अतिदक्षता विभाग वर्षभरापासून धूळखात ! 
मोहननगरमधील कामगार रुग्णालयातील स्थिती ः रुग्णांना आर्थिक फटका

अतिदक्षता विभाग वर्षभरापासून धूळखात ! मोहननगरमधील कामगार रुग्णालयातील स्थिती ः रुग्णांना आर्थिक फटका

Published on

पिंपरी, ता. ३ ः रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या कामगारांना राज्य कामगार विमा सोसायटीच्या (ईएसआय) मोहननगर येथील रुग्णालयात मोफत उपचार दिले जातात. गंभीर आणि अतिगंभीर आजारावर कामगारांना उच्च दर्जाचे उपचार घेता यावेत, यासाठी या रुग्णालयात सुसज्ज दहा खाटांचा अतिदक्षता विभाग (आयसीयू) तयार करण्यात आला आहे. मात्र, राज्याच्या आरोग्य विभागाची परवानगी नसल्यामुळे हा विभाग तब्बल एक वर्षांपासून धूळखात पडला आहे.
‘एमआयडीसी’मधील कंपन्यांमध्ये, बांधकाम प्रकल्पावर, वीट भट्टीवर तसेच मिळेल त्या मजुरीवर काम
करणाऱ्या कामगारांना राज्य कामगार विमान सोसायटीच्या मोहनगर येथील ईएसआय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा दिली जाते. या रुग्णालयात पिंपरी, चिंचवड, लोणावळा, चाकण, तळेगाव, देहूरोड, मुळशी, हिंजवडी भागातून कामगार रुग्ण येतात. रुग्णालयात कामगार रुग्णांना प्राथमिक उपचाराबरोबरच बहुतांश आजारांवर आवश्यक शस्त्रक्रिया केली जाते. मात्र, गंभीर आणि अतिगंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी कामगार रुग्णांना ‘आयसीयू’मध्ये दाखल करावे लागते. ईएसआय रुग्णालयातील नवीन आयसीयू मागील एक वर्षांपासून बंद असल्यामुळे येथे येणाऱ्या कामगार रुग्णांवर माघारी जाण्याची वेळ येत आहे.

ईएसआय रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर दहा खाटांचे आवश्यक सोयीसुविधा असणारे ‘आयसीयू’ तयार करण्यात आले आहे. ऑक्सिजन पुरवठ्यासह व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत. मात्र, ते सुरु करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाची परवानगी अपेक्षित आहे. परवानगी मिळवण्यासाठी रुग्णालयाने प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती समजते. परंतु, आरोग्य विभागाकडून दप्तरदिरंगाई केली जात असल्यामुळे मागील वर्षी तयार केलेले आयसीयू बंद ठेवण्याची नामुष्की रुग्णालय प्रशासनावर आली आहे. त्याचा परिणाम थेट रुग्णांवर होत असून, अनेक गंभीर आजारावर मोफत उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत.

------

‘‘रुग्णालयात ‘आयसीयू’ तयार करण्यात आले आहे. ते सुरु करण्याच्या प्रशासकीय प्रक्रियेतील ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. ‘आयसीयू’ सुरु करण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरु आहे. ‘आयसीयू’ सुरु केल्यानंतर कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना उपचार घेता येतील. महिलांची प्रसूती, हाडांच्या शस्त्रक्रिया आणि ह्रदयाशी संबंधित उच्च प्रतिचे उपचार केले जातील. येथे येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना अन्य कोठे जाण्याची वेळ येणार नाही.

- डॉ. वर्षा सुपे, चिकित्सा अधीक्षक, ईएसआय रुग्णालय, मोहनगनर

------

रुग्णालयातील आरोग्य सेवा

- सामान्य शस्त्रक्रिया
- ईएनटी सर्जरी
- नेत्ररोग शस्त्रक्रिया
- स्त्रीरोगशास्त्र आणि प्रसूती शस्त्रक्रिया
- ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया आणि प्रक्रिया
- सर्जिकल गॅस्ट्रो एन्टरोलॉजी
- हृदयरोग आणि हृदयरोग शस्त्रक्रिया
- बालरोग शस्त्रक्रिया
- जननेंद्रियाची प्रणाली
- न्यूरोसर्जरी
- सर्जिकल ऑन्कोलॉजी
- वैद्यकीय ऑन्कोलॉजी
- रेडिएशन ऑन्कोलॉजी
- प्लास्टिक सर्जरी
- जळणे
- बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com