हद्दीबाहेरील शाळेतील विद्यार्थ्यांनाही बसपास 
महापालिकेकडून मंजुरी, ‘पीएमपीएमएल’कडून पासचे वितरण सुरु

हद्दीबाहेरील शाळेतील विद्यार्थ्यांनाही बसपास महापालिकेकडून मंजुरी, ‘पीएमपीएमएल’कडून पासचे वितरण सुरु

Published on

पिंपरी, ता. ५ ः पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) आणि पालिका प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील खासगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात बस पास दिला जात नव्हता. त्यामुळे पालकांना नाहक आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत होता. पण, याबाबत ‘सकाळ’ने शुक्रवारी (ता. ४) ‘विद्यार्थी पाससाठी हद्दीचा वाद’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासन खडबडून जागे झाले. ‘पीएमपीएमएल’कडून शुक्रवारपासूनच विद्यार्थ्यांना ७५ टक्के सवलतीच्या दरात बस पास वितरण करण्यास सुरवात केली.
पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे ६६५ प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करतात. अशा विद्यार्थ्यांसाठी महापालिकेकडून दरवर्षी सवलतीच्या दरात पास उपलब्ध करून दिले जातात. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना १०० टक्के अनुदानित मोफत बस प्रवास पास व खासगी शाळेतील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ७५ टक्के सवलतीचे अनुदानित बस प्रवास पास दिले जातात. यंदा पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत बस पासचे वितरण शनिवारपासून (ता. २८) सुरु झाले होते. पण, महापालिका हद्दीबाहेरील खासगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ७५ टक्के सवलतीच्या दरात पास दिले जात नव्हते. महापालिकेकडून कोणताही आदेश नसल्याने हद्दीबाहेरील शाळेतील विद्यार्थ्यांना पास देण्यास ‘पीएमपीएमएल’ने नकार दिला होता. पालक, विद्यार्थी पास केंद्रावर दररोज हेलपाटे मारत होते. याबाबत ‘सकाळ’ने शुक्रवारी (ता. ४) ‘विद्यार्थी पाससाठी हद्दीचा वाद’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. महापालिका अधिकाऱ्यांनी पीएमपीएमएल अधिकाऱ्यांना बस पास वितरित करण्यास सांगितल्यानंतर शुक्रवारपासून खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना ७५ टक्के सवलतीच्या दरात पास देण्यास सुरवात केली. त्यामुळे खासगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
------------
‘‘मी गेल्या पंधरा दिवसांपासून सवलतीच्या दरात पास मिळण्यासाठी ‘पीएमपीएमएल’च्या पास केंद्रावर हेलपाटे मारत होतो. पण, पास मिळणार नसल्याचे सांगत होते. गेल्यावर्षीही पास दिले नव्हते. शुक्रवारी सकाळमध्ये बातमी प्रसिद्ध होताच मला पास केंद्रातून फोन आला आणि सांगितले की तुम्हालाही सवलतीच्या दरात पास दिले जाणार आहेत.
- लता चव्हाण, पालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com