हिंजवडीवर वीजसंकट; दुरुस्तीवेळी वाहतूक कोंडी

हिंजवडीवर वीजसंकट; दुरुस्तीवेळी वाहतूक कोंडी

Published on

पिंपरी, ता. ७ : महापारेषणच्या अतिउच्चदाब वाहिनीत बिघाड झाल्याने आयटीनगरी हिंजवडीतील वीज पुरवठा रविवारी (ता.६) खंडित आणि नंतर विस्कळित झाला. त्यामुळे येथील दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. तर, फेज २ मध्ये भूमिगत वीज वाहिनी दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने सोमवारी (ता.७) हिंजवडीतील नागरिक व कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांचे पुरते हाल झाले. वारंवार वाहतूक कोंडी, पावसामुळे जलकोंडी आणि आता वीज कोंडी अशा समस्यांमुळे आयटी कर्मचारी व स्थानिक रहिवाशांचे पुरते हाल होत आहेत.


हिंजवडी फेज -२ मेट्रो स्थानकाजवळ महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही इन्फोसिस ते २२० केव्ही पेगासस रविवारी (ता.६) अतिउच्चदाब भूमिगत वीज वाहिनीत दुपारी दोनच्या सुमारास बिघाड झाला. यामुळे महावितरणच्या सुमारे ५२ हजारांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा रविवारी दुपारपासून ठप्प झाला. यामध्ये एक्सरबिया सोसायटी, कोलते पाटील टाऊनशिप, मारुंजी, माण, जांबे, नेरे, दत्तवाडी तसेच हिंजवडी एमआयडीसी, आयटी पार्क, रायसोनी पार्कचा काही भाग, डॉहलर कंपनी तसेच विप्रो सर्कलच्या परिसराला याचा फटका बसला. तर इन्फोसिस, नेक्स्ट्रा यांच्यासह ९१ अचिउच्चदाब ग्राहकांना वीजपुरवठा खंडित झाला.
दुरुस्तीसाठी लागणार तीन ते चार दिवस
हिंजवडीतील २२० केव्ही अतिउच्चदाब वाहिनीमध्ये झालेला बिघाड हा मोठा असल्याने दुरुस्तीला तीन ते चार दिवस लागणार आहेत, अशी माहिती महावितरण प्रशासनाने दिली. त्यामुळे सोमवारी (ता.७) भागातील रहिवासी व कंपन्यांना चक्राकार वीजपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, तो पर्यायी व्यवस्थेने सुरू असल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता, अशी तक्रार नागरिकांनी केली. हे काम होण्यासाठी उशीर लागणार असल्याने टीसीएस, डीएलएफ, आयगेट पटाणी (कॅप इंडिया), दाना इंडिया, आयबीएम, टेक महिंद्रा, विप्रो, डायनेस्टी, कॉगनिझंट, ॲसेंडास या औद्योगिक ग्राहकांना प्रत्येकी पाच तास चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा करण्यात आला.

आयटी कर्मचारी दुहेरी कचाट्यात
वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी फेज-२ मधील दोहलर कंपनीसमोर रविवारपासूनच काम सुरू झाले. यासाठी रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली होती. या बिघाडाचे स्वरूप पाहता आयटी कंपन्यांनी सोमवारी ‘वर्क फ्रॉम होम’ द्यावे अशी मागणी आयटी संघटनांकडून होत होती. मात्र, काही वगळता अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सुविधा नाकारली. तसेच, फेज २ व फेज ३ मधील रहिवासी भागातील वीज नसल्याने येथील कर्मचाऱ्यांनी कार्यालयात जाणे पसंत केले. त्यामुळे, बहुतांश रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. कंपनीत जावे तर कोंडी; घरून काम करावे तर वीज संकट अशा कचाट्यात आयटी कर्मचारी अडकले.

काय झाले
- देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी सकाळी ११ ते १ असा वीजपुरवठा बंद
- २ वाजून १० मिनिटांनी २२० केव्ही इन्फोसिस ते पेगासस अतिउच्चदाब भूमिगत वीज वाहिनीत मोठा बिघाड
- रविवारी रात्री १० वाजता दोन हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू
- सोमवारी पहाटे चारपर्यंत सर्व लघुदाब ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केल्याचा दावा
- फेज २ व फेज ३ मधील रहिवासी भागांत सकाळी सातनंतर वीजपुरवठा सुरू
- औद्योगिक ग्राहकवगळता सर्व भागांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरू
- माण, भोईरवाडी भागात ३० तासांपेक्षा अधिक काळ वीज खंडीत

वेळोवेळी देखभाल न केल्याने हिंजवडीत वीजपुरवठा खंडित होणे वाढत आहे. अतिउच्चदाब वाहिनीत बिघाड ही एका प्रकारची आपत्कालीन स्थिती आहे. फेज २ मध्ये रविवारपासून हे काम सुरू होते, याची माहिती महापारेषणने पीएमआरडीए किंवा जिल्हाधिकाऱ्यांना देऊन आयटी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याची सूचना कंपनी व्यवस्थापनाला देणे गरजेचे होते. मात्र, तसे न झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांना दूरवरून कंपनीत यावे लागले. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली. पुढील दोन दिवसांत तरी वर्क फ्रॉम होम द्यावे.
- पवनजीत माने, अध्यक्ष, ‘एफआयटीई’

माणमधील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित आहे. दोन-तीन सोसायट्यावगळता इतरत्र वीज आलेली नाही. आम्ही अधिकाऱ्यांशी संपर्क करायचा प्रयत्न केला; मात्र त्यांचे फोन लागत नाहीत. कोहिनूर, कोरल ३२ पाईनवूड, टिंसेल काऊंटी येथील अनेक रहिवासी रविवार पासून अंधारात आहेत.
- सुजित चव्हाण, रहिवासी, भोईरवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com