्यक्ष, ‘एफआयटीई’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com