जुने वेग नियंत्रक प्रणाली वाहनांचेही पासिंग वाहनचालकांना दिलासा ः परिवहन विभागाकडून अट शिथिल
ं
पिंपरी, ता. ३ ः परिवहन विभागाने वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र (पासिंग) नूतनीकरणासाठी अर्ज करताना वाहन प्रणालीमध्ये वेग नियंत्रक उपकरणांचा १६ अंकी युनिक आयडेंटीफिकेशन नंबर (यूआयएन) अपडेट असण्याचे बंधन घातले होते. त्यामुळे १६ अंकी यूआयएन नसलेल्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण रखडले होते. पण, आता परिवहन विभागाने ही अट शिथिल केली आहे. याबाबतचे परिपत्रक अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांनी बुधवारी (ता. ३) काढले. त्यामुळे वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे.
महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने स्कूल बस, प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस, व्यावसायिक वाहने, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना वेग नियंत्रक बसविणे बंधनकारक केले आहे. पण, काही वाहनचालकांना इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट (ईसीयु) आधारित वेग नियंत्रक उपकरण उत्पादकांकडून देण्यात आलेले नाही. तसेच वेग-वेगळे वेग नियंत्रक उपकरणे बसविण्यात आले आहे. यावर १६ अंकी यूआयएन नमूद करण्यात आलेला नाही. तसेच वाहन प्रणालीवरही वेग नियंत्रकासंबंधी माहितीही अद्ययावत केलेली नाही. त्यामुळे राज्यातील स्कूल बस आणि इतर परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण रखडले होते. याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे स्कूल चालक संघटना आणि वाहनचालकांनी तक्रार केली होती. यावर परिवहन विभागाने आता पासिंगसाठी येणाऱ्या वाहनांची तपासणी करताना वाहनांमध्ये बसविलेले वेग नियंत्रक कार्यरत असल्याची खात्री करून २०१८ पासून नोंदणी झालेल्या वाहनांमध्ये बसविण्यात आलेल्या वेग नियंत्रकाचा १६ अंकी युआयएन क्रमांक वाहन प्रणालीमध्ये तपासण्याचे आदेश दिले आहेत. तसेच २०१८ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांमध्ये बसविण्यात आलेल्या वेग नियंत्रक उपकरणावरील कोरलेला क्रमांक व्यक्तीशः तपासून वाहन प्रणालीमध्ये त्याप्रमाणे अपडेट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे २०१८ पूर्वी बसविलेल्या वेग नियंत्रक प्रणालीमुळे पासिंग रखडलेल्या वाहन चालकांना आता दिलासा मिळाला आहे. तसेच वाहन प्रणालीमध्ये वेग नियंत्रणाच्या नोंदणी करताना चुकीच्या माहितीचा वापर करून फेरबदल केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित मोटार वाहन निरीक्षक व नियंत्रक अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.