‘बीआरटी’तून रोज साडेतीन लाख जणांचा प्रवास 
पिंपरी-चिंचवड महापालिका, आयटीडीपी इंडियाची माहिती

‘बीआरटी’तून रोज साडेतीन लाख जणांचा प्रवास पिंपरी-चिंचवड महापालिका, आयटीडीपी इंडियाची माहिती

Published on

पिंपरी, ता. ५ : पिंपरी-चिंचवड शहरातील बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (बीआरटीएस) या पाच मुख्य कॉरिडॉरमध्ये दररोज ७ हजार ३८९ बसफेऱ्या सुरू असून, सुमारे ३ लाख ६० हजार प्रवासी प्रवास करतात. जलद वाहतुकीसाठी या वाहतूक व्यवस्थेमुळे गर्दीच्या वेळी काही मार्गांवर दर दीड ते दोन मिनिटांनी एक बस धावत असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
निगडी-दापोडी या मार्गावर दररोज सुमारे १ लाख ५० हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. हा मार्ग पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्य प्रशासकीय इमारत, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, स्वारगेट, हडपसर आणि कात्रज यांसारख्या प्रमुख ठिकाणांना जोडतो. या मार्गावर सकाळी सहा ते आठ या दोन तासांतच प्रत्येक तासाला किमान दोन ते तीन हजार प्रवासी प्रवास करतात. तसेच, दिघी-आळंदी आणि सांगवी-किवळे या दोन्ही मार्गांवर देखील गर्दीच्या वेळेस दर दोन ते अडीच मिनिटांनी एक बस धावते. काळेवाडी-चिखली आणि नाशिक फाटा-वाकड या मार्गावर सध्या इतर मार्गांच्या तुलनेत कमी प्रवासी प्रवास करीत असले, तरी येथेही दर पाच ते सहा मिनिटांनी एक बस धावते. या सेवेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे आयटीडीपी इंडिया संस्थेच्या सर्वेक्षणात समोर आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
--------

दोन हजार ७०० बसची कमतरता
बीआरटीएस बस सरासरी ३० किलोमीटर प्रति तास वेगाने धावते. हा वेग सामान्य वाहतुकीच्या तुलनेत दुप्पट आहे. या बसमध्ये प्रवास करताना दहा किलोमीटरसाठी फक्त वीस मिनिटे लागतात. बसने प्रवास करताना प्रवाशांचा वेळ वाचतो. ही सेवा अधिक गतिशील करण्यासाठी स्वतंत्र मार्गांशिवाय पीएमपीएमएलला अजून सुमारे २ हजार ७०० बसची कमतरता भासत आहे. त्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व बस सेवा देणारे महामंडळ यांच्याकडून संयुक्त प्रयत्न केले जात आहेत, अशीही माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली.
-----------
‘‘शहरी वाहतूक व्यवस्थेवरील ताण वाढत असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेने बीआरटीएसमध्ये योग्य वेळी केलेल्या गुंतवणुकीमुळे प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासात आमूलाग्र बदल घडला आहे. गर्दीच्या वेळी दर ९० सेकंदांनी एक बस आणि विश्वासार्ह प्रवास, ही व्यवस्था फक्त वाहतूककोंडी कमी करत नाही, तर शाश्वत आणि नागरिक-केंद्रित वाहतूक पद्धतीची पायाभरणी करत आहे.

- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका

-------------
‘‘आयटीडीपी इंडियाच्या सर्वेक्षणात बीआरटीएसला प्रवासी प्राधान्य देत असल्याचे दिसून आले. पिंपरी-चिंचवडमधील ९६ टक्के लोकसंख्या बीआरटीएस बसथांब्याच्या ५०० मीटर परिसरात राहते. निगडी-दापोडी मार्गावरील प्रवाशांमध्ये १८-२५ वयोगटातील प्रवासी संख्या ४७ टक्के आहे. बहुतांश प्रवाशांचे प्रतिमहा उत्पन्न २० हजारपेक्षा कमी आहे, असेही सर्वेक्षणात समोर आले आहे.
- आदित्य राणे, आयटीडीपी इंडिया

फोटोः 28916

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com