आधुनिक तंत्रज्ञान भारी, तज्ज्ञांची संख्या अपुरी उद्योग क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची पोकळी
पिंपरी, ता. ५ ः औद्योगिक क्षेत्रातील सर्वच कंपन्यांसाठी जास्तीत जास्त उत्पादन, उत्पादनातील अचूकता आणि कमी वेळेत सर्वाधिक उत्पादन ही आधुनिक युगाची गरज बनली आहे. त्या दृष्टीने औद्योगिक कंपन्यांमध्ये ‘अॅडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग’; ‘सीएनसी-व्हीएमसी प्रोग्रॅमिंग’, ‘लेझर तंत्रज्ञान’ आणि ‘ॲडव्हान्स वेल्डिंग व सिम्युलेशन’ यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. नव्या रोबोटिक तंत्रज्ञानामुळे कंपन्यांमधील पारंपरिक उत्पादन प्रणालीत मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे दिसत आहे. मात्र, याचे प्रगत ज्ञान असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याएवढी असल्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची उद्योग क्षेत्रात मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. रोबोटिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन कमी वेळेत उत्पादनातील अचूकता साधली जाते. ‘अॅडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग’च्या साहाय्याने एखादी वस्तू तयार करताना थरांवर थर चढवून थेट वस्तू तयार केल्या जातात. त्यामुळे कच्च्या मालाचा अपव्यय टळला जातो आणि कमी वेळेत अधिकचे उत्पादन तयार करता येते. एरोस्पेस, ऑटोमोबाईल आणि वैद्यकीय क्षेत्रात या तंत्रज्ञानाला मोठी मागणी असल्याचे उद्योजकांनी शिक्कामोर्तब केले. दुसरीकडे, ‘सीएनसी आणि व्हीएमसी प्रोग्रॅमिंग’मुळे संगणकाद्वारे मशिनवर नियंत्रण मिळवले जाते. त्यामुळे मिलिंग, कटिंग व ड्रिलिंगसारखी कामे अत्यंत अचूकपणे व कमी वेळेत केली जातात. यात G-code व M-code वापरून संगणकाची पूर्ण प्रक्रिया सोपी करण्याची पद्धत अवलंबली जाते.
त्याचबरोबर ‘लेझेर तंत्रज्ञान’ हे वेल्डिंग, कटिंग, ग्रेव्हिंग आणि मार्किंगसाठी वापरले जाते. विना-संपर्क प्रक्रिया आणि कमीतकमी उष्णता प्रभावामुळे उत्पादन अधिक स्वच्छ आणि मजबूत होते. तर, वेल्डिंग प्रकाराचा महत्त्वाचा भाग असलेल्या ‘ॲडव्हान्स वेल्डिंग व सिम्युलेशन’ यामुळे उत्पादन सुरू करण्यापूर्वीच संपूर्ण प्रक्रिया संगणकावर डिझाइन केली जाते. त्यामुळे त्रुटी टाळून दर्जेदार उत्पादने तयार करणे सोपे होते. या तंत्रज्ञानाचा उपयोग प्रशिक्षण, डिझाइन आणि गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी ही घेतला जातो. वेल्डिंग क्षेत्रातील या प्रगत तंत्रज्ञानामुळे देशातील व राज्यातील उद्योग जागतिक पातळीवरील उद्योगाशी स्पर्धा होत आहे.
तंत्रज्ञानाचे फायदे
- अचूक, जलद आणि दर्जेदार उत्पादनाची हमी
- मनुष्यबळावरील अवलंबित्व झाले कमी
- उत्पादन खर्चात होतेय बचत
- डिजिटायझेशन व ऑटोमेशनचा प्रभावी वापर
-------
आधुनिक वेल्डिंग तंत्रज्ञानाचे फायदे
तंत्र/ काम/ काय भारी आहे ?
अॅडिटीव्ह/ थरच थर/ कचरा कमी, डिझाईन भारी
सीएनसी/ मशिनला कोड/ अचूक आणि झकास डिझाईन
लेझर/ विना-संपर्क कटिंग/ प्रिसिजन लेव्हल टॉप
सिम्युलेशन/ ट्रायल आधी/ चूक होणार नाही.
‘‘अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना औद्योगिक कंपन्यांना आवश्यक असणारे कौशल्य आत्मसात व्हावे, यासाठी प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे (अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी) त्यांना प्रशिक्षित केले जाते. ‘अॅडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग’, ‘सीएनसी-व्हीएमसी प्रोग्रॅमिंग’, ‘लेझर तंत्रज्ञान’ आणि ‘ॲडव्हान्स वेल्डिंग व सिम्युलेशन’ या चारही तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने कंपन्यांना हवी आहेत. यासाठी उद्योग क्षेत्रात प्रगत मनुष्यबळाची मागणी आहे.
- डॉ. गणेश बोरीकर, विभागप्रमुख, सेंट्रल वर्क शॉप, डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड
‘‘औद्योगिक क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची पोकळी आहे. कर्मचारी भरतीसाठी कंपन्यांकडून सातत्याने मागणी केली जाते. ती विचारात घेता विद्यार्थ्यांना प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे प्रशिक्षण दिले जाते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अभ्यासक्रमानुसार सीओटू, टिग, प्लाझ्मा कटिंग, स्पॉट वेल्डिंग विद्यार्थ्यांना शिकवले जाते. संगणकाच्या आधारे ऑटो कॅड, कटिया आणि प्रो ई-डिझाईन शिकवले जाते. मात्र, औद्योगिक कंपन्यांची गरज पाहता औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे.
- बसवराज विभुते, प्राचार्य - औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कॅम्प एज्युकेशन सोसायटी, निगडी,
‘‘वेल्डिंगसह आधुनिक तंत्रज्ञानामध्ये प्रगत मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. मागणीनुसार उत्पादन पुरवठा साखळी टिकवण्यासाठी नवीन कर्मचाऱ्यांना वारंवार प्रशिक्षण द्यावे लागते. त्यासाठी सहा महिने ते एक वर्षाचा कालावधी लागतो. औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांनी प्रशिक्षित युवक तयार करणे अपेक्षित आहे.
- प्रशांत गोडगे पाटील, उद्योजक, जय श्री स्वामी समर्थ इंजिनिअरिंग प्रा. लि., चिंचवड, व्हेंडर - महिंद्रा, फोर्स मोटर्स, किर्लोस्कर
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.