विठूनामाच्या गजराने दुमदुमल्या शाळा
विठूनामाच्या गजराने दुमदुमल्या शाळा
दिंडी सोहळ्यात ‘माउली...माउली’चा जयघोष; पालख्यांचे प्रदर्शन
पिंपरी, ता. ६ : यावर्षी आषाढी एकादशी रविवारी (ता.६) होती. शाळांना सुटी असल्याने आदल्या दिवशी म्हणजे शनिवारीच (ता.५) विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत विठूनामाचा गजर केला. बालवारकऱ्यांनी टाळ, मृदंग घेत या सोहळ्यात सहभाग घेतला. वारी, रिंगण सोहळे, पालखीचे कार्यक्रम, अभंगांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी उत्साहात केले. विद्यार्थ्यांनी स्वत: हाताने तयार केलेल्या पालख्यांचे प्रदर्शन यावेळी शाळेत भरविण्यात आले होते. ‘माउली..माउली’, ‘विठ्ठल.. विठ्ठल’ अशा जयघोषाने शाळांचा परिसर दुमदुमला होता.
संताची वेशभूषेत विद्यार्थ्यांचा सहभागी
मनोरम प्राथमिक शाळा, समर्थ माध्यमिक विद्यालय येथे संताच्या वेशभूषा साकारत विद्यार्थ्यांनी दिंडीमध्ये सहाभाग घेतला. संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ केतकर, स्वरा केतकर, मुख्याध्यापिका सोनाली दळवी, प्रियांका एरंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. ही दिंडी शाळेतून काकडे पार्कमार्गे, मनोरम बालक मंदिर व परत मनोरम प्राथमिक शाळेपर्यंत आयोजित करण्यात आली. विठुनामाचा गजर करत व्यसनमुक्तीचा संदेश देणारे फलक हातात घेत विद्यार्थ्यांनी जागृती केली. टाळ पथक, लेझीम पथक, पताका घेऊन सर्व बालवारकरी विठ्ठलाच्या नामघोषात सहभागी झाले होते. सर्व शिक्षकांनी सोहळ्याचे संयोजन केले
पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय
नेहरूनगर येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालयात दिंडी व वृक्षारोपण केले. जवाहरलाल नेहरू चौकात वारकरी वेशातील विद्यार्थ्यांनी टाळाच्या गजरात विठूनामाचा जयघोष करत रिंगण केले. तर,परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हनुमंतराव भोसले, राहुल भोसले, सतीश भोसले, अमित भोसले, मुख्याध्यापिका संध्या वाळुंज, नवाज शेख उपस्थित होते. लक्ष्मण गुरव, ज्योती कांबळे, अनिल राठोड, सविता महांगडे, जयश्री यादव, सखाराम साबळे व शिक्षकांनी नियोजन केले.
शिक्षण प्रसारक मंडळी, निगडी
शाळेमध्ये आषाढीवारी व शाळेचा वर्धापनदिनाचे औचित्य साधून पालखी सोहळा पार पडला. या वेळी शाळा समिती अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी, रेखा भंडारी यांच्या हस्ते सरस्वती पूजन व पालखी पूजन करण्यात आले. याप्रसंगी संत तुकडोजी महाराज यांच्याविषयी कीर्तन आयोजित करण्यात आले. शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांकडून वारीवर आधारित विठ्ठलाचे चित्र आणि अभंग तसेच ‘रस्ता सुरक्षा’ आणि ‘संघटन मे शक्ती हैं’ या विषयावर घोषवाक्य तयार करून प्रदर्शन भरविले. शिक्षकांसाठी योग कार्यशाळा, ‘चातुर्मासातील सात्विक पदार्थ’ हा विषय घेऊन पालकांसाठी पाककला स्पर्धा घेण्यात आली. संयोजन मुख्याध्यापिका सविता बिराजदार (मराठी माध्यम), पल्लवी शानभाग (इंग्रजी माध्यम) व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी केले.
मॉडर्न हायस्कूल इंग्रजी माध्यमिक, यमुनानगर
निगडी येथील मॉडर्न हायस्कूल इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांनी दिंडी काढली. मुख्याध्यापिका गौरी सावंत आणि सर्व शिक्षकांनी मूर्तीचे पूजन केले. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांकडून शिक्षिका रसिका साळेगावकर यांनी वारीशी संबंधित मुद्रिका टी-शर्टवर रंगविण्यात आली. आषाढी वारीचे महत्त्व ज्योत्स्ना शिंदे, मधुकर रासकर सांगितले.सातवीच्या मुलींनी माउलींच्या अभंगाचे गायन केले. संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, शाळासमिती अध्यक्ष दीपक मराठे, अतुल फाटक, शाळा समितीचे सभासद अनिल अढी यांनी वारकरी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
श्रीमती पार्वतीबाई विद्यालय, श्रीधरनगर
श्रीमती पार्वतीबाई विद्यालय येथे आषाढी एकादशीनमित्त संस्थेच्या कार्यवाह इंद्रायणी माटे-पिसोळकर, मुख्याध्यापक विलास पाटील यांच्या हस्ते पालखी व विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विविध संतांच्या व वारकरी यांच्या वेशभूषा यावेळी विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या. विठ्ठलनामाचा जयघोष करत पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
कन्या विद्यालय, पिंपरी वाघेरे
रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयात विद्यार्थिनींनी दिंडीचे आयोजन केले. मुख्याध्यापिका सुवर्णा परदेशी, पर्यवेक्षिका वैशाली मेमाणे व सहकारी शिक्षक यांचे हस्ते पालखीपूजन करण्यात आले. ‘रामकृष्ण हरी...’चा जयघोष करत विद्यार्थिनींनी पालखी सोहळ्याचा आनंद घेतला. यावेळी विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
सानेगुरुजी आदर्श विद्यानिकेतन, थेरगाव
सानेगुरुजी आदर्श विद्यानिकेतन येथे दिंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वारकरी पेहराव करत विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती, टाळ, तुळशी वृंदावन घेऊन ‘‘राम कृष्ण हरी’’असे भजन करत पालखी मिरवणूक काढली. यावेळी मुख्याध्यापिका श्रृतिका जाधव व सहकारी शिक्षक उपस्थित होते.
मास्टर माइड इंग्लिश मीडियम, नवी सांगवी
मास्टर माइंड इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये पालखी सोहळा साजरा करण्यात आला. त्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक तसेच शाळेचे संस्थापक टी. आय. अब्राहम, मुख्याध्यापिका राजपाल सहोता उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाख परिधान करून दिंडी काढली. त्यानंतर आरती करून पालखीवर पुष्पवृष्टी करून दिंडीची सांगता करण्यात आली.
गणेश इंटरनॅशनल शाळा
गणेश इंटरनॅशनल शाळेमध्ये विठ्ठल-रुक्मिणी, वारकरी अशा पारंपरिक पोशाखांतील विद्यार्थ्यांनी परिसरात काढलेली दिंडी अन् माउली...माउलीचा जयघोष यामुळे चैतन्य अवतरले होते. अध्यक्ष एस. बी.पाटील, विश्वस्त गणेश पाटील, संचालक सुनील शेवाळे, सतीश शेळके आणि मुख्याध्यापिका सिओना त्रिभुवन यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन आलेन वर्गिस यांनी केले. शर्मिला वानखडे यांनी आषाढी एकादशीबद्दल माहिती सांगितली.
ज्ञानराज विद्यालय
ज्ञानराज विद्यालयात पालखी सोहळा विद्यार्थी वारकऱ्यांच्या पोशाखात तयार होऊन आले होते. कार्यक्रमाची तयारी सुवर्ण निकम, वंदना जाधव व राजेश्वरी गुरव आणि सर्व शिक्षकांनी केली होती. संस्थेचे कार्याध्यक्ष संजय शेंडगे, सचिव दीपक थोरात, मुख्याध्यापिका उर्मिला थोरात यांनी कौतुक केले.
नृसिंह हायस्कूलतर्फे ग्रंथदिंडी, पर्यावरण दिंडी
नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने ग्रंथदिंडी व पर्यावरण दिंडी काढण्यात आली. टाळ मृदुंगाच्या गजरात व वारकरी पोषाखात विद्यार्थी दिंडीमध्ये सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी दिंडीतून संतांच्या नावाचा गजर केला, तसेच पर्यावरण वाचवा, परिसर स्वच्छ ठेवा, प्रदूषण टाळा व आनंदी जीवन जगा असा संदेश दिला. दरम्यान, संत गजानन महाराज मंदिरासमोर माजी महापौर उषा ढोरे यांनी दिंडीचे स्वागत केले. यावेळी कुमार ढोरे, विजुअण्णा जगताप, सूर्यकांत गोफणे, शरद ढोरे, प्रदीप पाटील, नितीन कदम, क्षितिज कदम, प्राचार्य अशोक संकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यालयातील सर्व शिक्षकांनी या भक्तिमय दिंडीचे संयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.