खंडित वीज पुरवठ्याने उद्योगनगरी त्रस्त

खंडित वीज पुरवठ्याने उद्योगनगरी त्रस्त

Published on

पिंपरी, ता. ७ : पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. भोसरी, पिंपरी, चिंचवड, शाहूनगर, थेरगाव, हिंजवडी, वाकडसह अनेक भागांत दिवसातून अनेक वेळा आणि अचानकपणे वीज बंद होत आहे. यामुळे नागरिकांच्या रोजच्या व्यवहारात अडथळा निर्माण होत असून उद्योगधंद्यांनाही मोठा फटका बसत आहे.
महावितरणच्या जुन्या झालेल्या विद्युत वाहिन्या, वेळेवर न होणारी देखभाल-दुरुस्ती, व एकाच फीडरवर जास्त भागांचा भार टाकल्यामुळे वारंवार ‘ब्रेकडाऊन’ होत असल्याचा दावा प्रशासन करत आहे. शहरातील वाढती वस्ती आणि उद्योगधंद्यांच्या वाढत्या मागणीच्या तुलनेत आवश्यक तेवढ्या नव्या वाहिन्या व फीडर जोडल्या गेलेले नाहीत. परिणामी, अनेक भागात लो-व्होल्टेज, अचानक वीज गायब होणे किंवा दिवसभरात अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत. महावितरणकडून दररोज काही तासांसाठी ‘लोड शेडिंग’ केले जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, याबाबत नागरिकांना आगाऊ सूचना दिल्या जात नसल्‍याच्‍या नागरिकांच्‍या तक्रारी आहेत.

संभाजीनगर परिसरात उपकरणांचे नुकसान
शाहूनगर, संभाजीनगरसह आसपासच्या भागात वीजपुरवठ्यात सातत्याने होणाऱ्या कमी-जास्त प्रमाणामुळे नागरिकांच्या घरगुती इलेक्टॉनिक उपकरणांना मोठा फटका बसत आहे. काही ठिकाणी फ्रीज, टीव्ही, पंखे, वॉशिंग मशीनसारखी उपकरणे खराब झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ‘‘दिवसभरात चार-पाच वेळा वीज जाते. कधी व्होल्टेज जास्त, कधी खूपच कमी असते. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने लवकरात लवकर पावले उचलावीत,’’ अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

उद्योगधंद्यांनाही फटका; आर्थिक नुकसान
फक्त रहिवासीच नव्हे; तर औद्योगिक वसाहतींमध्येही खंडित वीजपुरवठ्याचा मोठा फटका बसत आहे. भोसरी, हिंजवडी, वाकड परिसरातील लघु व मध्यम उद्योगधंद्यांचे उत्पादन ठप्प होत आहे. त्यांना लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. ‘‘वर्कशॉप सुरू असताना अचानक वीज जाते. जनरेटर चालवावा लागतो. त्यासाठी इंधनखर्च वाढतो,’’ अशी तक्रार भोसरीतील उद्योजकांनी केली. शहरातील वीजवाहिन्यांचे तातडीने अद्ययावतीकरण करून वेगळी फीडर व्यवस्था करावी व देखभाल-दुरुस्तीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने व्हावीत,’’ अशी मागणी आता जोर धरत आहे.


औद्योगिक परिसरात सातत्‍याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्‍यामुळे दैनंदिन कामकाज कसे करायचे असा प्रश्‍न आहे. महावितरणने तसेच शासनाने एकदाच योग्य मार्ग काढला पाहिजे. महावितरणचे अधिकारीही योग्य उत्तर देत नाहीत.
- दशरथ पिसाळ, उद्योजक. भोसरी

शाहुनगर, संभाजीनगर भागांत सातत्‍याने वीज पुरवठा खंडित होत आहे. घरगुती इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे बंद पडत आहेत. त्‍याचा त्रास सहन करावा लागत आहे.
- दिनेश पाटील, स्‍थानिक रहिवासी

ीदेखभाल दुरुस्‍तीसाठी रविवारी (ता.६) वीज पुरवठा खंडित केला होता. त्‍यानंतर काही काळाने तांत्रिक बिघाडाने पिंपरीतील २० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. हिंजवडीसह काही औद्योगिक चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे नियोजन केले आहे.
- विकास पुरी, जनसंपर्क अधिकारी, महावितरण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com