अनधिकृत रिक्षा थांब्यांनी चौकांची कोंडी
पिंपरी, ता. ७ : पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र, आळंदी नगरपरिषद आणि देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्ड कार्यक्षेत्रात १२३ रिक्षा थांब्यांना मान्यता दिली. पण, शहरात त्यापेक्षा अधिक रिक्षा थांबे आहेत. यातील बहुतांश अनधिकृत आहेत. यामुळे चौका-चौकांत कोंडी होत आहे. याकडे ना वाहतूक पोलिसांचे लक्ष, ना आरटीओचे. अधिकृत रिक्षा थांबे जाहीर होऊन दोन महिने झाले, तरी अजूनही अनधिकृत रिक्षा थांब्यावर कारवाई होत नसल्याने आश्चर्श व्यक्त होत आहे.
पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयात सात जूनपर्यंत ४५ हजार ७७७ रिक्षांची नोंद झाली आहे. शहरातील मोक्याच्या ठिकाणी, मुख्य चौकात, एसटी स्टॅण्ड, रेल्वे स्थानके आणि मेट्रो स्थानकांबाहेर रिक्षा थांबे उभारण्यात आले आहेत. यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे. तेथे रिक्षा बेशिस्त उभ्या केल्या जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. यावर आरटीओ आणि वाहतूक विभागाकडून कारवाई होत नसल्याची स्थिती आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा थांब्याची जागा निश्चित करण्यासाठी शेवटचा सर्व्हे २०१०-११ मध्ये झाला होता. यावेळी शहरात केवळ ७७ रिक्षा थांब्यांना परवानगी दिली होती. त्यानंतर तब्बल पंधरा वर्षांनी रिक्षा थांब्याचे मार्च ते एप्रिल २०२५ मध्ये सर्वेक्षण झाले. प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ), वाहतूक शाखा, महापालिकेचे प्रतिनिधी, रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी, प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी यांनी थांब्याचे सर्व्हेक्षण करुन ‘आरटीओ’ने मान्यतेसाठी हा अहवाला ‘आरटीए’समोर ठेवला. त्यावर १२३ रिक्षा थांब्यांना मान्यता देण्यात आली. यानंतर अनधिकृत रिक्षा थांब्यावर वाहतूक पोलीस आणि आरटीओने कारवाई करणे आवश्यक होते. पण, अधिकृत रिक्षा थांबे जाहीर होऊन दोन महिने झाले. तरी कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे अनधिकृत रिक्षा थांब्यावर करवाई करणार कधी ? वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार कधी ? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी चौकातील वाहतूक कोंडीस अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत रिक्षा थांब्यावर कारवाई करणार आहहोत. आरटीएने मान्यता दिलेल्या रिक्षा स्टॅण्ड व्यतिरिक्त इतर रिक्षा थांबे काढणार आहोत. याबाबत लवकरच वाहतूक पोलिसांना कारवाई करण्यास सांगणार आहे.
- विवेक पाटील, वाहतूक पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड
पिंपरी आरटीओ क्षेत्रातील आकडे
२०२३ - ६,०८७
२०२४ - ६,२९४
२०२५ - ३,४६७ (जून अखेर)
-----------
रिक्षा संख्या - ४५,७७७
रिक्षा स्टॅण्ड - ४००-४२५
मान्यता प्राप्त - १२३
---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.