हिंजवडीतील परिस्थितीला राज्य सरकार जबाबदार खासदार सुळे यांची टीका ः ...तर येत्या २६ तारखेला आंदोलन करणार
पिंपरी,ता. ४ ः हिंजवडीतील परिस्थितीला राज्य सरकारसह ‘पीएमआरडीए’ व ‘एमआयडीसी’ जबाबदार असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. एवढ्या मोठ्या आयटी पार्कला ग्रामपंचायत पायाभूत सुविधा देऊ शकत नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासन याला जबाबदार नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी या विषयी जिल्हाधिकारी, एमआयडीसी, पीएमआरडीए, सामाजिक संस्था यांच्यासह आमदार, खासदार यांची त्वरित बैठक घ्यावी, अशी मागणी सुळे यांनी केली. शुक्रवारी (ता. ४) हिंजवडीत झालेल्या बैठकीनंतर त्या बोलत होत्या.
हिंजवडीतील विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी हिंजवडी, माण या भागांचा पाहणी दौरा केला. यावेळी येथील नागरिक, आयटी कर्मचारी, स्थानिक यांनी आपल्या समस्या सुळे यांच्या पुढे मांडल्या. यावर त्यांनी ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सूचना दिल्या. यावेळी आयटी कर्मचारी, स्थानिक व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, हिंजवडीतील वाहतूक कोंडी व रस्त्यांच्या समस्यांबाबत ‘सकाळ’ने सातत्याने बातम्या दिल्या होत्या.
अन्यथा आंदोलन करणार....
‘गेल्या दोन ते तीन वर्षापासून हिंजवडीतील समस्यांबाबत आम्ही वारंवार पाठपुरावा करत आहोत. पीएमआरडीए हे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित येते. आता दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी आम्ही ‘पीएमआरडीए’ला येथील कामे करण्यासाठी देत आहोत. तोपर्यंत येथील नालेसफाई, अतिक्रमण काढणे, मेट्रोचा राडारोडा काढणे ही कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. २६ तारखेला मी पुन्हा येणार आहे तोपर्यंत त्यांनी कामे केले तर आम्ही त्यांचा सत्कार करू अन्यथा आंदोलनाशिवाय पर्यायच राहणार नाही, असा इशारा सुळे यांनी यावेळी दिला.
सक्षम प्रशासन नेमा
सुळे म्हणाल्या, ‘‘मुख्यमंत्र्यांनी कोणतेही सक्षम प्रशासन नेमावे किंवा त्यांना संयुक्तिक वाटेल असा निर्णय घ्यावा. मात्र येथील समस्या सोडवाव्यात. हिंजवडीतील प्रश्न सोडविण्यासाठी काही जण स्वतंत्र प्राधिकरण होण्याची मागणी करत आहेत; तर महापालिकेत समाविष्ट करण्याची आयटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. यातील कोणताही निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा परंतु या समस्यांवर तातडीने तोडगा काढावा. येथील प्रश्न सोडविण्यासाठी महिन्यातून दोनदा मी येथे भेट देणार आहे.’
वर्क फ्रॉम होमसाठी पत्र देणार
बंगळूर येथे वर्क फ्रॉम होम देण्यासाठी तेथील खासदारांनी पत्र दिले आहे. येथील कंपन्यांनीही ही सोय द्यावी, याबाबत कंपन्यांना पत्र देण्याचे आश्वासन सुळे यावेळी यांनी दिले. कोंडी कमी करण्यासाठी शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्यात येऊ शकते, का याचीही चाचपणी आम्ही करत आहोत. असे सांगत येत्या आठ तारखेला उद्योगमंत्री उदय सामंत यांचीही या प्रश्नासंदर्भात भेट घेणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.
मुख्यमंत्र्यांनी पाच मिनिटे वेळ द्यावा
सुळे म्हणाल्या,‘‘गेल्या पाच ते सात वर्षांपासून हिंजवडीत विकासकामे सुरू झाली, बांधकामे सुरू झाली, नाल्यांवर बांधकाम झाले. त्यामुळे येथे विस्कळितपणा आला आहे. वाहतुकीचेही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या सर्व विषयांवर सर्व प्रशासकीय यंत्रणांशी माझे बोलणे झाले आहे. मुख्यमंत्र्यांना मी यासाठी वेळही मागितली आहे, त्यांनी मला पाच मिनिटे वेळ द्यावा.’’
28442, 28443, 28440, 28441
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.