अल्पवयीन मुलाकडून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न
पिंपरी : मित्राला मारहाण का करतो, असा जाब विचारल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने एकाच्या गळ्यावर कात्रीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना डांगे चौकाजवळ घडली. रामचंद्र सरकाळे असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर विष्णू विठ्ठल गायकवाड (रा. गणेश मंदिर, एकता कॉलनी, डांगे चौक) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी व त्यांचे मित्र रामचंद्र सरकाळे हे जेवण करून घरी जात असताना आरोपी समोरून आले. आरोपीने विनाकारण फिर्यादीला चापटी मारल्यानंतर फिर्यादीचे मित्र सरकाळे यांनी त्याला कशाला मारतो, अशी विचारणा केली. याचा राग आल्याने आरोपीने जवळच असलेल्या एका सलूनमधून कात्री आणून सरकाळे यांच्या गळ्यावर दोन वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
मारहाणप्रकरणी दहा जणांवर गुन्हा
पिंपरी : पूर्वीच्या वादातून चौघांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना रुपीनगर येथील भगीरथी हाउसिंग सोसायटी येथे घडली. याप्रकरणी कपिल गुणवंत मस्के (रा. भगीरथी हाउसिंग सोसायटी, रुपीनगर) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी स्वप्निल प्रमोद ढेपे (वय २५), प्रथमेश प्रमोद ढेपे (वय १९, दोघेही रा. निम्हण मळा, पाषाण) यांना अटक केली आहे. तर महिला आरोपी, दाजी प्रमोद ढेपे, यश प्रमोद ढेपे व त्याचे चार ते पाच साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीचा भाऊ अनिल यांनी एका महिलेला धमकी का दिली याचा जाब विचारल्याच्या कारणावरून वाद झाला. याचा राग मनात धरून आरोपी प्रथमेश हा त्याच्या साथीदारांसह फिर्यादीच्या घरी आला. शिवीगाळ करीत असताना फिर्यादीचा भाऊ अनिल हा चाकू घेऊन त्यांना मारण्यासाठी गेला असता त्यांच्यात झटापट झाल्याने ते पळून गेले. त्यानंतर काही वेळातच आरोपी हे फिर्यादीच्या घरासमोर आले. शिवीगाळ करीत असताना आरोपी प्रमोद ढेपे, स्वप्निल ढेपे, प्रथमेश ढेपे यांनी अनिल यांना पकडून दगड, विटांनी मारून गंभीर जखमी केले. तसेच सर्वांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, फिर्यादी हे मोबाईलमध्ये शूटींग करीत असताना त्यांचा मोबाईल हिसकावून त्यांनाही मारहाण केली. फिर्यादीचा मोठा भाऊ व नातेवाईक महिला भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली.
बेकायदा दारू विक्रीप्रकरणी एकावर गुन्हा
पिंपरी : पत्र्याच्या शेडमध्ये दारूसाठा करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई चऱ्होली, काळजेवस्ती येथील पत्राशेडमध्ये करण्यात आली. सदानंद गणेश गिरे (वय ३०, रा. गणराज कॉलनी नं. ३, चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी हा पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदारित्या विक्रीसाठी दारू साठवून ठेवताना आढळून आला. त्याच्याकडून चार हजार ९७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.