वारी हाच परमार्थाचा सोपा मार्ग
कीर्तनकार सचिन महाराज पवार यांचे प्रतिपादन; ‘सकाळ’ कीर्तन महोत्सवाचा समारोप

वारी हाच परमार्थाचा सोपा मार्ग कीर्तनकार सचिन महाराज पवार यांचे प्रतिपादन; ‘सकाळ’ कीर्तन महोत्सवाचा समारोप

Published on

पिंपरी, ता. ५ : ‘‘सर्वात सोपा परमार्थाचा मार्ग म्हणजे वारी आहे आणि सर्वात सोपा देव म्हणजे भगवान परमात्मा पंढरीचा पांडुरंग आहे. त्यामुळे पंढरीची वारी प्रत्येकाने करायला हवी,’’ असा आग्रह पुणे येथील युवा कीर्तनकार सचिन महाराज पवार यांनी भाविकांना केला. निमित्त होते, ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवाचे.
संत ज्ञानेश्वर माउली यांचा सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मोत्सव, जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज यांचा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळा आणि आषाढी वारी यानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे. त्यातील पाचव्या दिवसाची अर्थात समारोपाची कीर्तनसेवा आषाढी एकादशीला रविवारी (ता. ६) झाली. त्यात सचिन महाराज पवार बोलत होते. त्यांच्या हस्ते श्रीविठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीमद्भगवद्‍गीता, ज्ञानेश्वरी व अभंगगाथा या ग्रंथाचे पूजन झाले. त्यानंतर त्यांची कीर्तनसेवा झाली. संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या,
नेणती महिमा ब्रह्मादिक भद्रा ।
आणि ते महेन्द्र नानस्थानी ॥
तें रूप खेळत गौळियांच्या संगे ।
पुंडलिका मागे भीमातीरी ॥
उत्पत्ति उलथा न चले तो मार्ग ।
दुजियाचा संग नाहीं ज्यासी ॥
निवृत्ति प्रगट गुरुमंत्र फळद ।
गोपाळ विद्नद ब्रह्म सेवी ॥
या अभंगाचे निरूपण त्यांनी केले.
भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला, राजपदावर विराजमान झाल्यानंतरचे निर्णय, कुरुक्षेत्रावर अर्जुनाला केलेला उपदेश आदी प्रसंगाच्या माध्यमातून श्रीकृष्णाचे चरित्र उलगाडत सचिन महाराज पवार यांनी, पंढरपुरात येऊन पांडुरंग स्वरूप अवतरल्याचे भगवान श्रीकृष्णाचे माहात्म्य रसिकांसमोर उभे केले. नामस्मरणामध्ये दंग झालेल्या भाविकांनी फुगड्या खेळल्या. ‘एकमेका लागतील पायी रे’ म्हणत वारीची अनुभूती घेतली. त्यामुळे आख्खे प्रेक्षागृह नामस्मरणात दंग झाले होते. सचिन महाराज पवार म्हणाले, ‘‘संत निवृत्तीनाथ महाराज यांनी संत ज्ञानेश्‍वर माउलींना भगवद्‍गीतेचे निरूपण करण्याचा उपदेश केला होता. गहिनीनाथ महाराजांनी जे ज्ञान मला दिले, त्याचे स्वरूप ज्ञानेश्वर माउलींच्या वाणीतून प्रगट झाले आहे, असा संदेश निवृत्तीनाथांनी दिला आहे. त्यामुळे युगानुयुगे संस्कृतमध्ये अडकून पडलेले ज्ञान संत ज्ञानेश्वर माउलींनी मराठीत आणले आहे. शिवाय, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेले तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम ज्ञानोबा, एकोबा, तुकोबा आदी सकल संतांनी केले आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार आणि प्रचार वारकरी संप्रदायाने केला आहे, करत आहे.’’ चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट व आमदार महेशदादा लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशन महोत्सवाचे सहप्रायोजक होते. आळंदी येथील श्री कानिफनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी टाळांची सेवा केली. तसेच, गायनाचार्य प्रविण महाराज सोळंकी, महादेव महाराज वाघमारे, रवींद्र महाराज गाडेकर, उमेश महाराज सोळंकी, राजेश महाराज शिंदे यांनी गायन आणि गणेश महाराज टाक यांनी पखवाज वादन सेवा केली. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पंढरपूरपर्यंत वारकऱ्यांची वैद्यकीय सेवा केलेल्या पथकाचाही सन्मान केला.

विठाई विशेषांकाचे प्रकाशन
आषाढी एकादशीनिमित्त ‘सकाळ’च्या ‘विठाई’ विशेषांकाचे आणि आठ पानी विशेष पुरवणीचे प्रकाशन युवा कीर्तनकार सचिन महाराज पवार, आमदार शंकर जगताप, कामगार नेते सचिन लांडगे यांच्यासह कीर्तनाला उपस्थित भाविकांच्या हस्ते रविवारी झाले. पुरवणीसोबत बुक्का आणि प्रसादही भाविकांना घरपोच मिळाला आहे. विठाई विशेषांकामध्ये पांडुरंगाची प्रतिमा आहे.

‘सकाळ’च्या माध्यमातून समाजप्रबोधन
कीर्तन हे प्रबोधनाचे माध्यम आहे. तसे वृत्तपत्रही प्रबोधनाचे माध्यम आहे. समाजातील नाठाळांना झोडपून काढण्याचे काम कीर्तनकारांप्रमाणे ‘सकाळ’ही करत आहे. भगवद्‍गीता व ज्ञानेश्वरी हे ग्रंथ प्रबोधनाचे काम करत आहेत. मराठी वर्तमानपत्रांची मोठी परंपरा असून, ती १८३२ पासून दर्पणच्या माध्यमातून सुरू झाली आहे. त्यांनी ज्ञानेश्‍वरी प्रसिद्ध केली होती. आता ही परंपरा चालवण्याचे काम ‘सकाळ’ करत आहे. कीर्तन महोत्सव असेल, ‘विठाई’ विशेषांक असेल, वारीचे वार्तांकन असेल, यामाध्यमातून ज्ञानेश्‍वरी व संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत ‘सकाळ’ पोहोचवत आहे. इतकेच नव्हे तर, वारीमध्ये चालणाऱ्या लाखो वारकऱ्यांमधील एखादा वारकरी त्याच्या दिंडीपासून दुरावला किंवा चुकला तर त्याला त्यांच्या दिंडीमध्ये पोहोचविण्याचे काम दरवर्षी ‘सकाळ’ करत आहे. बातम्या, सेवा व कीर्तनाच्या माध्यमातून वारकऱ्यांची आणि संतांची सेवा ‘सकाळ’च्या माध्यमातून होत आहे, अशा शब्दांत सचिन महाराज पवार यांनी ‘सकाळ’चे कौतुक केले.

भाविकांना प्रसाद अन् फराळ
आषाढी एकादशीच्या कीर्तन श्रवणाला उपस्थित भाविकांना ‘सकाळ’तर्फे राजगिरा लाडूचा प्रसाद देण्यात आला. तसेच, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट व पिंपळे गुरव येथील जगताप परिवारातर्फे साबुदाणा फराळ आणि चहापान प्रत्येक भाविकाला देण्यात आले.

‘‘संत ज्ञानेश्‍वर माउली यांचे संजीवन समाधी स्थान असलेले आळंदी आणि जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान असलेले देहू या तीर्थक्षेत्रांचे सानिध्य पुणे, पिंपरी-चिंचवड परिसराला लाभले आहे. पंढरपूरची आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाचे वैभव आहे. पण, ज्यांना वारीला जाणे शक्य झाले नाही, त्या भाविकांसाठी ‘सकाळ’तर्फे आयोजित कीर्तन महोत्सव एक आनंद सोहळा असून, स्तुत्य असा उपक्रम आहे. आपली संस्कृती जपण्याचे काम या माध्यमातून केले जात आहे.
- शंकर जगताप, आमदार, चिंचवड

‘‘आषाढी एकादशीनिमित्त ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सव एक आनंद सोहळा आहे. भाविकांसाठी ही एक अलौकिक अनुभूती असून, वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करण्याचे माध्यम आहे. हा अद्वितीय असा आगळा-वेगळा उपक्रम असून भाविकांना भक्तिरसात चिंब भिजवत प्रबोधन करणारा महोत्सव ठरला आहे. कीर्तनाच्या माध्यमातून ‘सकाळ’ने प्रबोधनाची वारी घडवली आहे.
- सचिन लांडगे, कामगार नेते, भोसरी

....
फोटो ओळ
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड : ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवात निरूपण करताना सचिन महाराज पवार व नामस्मरणात दंग होत फुगडी खेळताना वारकरी साधक. (पान एक 29167 )
...

बातमीसोबत फोटो
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड : ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवात फुगडी खेळताना महिला भाविक. (29168)
....
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड : ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवात सन्मानित केलेल्या भाविकांसमवेत कीर्तनकार सचिन महाराज पवार, आमदार शंकर जगताप, कामगार नेते सचिन लांडगे. (29172)
...
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड : कीर्तनकार सचिन महाराज पवार यांच्या सन्मानप्रसंगी (डावीकडून) ‘सकाळ’चे सरव्यवस्थापक रूपेश मुतालिक, पवार महाराज, सचिन लांडगे, ‘सकाळ’च्या कार्यकारी संपादक शीतल पवार. (29173)

---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com