प्रारूप विकास आराखड्यावर १८,५०० हरकती

प्रारूप विकास आराखड्यावर १८,५०० हरकती

Published on

पिंपरी, ता. ४ ः पिंपरी-चिंचवड शहराचा प्रारूप विकास आराखडा (डीपी) मंजूर होऊन दीड महिना झाला आहे. त्यावर १४ जुलैपर्यंत हरकती व सूचना नोंदवता येणार आहेत. त्यासाठी अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. आत्तापर्यंत सुमारे १८ हजार ५०० हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. दरम्यान, डीपीबाबतचा मुद्दा विधिमंडळ अधिवेशनातही चर्चेत आला आहे. त्यामुळे सहकार काय निर्णय घेणार, याकडेही लक्ष लागले आहे. बहुतांश हरकती व सूचना नदीकाठचे रहिवासी व समाविष्ट गावांतील नागरिकांच्या आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरासाठीच्या प्रारूप विकास आराखड्याला (डीपी) महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी १५ एप्रिल रोजी मंजुरी दिली आहे. तो तयार करण्याचे काम २०१८ पासून सुरू होते. त्यासाठी २०४१ मधील संभाव्य लोकसंख्येचा विचार केलेला आहे. ‘डीपी’ हा शहराच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा असल्यामुळे त्यात नागरिकांच्या अपेक्षा अभिप्रेत असतात. त्यामुळे ‘डीपी’वर आलेल्या सर्व हरकती व सूचनांवर सुनावणी होऊन योग्य त्यांची दखल घेऊन त्या समाविष्ट केल्या जातील. त्यानंतर अंतिम ‘डीपी’ सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. सरकारही त्यांवर हरकती व सूचना मागविणार, त्यांवर सुनावणी होणार, त्यांतील योग्य ‘त्यां’चा समावेश करून ‘डीपी’ मंजूर होऊन त्याची अंमलबजावणी होईल.

चर्चेतील मुद्दे...
- मोशीजवळील कत्तलखाना आरक्षणाला कडाडून विरोध झाला आहे. सदर कत्तलखाना रद्द करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे
- किवळेतील सांडभोर वस्ती ते कोतवालनगर रस्ता; पवना नदी पूररेषा; बापदेव चौक ते कोतवालनगर; कचरा स्थलांतर केंद्राबाबत हरकती घेतल्या आहेत
- चिखली व चऱ्होलीतील टीपीला विरोध झाल्याने तोही रद्द करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे
- पिंपळे सौदागर येथील पारस रिव्हेरा सोसायटीचा काही भाग पवना नदी पूररेषेत दर्शविलेला असल्याने रहिवाशांनी सह्यांचे निवेदन आयुक्तांना दिले आहे
- देहूरोड रेडझोन हद्दीत निगडीतील यमुनानगर, त्रिवेणीनगर, रुपीनगर, सेक्टर २२, तळवडेतील काही भाग, चिखलीतील म्हेत्रेवस्तीचा भाग दर्शविलेला आहे

‘‘शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर गुरुवारपर्यंत (ता. ३) १८ हजार ५०० हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. १४ जुलैपर्यंत त्या स्वीकारल्या जाणार आहेत.
- प्रसाद गायकवाड, उपसंचालक, नगररचना, महापालिका
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com