विठाई संपादकीय

विठाई संपादकीय

Published on

विठाई संपादकीय
--
भक्तीचं एकात्म दर्शन

विष पोटीं सर्पा । जन भीतें तया दर्पा ॥१॥
पंच भूतें नाहीं भिन्न । गुण दुःख देती शीण ॥ध्रु.॥
चंदन प्रिय वासें । आवडे तें जातीऐसें ॥२॥
तुका म्हणे दाणा । कुचर मिळों नये अन्ना ॥३॥
- गाथा, अभंग १२६७

संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचं सार असं मांडता येईल. विष सापाच्या पोटात असतं. या विषाला, त्याच्या वासाला लोक घाबरतात. सर्वांचंच शरीर पंचमहाभुतांनी (पृथ्वी, आप-जल, तेज-अग्नी, वायू आणि आकाश) बनलेलं आहे. तथापि, ज्याचे त्याचे गुणदोष ज्याला त्याला आवडीचा-नावडीचा ठरवतात. चंदनाचा वास लोकांना आवडतो. म्हणून चंदन लोकांना आवडतं. शिजवलेल्या अन्नात एखादा दाणा कच्चा राहतो. तोच दाणा अन्न बिघडवतो. अन्नात असा एखादाही कच्चा दाणा राहू नये. अन्न चांगलं असूनही ते नावडीचं ठरू नये. सगळे चराचर पंचमहाभूतांनी निर्माण झालेलं असलं, तरी ज्याचे त्याचे गुणदोष ज्याचं त्याचं स्थान ठरवतात, असा सारांश.

एकेका अभंगात जीवन तत्वज्ञान मांडण्याचं अपूर्व कौशल्य संत तुकाराम महाराज यांच्या शब्दांत आहे. संत ज्ञानेश्वर माउली विश्वाच्या कल्याणाचं चिंतन करतात. महाराष्ट्राची संतपरंपरा भक्तीचा अखंड प्रवाह आहे. देवाकडे करुणा भाकण्याची या प्रवाहाची पद्धती महाराष्ट्रीय आहे. देवाला संबोधण्याची, कुटुंबाचा सदस्य मानण्याची स्वतंत्र प्रतिभा या संतांच्या ठायी आहे. संत जनाबाई ‘विठु माझा लेकुरवाळा’ म्हणतात. महाराष्ट्राच्या संतपरंपरेला त्या विठुरायाचे गोपाळ मानतात. केंद्रस्थानी असलेल्या विठ्ठलाला भजणे, संतांमध्ये देव पाहणे आणि सभोवतालीही देवाचे अस्तित्व जाणणे, असा महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा जीवनभाव आहे. या संतपरंपरेच्या अखंड प्रवाहाचे मंगलदायी, सजीव दर्शन म्हणजे आषाढी वारी. आळंदी-देहूत लाखो वारकरी जमतात. संतांचे दर्शन घेतात. पंढरीचा मार्ग चालू लागतात. मुखी अखंड हरिनामाचा गरज करतात. परस्परांत विठ्ठल पाहतात. वय- लिंग- जात- धर्म- गरीब- श्रीमंत अशा साऱ्या मर्यादांच्या शृंखला गळून पडतात. अवघी वारी विठ्ठलाचं प्रवाही रूप बनते. संतपरंपरेचा प्रवाह विठ्ठल बनतो. आषाढाचा वर्षाव, श्रावणाची कोवळीक या भक्तीप्रवाहाच्या, निसर्गविठ्ठलाच्या संगतीला असतो. एक अभूतपूर्व अशा प्रकारच्या आध्यात्मिकतेचं विस्फारणारं आकलन वारी करून देते. मर्त्य मनुष्याला देवत्व प्रदान करते. जीवनमूल्यांना अलौकिक भक्तीची झळाळी देते. या मूल्यांचा शाश्वत, सत्य असा गाभा वारीच्या प्रवाहात वाहात राहतो.
महाराष्ट्र महान राष्ट्र आहे. कारण, महाराष्ट्राची ही संतपरंपरा. ही वारी. काम, क्रोथ, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपुंनी मानवी संसाराचं जीवनचक्र बांधल्याचं भारतीय तत्वज्ञान सांगतं. षड्रिपुंचा त्याग करण्यासाठी तपश्चर्येचा, सर्वसंगपरित्यागाचा एक मार्ग भारतीय तत्वज्ञानात आहे. संसारचक्रात राहून षड्रिपुंचा त्याग करण्याचं संतांचं तत्वज्ञान महाराष्ट्राची भारतीय मूल्यांना मोठी देण आहे. षड्रिपुंचं समग्र आकलन करून त्यांच्याशी अक्षरशः हसतखेळत व्यवहार करून त्यांना त्यांच्या स्थानी पोहोचवण्याचा मार्ग संतांनी दाखवला. त्यासाठी विठ्ठलाची भक्ती केली. विठ्ठलाशी तंटा केला. विठ्ठलाशी मैत्री केली. विठ्ठलाला आई मानलं. विठ्ठलाला गुरू मानलं. सर्व रूपं विठ्ठलात पाहिली.
सारेच विठ्ठल आहोत, इथंपर्यंत महाराष्ट्राची संत परंपरा पोहोचते. ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ बनते. पंचमहाभुतांनी बनलेलं चराचर सर्वत्र समान आहे. तुमचे तुमचे गुणदोष ओळखा, असा संदेश ही परंपरा देते. या गुणदोषांवर संसारात राहून मात करण्यासाठी भक्तिसाधनेचा मार्ग संत दाखवतात. आईनं मुलाचं बोट पकडून रस्ता ओलांडावा, इतक्या ममतेनं संत प्रवास करतात. म्हणून विठ्ठल संतांमध्येही दिसतो आणि भक्तांतही. हा मेळ खरंतर वर्णनातीत आहे. तो अनुभव आहे. अनुभूती आहे. ही अनुभूती घ्यायची, तर वारी केली पाहिजे. महाराष्ट्र, महाराष्ट्राची संत परंपरा, इथला वारकरी भक्तीचं एकात्म दर्शन आहे...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com