वारी विठाई अंकासाठी

वारी विठाई अंकासाठी

Published on

विठाई अंकासाठी
---

तुकोबा केवळ पांडुरंग
भागवत धर्माचा डोलारा संत कृपेमुळे उभा राहिला आहे. ज्ञानेश्वर माउलींनी पाया रचला. नामदेवरायांनी विस्तार केला. एकनाथ महाराजांनी खांब दिला आणि तुकोबा या मंदिराचे कळस झाले आहेत. बहिणाबाई या कळसाजवळ पताका म्हणजेच ध्वज रुपाने फडकत आहेत.
- अभय महाराज जगताप

इ. स. १६०८ ते १६५० अशा अवघ्या ४२ वर्षांच्या आयुष्यामध्ये तुकोबांची कीर्ती महाराष्ट्रात सर्वदूर पसरली होती. ज्ञानेश्वर माउली, नामदेवराय काळापासून संतांनी मांडलेला, नाथांनी पुढे नेलेला विचार आता तुकोबा सांगत होते. भागवत धर्माची इमारत पूर्णत्वाला येत होती. त्यांच्या या कार्याला समाजातून अनुकूल प्रतिकूल प्रतिसाद मिळत होता. महाराजांची कीर्ती सर्व दूर पसरल्यामुळे हा प्रतिसादसुद्धा महाराष्ट्राच्या सर्व भागातून येत होता. यातूनच महाराजांच्या भोवती वारकरी सत्पुरुषांची एक प्रभावळ तयार झाली. त्यामध्ये संताजी जगनाडे, गंगाधरपंत मवाळ यांच्यासारखे सुरुवातीपासून महाराजांसोबत असणारे सत्पुरुष होते तर आधी विरोध करून नंतर भक्त झालेले रामेश्वर शास्त्री होते. महाराजांचे अनुयायी असलेल्या शिवबा कासारांच्या तुकाराम भक्तीला ही त्यांच्या घरातून काही प्रमाणात विरोध होता. त्यांच्या पत्नीने तुकोबांना त्रास देण्याचा प्रयत्नही केला होता. तत्कालीन पुरुषप्रधान व्यवस्थेत पुरुषांना कुटुंबाचा विरोध पटकन मोडून काढता येत होता. ही गोष्ट स्त्रियांसाठी तेव्हा तरी खूपच अवघड होती. अशाही अवघड परिस्थितीवर मात करून तुकोबांच्या शिष्य झालेल्या प्रसिद्ध स्त्री संत म्हणजे संत बहिणाबाई. बहिणाबाईंना झालेले तुकाराम दर्शन बघण्याआधी एक बाब स्पष्ट करायला हवी. तुकाराम शिष्या संत बहिणाबाई व ‘मन वढाय वढाय’ सारख्या प्रसिद्ध कवितांच्या कर्त्या कवयित्री बहिणाबाई या दोन्ही वेगवेगळ्या. इ. स. १६३० ते इ. स. १७०० हा संत बहिणाबाईं (कुलकर्णी-पाठक ) यांचा काळ तर इ. स. १८८० ते इ. स. १९५० हा कवियित्री बहिणाबाई चौधरी यांचा काळ. बहिणाबाईंची माहिती मिळण्याचे महत्त्वाचे साधन म्हणजे त्यांनीच लिहून ठेवलेले आत्मचरित्रपर अभंग.
संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील देगाव हे बहिणाबाईंचे जन्मस्थान. वयाच्या तिसऱ्या वर्षी तीस वर्षांच्या गंगाधर पंतांशी लग्न झाले. पुढे काही कारणामुळे आई-वडील आणि पतीसह प्रवास करत वेगवेगळी गाव बदलत त्यांना फिरावे लागले. प्रवरासंगम, पंढरपूर, शिखर शिंगणापूर करत काही काळ रहिमतपूरला राहून ही सर्व मंडळी कोल्हापूरला आली. कोल्हापूरला राहत असताना बहिणाबाईंनी जयरामस्वामी वडगावकरांची कीर्तने ऐकली. तुकोबांच्या काळातच पूर्वायुष्यामध्ये तुकोबांना अनेक विरोधक मिळाले होते, पण या सर्व विरोधातून तावून सुलाखून निघाल्यावर महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरत पसरली. या बदलत्या परिस्थितीची महाराजांना ही जाणीव होती. हा प्रसिद्धीचा अनुभव सुद्धा त्यांनी त्यांच्या पद्धतीने,
कोण सांगायास।
गेले होते देशोदेश।
नेले वाऱ्याहाती माप ।
समर्थ तो माझा बाप।।
असा शब्दबद्ध केला आहे. त्यातून महाराजांचे चहाते निर्माण झाले. जयरामस्वामी वडगावकर हे त्यापैकीच एक. त्यांच्या कीर्तनामध्ये ते तुकोबांचे अभंग सांगत. कीर्तनामध्ये तुकोबांचे चरित्र, त्यांचे अभंग ऐकले आणि बहिणाबाई मनोमन तुकोबांच्या भक्तच झाल्या.
‘तुकोबाचा छंद लागला मनासी ।
ऐकतां पदांसी कथेमाजीं ॥’
अशा शब्दात बहिणाबाईंनी आपली भावना व्यक्त केली आहे.
‘तुकोबाची पदें अद्वैत प्रसिद्ध ।
त्यांचा अनुवाद चित्त झुरवी ॥
तुकोबांच्या अभंगाचा अर्थ त्यांच्या मनात रुजत होता आणि चित्त तुकोबांच्या भेटीसाठी झुरत होते.
तुकोबाची भेटी होईल ते क्षण ।
वैकुंठासमान होये मज ॥
महाराजांची भेट झाली तर वैकुंठप्राप्तीसारखा आनंद त्यांना होणार होता. भेटीची ही ओढ दिवसेंदिवस अधिक तीव्र होत गेली.
मच्छ जैसा जळावांचोनी तडफडी ।
तैसीच आवडी तुकोबाची ॥
मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही तसे आता त्यांना तुकोबांच्या भेटीशिवाय राहणे अवघड झाले.
बहिणी म्हणे माझा जाऊं पाहे जीव ।
का हो न ये कींव तुकोबा कि ॥
अशी आर्त साद त्यांनी घातली. तरीही भेटीचा योग येत नव्हता. तेव्हा आपणच त्यांच्या भेटीसाठी योग्य नाही असेही त्यांना वाटू लागले.
बहिणी म्हणे मीच असेन अपराधी।
अशाप्रकारे मनाने त्या तुकाराममय झाल्या असताना कोल्हापूर मुक्कामीच त्यांना स्वप्नामध्ये तुकोबांचे दर्शन व अनुग्रह झाला.
कार्तिकात वद्य पंचमी रविवार।
स्वप्नीचा अनुग्रह गुरुकृपा ।।
अशी या दिवसाची नोंदही बहिणाबाईंनी आपल्या अभंगात करून ठेवली आहे.
म्याही पायावरी ठेविले मस्तक।
दिधले पुस्तक मंत्र गीता।।
बहिणाबाईंनी तुकोबांच्या चरणावर मस्तक ठेवले. महाराजांनी त्यांना पुस्तक, मंत्र व गीता ज्ञानेश्वरी दिली. काहीजण याचा अर्थ मंत्र गीतेचे पुस्तक दिले असा लावतात. मंत्रगीता नावाचे एक गीताभाष्य आहे. पण ते देहू येथील तुकाराम महाराजांचे नसून इतरांचे आहे. हे आता इतिहास अभ्यासकांनी सिद्ध केले आहे. वारकऱ्यांसाठी गीता म्हणजे अर्थात ज्ञानेश्वरी. बहिणाबाईंनी पुढे अंतकाळी सुद्धा ज्ञानेश्वरी पारायण केल्याचे उल्लेख आहेतच. पुस्तक म्हणजे वज्रसूची नावाचे उपनिषद असावे, असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॅा. सदानंद मोरे यांनी मांडले आहे. पुढे बहिणाबाईंनी या वज्रसूचीचा मराठी अभंग अनुवाद केला आहे. यातला मंत्र म्हणजे अर्थातच ‘रामकृष्णहरि’.
पुढे काही दिवसानंतर बहिणाबाई एकदा दुःखी असताना त्यांनी अन्न-पाणी वर्ज्य केले होते. तेव्हा पुन्हा एकदा त्यांना स्वप्नात तुकोबांचे दर्शन झाले. तुकोबांनी त्यांना घासही भरवला.
बहिणी म्हणे दर्शन दुसरें।
मनाच्या व्यापारें तुकोबाचें ॥
दोन वेळेस स्वप्नामध्ये तुकोबांची भेट झाल्यावर बहिणाबाईंच्या चित्तवृत्तीमध्ये पालट झाला. त्यांनी तुकोबांना गुरू मानले होते. आता त्यांना गुरुउपदेशही मिळाला होता. पण त्यांच्या पतीला हे रुचले नाही. त्यांचा पती पौराहित्य करत असे. वेदपठण सोडून इतर मार्गांबद्दल त्याच्या मनात अढी होती. शिवाय तुकोबा ब्राह्मणेतर म्हणजे त्याच्या दृष्टीने शुद्रच.
भ्रतार म्हणतसे आम्ही की ब्राह्मण।
वेदाचे पठण सदा करू ॥१॥
कैचा शूद्र तुका स्वप्नीचे दर्शनी ।
बिघडली पत्नी काय करू ॥
नामस्मरण, कीर्तन या गोष्टी त्याला ठाऊक नव्हत्या. बहिणाबाईंच्या शब्दात सांगायचे तर भक्ती त्याच्या स्वप्नातही नव्हती. बहिणाबाईंनी तर भक्तीचे आचार्य, नामाचे धारक, कीर्तनाने देह ब्रह्मरूप करणाऱ्या तुकोबांना गुरू मानले होते. तेव्हा त्यांच्यामध्ये संघर्ष झाला. पुरुषप्रधान व्यवस्थेत पतीचे पारडे जड झाले. बहिणाबाईंनी पतीचा मारही खाल्ला होता. पण आता पतीने कायमचे सोडून जाण्याची धमकी दिल्यावर त्यांनी नमते घेतले. पतीची सेवा हीच ईश्वर सेवा, असा उपदेश केला जातोच. त्यांनी त्याचे अनुसरण करायचे ठरवले. इथे पुन्हा त्यांच्या जीवनात एक चमत्कार घडल्याचे त्यांनी वर्णन केले आहे. बहिणाबाईंनी तुकोबांचा, विठ्ठलाचा, नामाचा नाद सोडायचे ठरल्यावर त्यांचा संसार सुरू असताना त्यांच्या पतीला एक आजार झाला. अनेक उपाय करूनही तो आजार बरा होत नव्हता. तेव्हा तुकोबांची निंदा केल्यामुळेच ही व्याधी झाली, हे त्यांच्या लक्षात आले. त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली. पतीने मनोमन तुकोबांची माफी मागितल्यावर आजार बरा झाला. पतीलाही तुकोबांचे महत्त्व कळले.
त्यानंतर बहिणाबाई आपल्या परिवारासह देहूल आल्या व काही काळ महाराजांच्या सान्निध्यात देहूतच राहिल्या. देहूच्या पहिल्या भेटीचे वर्णन त्यांनी अभंगात केले आहे. पती व आई-वडिलांसह त्या देहूत आल्यावर आधी इंद्रायणी स्नान केले व त्यानंतर दर्शन घ्यायला मंदिरात गेल्या. तेव्हा मंदिरामध्ये तुकोबा पांडुरंगाची आरती करत होते.
तुकोबा आरती करीत होते तेथ।
नमस्कारें स्वस्थ चित्त केलें।।
त्यांच्या पतीनेही महाराजांना नमस्कार केला. त्यानंतर ही सर्व मंडळी देहूमध्ये मंबाजीकडे राहिले. मंबाजीला त्यांची तुकाराम भक्ती, तुकोबांना गुरू मानणे रुचले नाही. त्यानेही त्यांना बराच त्रास दिला. एकदा तर त्याने वाड्यात कोणी नसताना वाड्याचे दरवाजे लावून बहिणाबाईंकडे जी गाय होती, त्या गाईला खूप मारले. त्या गाईचे वळ तुकोबांच्या अंगावर उठले, असे वर्णन बहिणाबाईंनी केले आहे. याप्रसंगी रामेश्वर शास्त्री वगैरे मंडळी तेथे आले. त्यांनी तुकोबा म्हणजे प्रल्हादाचेच अवतार आहेत असे उद्गार काढले.
तुकोबाचा पार वर्णीलसा कोण ।
कलियुगी जाण प्रल्हाद हा ।।
मंबाजीचा असा दृष्टपणा पाहिल्यावर शेवटी या कुटुंबाने त्याचे घर सोडले व ते तुकोबांच्या विठ्ठल मंदिरातच एका ओवरीत राहू लागले. देहूला काही काळ राहिल्यावर पुढे बहिणाबाई शिऊरला गेल्या. बहिणाबाईंनी अभंग रचना केली आहे. त्यामध्ये आत्मचरित्रपर अभंग लिहिले आहेत. ब्राह्मणत्व हे जन्माने नसून कर्माने ठरते अशा आशयाच्या वज्रसूची नावाच्या उपनिषदाचा मराठी अभंग अनुवाद त्यांनी केला. पुढे इ. स. १७०० मध्ये शिऊर येथे त्यांचे निर्वाण झाले.
अशा या समकालीन असणाऱ्या, प्रत्यक्ष भेटी आधीच तुकोबांचे अभंग ऐकून त्यांना गुरू मानलेल्या, भेटीसाठी ध्यास घेतलेल्या, प्रसंगी पतीचा मार सहन करणाऱ्या व नंतर तुकोबांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेल्या बहिणाबाईंचे तुकाराम दर्शन साहजिकच महत्त्वाचे ठरले आहे.
बहिणाबाईंनी तुकोबांची कीर्ती जेव्हा ऐकली तेव्हा अभंगाच्या वह्या पाण्यात तरल्याबद्दलची कथा सर्वतोमुखी झाली होती. त्यामुळे,
तेरा दिवस ज्याने वह्या उदकात।
घालुनिया सत्य वाचविल्या ।।
महाराष्ट्र शब्दात वेदांतिचे अर्थ ।
बोलिला लोकात सर्वद्रष्टा ॥
असा उल्लेख त्यांनी केला आहे. इथे तुकोबांना सर्वद्रष्टा असे म्हटले आहे. द्रष्टा म्हणजे पुढचे बघणारा, दूरदर्शी. त्या म्हणतात सर्वद्रष्टा तुकोबांनी मराठी वेदांताचा अर्थ सांगितला आहे. तुकोबा आणि विठोबा यांच्यामध्ये भेद नाही अशी त्यांच्या मनाची साक्ष त्यांनी अभंगात सांगितली आहे. तुकोबांची बुद्धी त्यांना पांडुरंग स्वरूप वाटते.
तुकोबाचे हात लिहिताती जे जे ।
ते ते ते सहजे पांडुरंग।।
तुकोबांनी लिहिलेली अक्षरे, अभंग सुद्धा त्यांना पांडुरंगरूप वाटतात. देहूमध्ये त्यांनी तुकोबांची जे कथा कीर्तन ऐकले त्याचे वर्णन त्यांनी,
तुकोबाची कथा वेदांतील अर्थ।
पावे माझे चित्त समाधान।।
अशा शब्दात केले आहे. अर्थात तुकोबांची कीर्ती सर्वत्र झाली तेव्हा सर्वच लोकांची भावना,
बहिणी म्हणे लोक बोलती सकळ।
तुकोबा केवळ पांडुरंग।।
अशी झाली होती. त्याचीही नोंद त्यांनी केली आहे.
सुप्रसिद्ध,
‘संतकृपा झाली।
इमारत फळा आली।।’
हा अभंगही संत बहिणाबाईंचा. बहिणाबाईंना तुकोबांचा जो सहवास लाभला त्यामध्ये त्यांना तुकोबांकडून सर्व वारकरी संतांचे चरित्र, त्यांचे कार्य, त्याचे वर्णन कळले असणार. त्यामुळे वारकरी संप्रदायाला इमारतीचा रूपक देताना त्यांनी त्या त्या संतांकडे नेमक्या भूमिका दिल्या आहेत. भागवत धर्माचा हा डोलारा संत कृपेमुळे उभा राहिला आहे. ज्ञानेश्वर माउलींनी पाया रचला. नामदेवरायांनी विस्तार केला. एकनाथ महाराजांनी खांब दिला आणि तुकोबा या मंदिराचे कळस झाले आहेत. बहिणाबाई या कळसाजवळ पताका म्हणजेच ध्वज रुपाने फडकत आहेत.
बहिणाबाईंचे चरित्र म्हणजे तुकोबारायांची कीर्ती त्यांच्या काळातच किती सर्वदूर पसरली होते व त्यांच्या भेटीसाठी एखादी व्यक्ती किती ध्यास घेऊ शकते याची साक्ष आहे. बहिणाबाई म्हणजे तुकोबांच्या कीर्ती ध्वजाची काठी आहेत. बहिणाबाईंचे चरित्र बघितले म्हणजे तुकोबांचा कीर्तीध्वज किती उंच फडकत आहे, याची कल्पना येते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com