पंधरा हजार विद्यार्थिनींनी घेतला एसटीचा मोफत पास अहिल्याबाई होळकर पास योजनेला पुणे जिल्ह्यात मोठा प्रतिसाद
पिंपरी, ता. ५ ः ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने ‘अहिल्याबाई होळकर मोफत एसटी पास’ योजना सुरु केली आहे. या योजनेला पुणे जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. एक जुलैपर्यंत पुणे विभागातील १४ आगारांमधून १५ हजार २२ विद्यार्थिनींनी ‘अहिल्याबाई होळकर मुलींसाठी मोफत पास’ योजनेचा लाभ घेतला. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा योजनेचा लाभ घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे
राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाकडून ‘अहिल्याबाई होळकर मुलींसाठी मोफत पास’ योजनेंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत पास दिला जातो. शाळा आणि कॉलेजला जाणाऱ्या सर्व मुलांना आणि बारावीपुढील शिक्षण घेणाऱ्या मुलींना ६६.६७ टक्के सवलत दिली जाते. १९८६ नंतर सुरु झालेले राज्य शासन मान्यताप्राप्त विविध तंत्र आणि व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी पासमध्ये ६६.६७ टक्के सवलत दिली जाते. यंदा जूनमध्ये पुणे जिल्ह्यातील १४ आगारांमधून १५ हजार २२ विद्यार्थिनींनी ‘अहिल्याबाई होळकर मोफत एसटी पास’ योजनेचा लाभ घेतला आहे तर ५ हजार ३२० विद्यार्थ्यांनी ६६.६७ टक्के सवलतीच्या दरात पास घेतले. अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत भोर, नारायणगाव, राजगुरुनगर आणि इंदापूर आगारात सर्वाधिक पास घेतले आहेत तर वल्लभनगर आगारातून एकाही विद्यार्थिनीने पास घेतला नाही.
शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी बसपास दरात ६६.६७ टक्के सवलत दिली जाते. जून २०२४ ते एप्रिल २०२५ दरम्यान ९३ हजार २६० विद्यार्थांनी सवलतीच्या दरात पास घेतले होते. तर ९८ हजार ५९ विद्यार्थिनी अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत मोफत पास घेतले होते. या दोन्ही योजनेचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना फायदा होत असल्याचे दिसून येते.
-----
‘‘विद्यार्थ्यांना आता एसटी बसचे पास थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येत आहेत. त्यामुळे पास घेणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मागच्यावर्षीच्या तुलनेत यंदा ‘अहिल्याबाई होळकर मोफत एसटी पास’ योजनेला चांगला प्रतिसाद आहे.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे विभाग
------
अहिल्याबाई होळकर योजना लाभार्थी संख्या
जून २०२४ - २०२५
१२,८४५ - १५,०२२
६६.६७ टक्के सवलत पास योजना लाभार्थी संख्या
जून २०२४ - २०२५
५,५२८ - ५,३२०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.