बेदाणे, खोबऱ्याच्या भावात सर्वाधिक वाढ

बेदाणे, खोबऱ्याच्या भावात सर्वाधिक वाढ

Published on

अनंत काकडे : सकाळ वृत्तसेवा

चिखली, ता. ५ : उत्पादनात घट झाल्याने सुकामेव्यातील बेदाण्यांच्या (मनुके) आणि खोबऱ्याच्या भावात पूर्वीपेक्षा तीन पटीने वाढ झाली आहे. बेदाणे आणि खोबऱ्यामधील ही आजपर्यंत झालेली सर्वात मोठी दरवाढ असल्याचे व्यापाऱ्याचे म्हणणे आहे. मात्र, येत्या काही दिवसांत नवीन उत्पादन बाजारात आल्यावर खोबऱ्याचे दर कमी होण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
यंदाच्या वर्षी द्राक्षाचे उत्पादन कमी झाल्याचा परिणाम बेदाण्यांच्या किंमतीवर झाला आहे. मार्च - एप्रिलमध्ये उत्पादित द्राक्षावर प्रक्रिया करून बेदाणे तयार केले जातात. तेच बेदाणे सुकामेवा म्हणून वर्षभर वापरासाठी उपयोगी पडतात. सांगलीतील तासगाव आणि नाशिक या बेदाण्यांच्या दोन मुख्य बाजारपेठा आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तान, इराण, इराक या भागांतूनही बदाम, खजूर, खारीक त्याचबरोबर बेदाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. परंतु राज्यातच मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्याने बेदाण्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहतात आणि राज्यातील बेदाण्याचा दर्जाही इतर राज्यांतील आणि देशातील बेदाण्यापेक्षा चांगला असतो. त्यामुळे संपूर्ण देशभर राज्यातील बेदाण्याला मागणी असते. परंतु यंदा राज्यातील द्राक्ष उत्पादनामध्ये मोठी घट झाली. परिणामी, यावर्षी बेदाण्यांचे उत्पादनही घटले. तीन महिन्यांपूर्वी घाऊक बाजारात १४० ते १५० रुपये किलो असलेल्या बेदाण्याचे भाव ४८० ते ५०० रुपयांपर्यंत वाढले आहेत. किरकोळ बाजारात पाचशे ते साडेपाचशे रुपये प्रतिकिलोने बेदाण्याची विक्री होत आहे.
तीच परिस्थिती खोबरे आणि खोबरा पावडरची झाली आहे. तीन महिन्यांपूर्वी १५० ते १६० रुपये असलेल्या खोबऱ्याचे भाव सध्या ३५० ते ३८० रुपये प्रतिकिलो झाले आहेत. कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि थोड्या प्रमाणात राज्यातील कोकण पट्ट्यात खोबऱ्याचे उत्पादन होते. परंतु यावर्षी नारळाच्या उत्पादनात झालेली घट आणि पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी शहाळे यामुळे खोबऱ्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

यंदा द्राक्षाच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे बेदाण्यासाठी पुरेशा प्रमाणात द्राक्षे उपलब्ध न झाल्याने उत्पादन घटवून मोठी दरवाढ झाली आहे. तीच परिस्थिती खोबऱ्याची झाली असून पावसाळ्यात खोबरे खराब होण्याचे प्रमाण अधिक असते. मात्र, येत्या काही दिवसांत खोबऱ्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे.
- संजय जैन, व्यापारी, गुलटेकडी, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com