कै.कृष्णराव भेगडे ; मावळला वैचारिक दिशा देणारे विद्यापीठ

कै.कृष्णराव भेगडे ; मावळला वैचारिक दिशा देणारे विद्यापीठ

Published on

भेगडे लेख. जाहिरात विभाग.
--------------------------
कै. कृष्णराव भेगडे ; मावळला वैचारिक दिशा देणारे विद्यापीठ
- चंद्रकांत शेटे (कार्यवाह-इंद्रायणी विद्या मंदिर संस्था,तळेगाव दाभाडे).

आयुष्याच्या शेवटपर्यंत लोकसेवेचा ध्यास घेतलेले राजकीय नेते या महाराष्ट्राने बघितले. त्यातील कृष्णराव भेगडे हे महत्त्वाचे नाव. जनसंघ, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रदीर्घ राजकीय वाटचालीतून सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श वस्तू पाठ निर्माण करणारे कृष्णराव भेगडे हे एक महत्त्वाचे राजकीय नेते ठरले. लहानपणी मामाच्या घरी भेगडे आळी मध्ये राहताना त्यांचा सहवास लाभला. सामान्य माणसाचे वर्तन कसे असावे, याचा आदर्श घालून देत त्यांनी माझ्यासारखे अनेक सर्वसामान्य कार्यकर्ते उभे केले. स्वच्छ राजकारण कसे करावे, याचे एक आदर्श उदाहारण त्यांनी घालून दिले. शिक्षकाची नोकरी ते चार वेळा आमदार या कारकिर्दीत साहेबांनी समाजसेवेचा वारसा कुठेही सोडला नाही. मला आठवतेय १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या ३०० मतांनी भेगडे साहेबांचा पराभव झाला. त्या दिवशी तळेगावात एकही चूल पेटली नव्हती. विजय-परजयानेही त्यांचा स्वभाव कधी बदलला नाही. त्यानंतर नाउमेद न होता पाच वर्षे त्यांनी बैलगाडीत फिरून अवघ्या मतदारसंघाला आपले कुटुंब बनविले. जनतेच्या सुख-दुःखामध्ये ते सहभागी असायचे. राजकीय अथवा कौटुंबिक ते भांडण कसे मिटवायचे आणि संबंध कसे टिकवायचे याचे कसब लाभलेला नेता भेगडे साहेब म्हणजे सुप्रीम कोर्टच होते जणू.

त्यानंतर १९७२ मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर रेडिओवरील विधानसभेच्या समालोचनात भेगडे साहेबांचे रोज नाव असे. विरोधी पक्ष असो की सत्ताधारी. तत्कालीन विधिमंडळाच्या निर्णयप्रक्रियेत त्यांचे मानाचे स्थान असे. विरोधी पक्षात असताना सुद्धा विधानसभेत कामकाज कस चालू ठेवायचे, याचे आदर्श उदाहरण भेगडे यांनी घालून दिले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कृष्णराव भेगडे यांच्यातील नेतृत्व गुण वेळीच ओळखून आपल्याकडे खेचत कृष्णरावांच्या राजकीय आयुष्याला एक वैचारिक दिशा दिली. तोच आदर्श कृष्णरावांनी मावळ भूमीत रुजवला. सत्तेचे आणि पैशांचे राजकारण त्यांनी कधीच केले नाही. तर इथल्या गाव, मातीचे समाजकारण केले. या भूमीतला माणूस त्यांनी स्वतःच्या पायावर उभा केला. केंद्रातील संरक्षण मंत्रिपद सोडून राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेल्या आदरणीय शरद पवार यांच्यासाठी आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा देणारे कृष्णराव भेगडे राजकीय परोपकाराचे मूर्तिमंत उदाहरण ठरले. त्यांची तत्कालीन सभागृहातील आदर्श भाषणे आजही विधीमंडळाच्या ग्रंथालयात वाचनासाठी उपलब्ध आहेत. परराज्यात जाणारे उद्योगधंदे महाराष्ट्रात थोपविण्यासाठी उद्योगांना जागा राखीव ठेवाव्यात. धरणे बांधून पाणीपुरवठ्याची सोय व्हावी. तसेच पुणे-मुंबई आणि पुणे-नाशिक रस्ता व्हावा, यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना निवेदनातून मागणी केली होती. त्यांच्या मागण्यांची पूर्तता आजमितीला प्रत्यक्षात आलेली मावळातील धरणे, उद्योग आणि महामार्गांच्या विकासावरुन झाल्याची प्रचिती येते.

भेगडे साहेब फक्त महाराष्ट्र पातळीवर थांबले नाहीत. यूएलसी कायद्यानंतर भेगडे साहेब आणि मदन बाफना यांनी कलम २०-अंतर्गत तयार केलेल्या मसुद्यामुळे सर्वसामान्यांना शहरी भागात भूखंड विकत घेऊन आपली हक्काची घरे बांधता आली. याच समितीचा मसुदा तळेगाव पॅटर्न म्हणून भारतभर प्रसिद्ध झाला. १९७१ मध्ये वडगाव मावळ येथे हजारो ठाकर, फासेपारधी, आदिवासी यांनी एकत्र येऊन केलेल्‍या ''जमीन बळकावू'' आंदोलनाची दखल सरकारला दखल घेऊन आदिवासींना जमीन वाटप करावे लागले. त्या आंदोलनाची धग ओळखून सरकारला याबाबत निर्णय घेण्यास भेगडे साहेबांची दूरदृष्टी कारणीभूत ठरली. नॅशनल हेवी सारखी मोठी सहकारी कंपनी तळेगावात उभारण्याकामी त्यांचा सिंहाचा वाटा होता. भेगडे साहेबांच्या प्रयत्नांतून राज्यभरातील ग्रामपंचायत नगरपरिषदांचे पाणीपुरवठ्याचे वीज बिल कमी झाले. नव्वदच्या दशकात उसाचे कांडे मिळत नव्हते. अशा मावळ तालुक्यात संत तुकाराम सहकारी साखर कारखाना उभारण्याकामी पुढाकार घेऊन त्यांनी मावळ, मुळशी, खेड तालुक्यातील शेकडो बेरोजगार युवक आणि हजारो शेतकऱ्यांच्या हाताला काम दिले. जगाच्या नकाशावर नाव कोरलेली मावळातील तळेगाव एमआयडीसी उभी करण्यामागे देखील त्यांचे मोठे योगदान आहे. जात-धर्म-पंथ या लौकिक भेदांच्या पलिकडे जाऊन समग्र समाजाच्या पुनर्मांडणीसाठी भेगडे साहेबांनी मावळभूषण कै.मामासाहेब खांडगे, कै. बाळासाहेब बारमुख, कै.दादासाहेब परांजपे, कै.बाळासाहेब किबे, कै.केशवराव वाडेकर, कै.दादासाहेव ढोरे, कै.वसंतदादा खांडगे, कै.अण्णासाहेब शेलार,कै. सुरेशभाई शहा, कै.मुकुंदराव खळदे यांच्यासारख्या जाणत्या आणि आपापल्या पातळीवर विविध क्षेत्रांमध्ये नेतृत्व करणाऱ्या मंडळींना एकत्रित करून मावळ तालुक्याच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात वैचारिक आणि न्यायिक मेळ साधला.

मावळला वैचारिक दिशा देणारे विद्यापीठ ते एक विद्यापीठच होते. जणू.१९८१च्या काळात बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्‍या इंद्रायणी महाविद्यालयाच्या अध्यक्षपदाची माळ तत्कालीन खासदार रामकृष्ण मोरे यांच्या गळ्यात घालून, त्यांच्याकरवी १० लाखांच्या कर्जाचा बोजा उतरवून संस्थेचे पुनरुज्जीवन त्यांनी केले. आज उभा असलेला इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचा डोलारा ही भेगडे साहेबांचीच देन आहे. पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकसाठी त्यांनी २५ एकर जमीन विनामोबदला संस्थेच्या नावावर करुन दिली. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय उभे करण्यासाठी त्यांनी प्रसंगी पदरमोड केली. आंदर मावळातील आदिवासी आश्रम शाळा तसेच लोणावळ्यात तंत्रशिक्षण देणाऱ्या ''आयटीआय''ची उभारणी भेगडे साहेबांचीच देन आहे. कायम आपल्या विचारांशी प्रामाणिक राहिलेल्या भेगडे साहेबांच्या दूरदृष्टीतुन आणि धडपडीतून मावळ तालुक्यात उभ्या राहिलेल्या याच शिक्षण संस्थांनी या तालुक्याला मोठे ज्ञान भंडार दिले. एकंदरीतच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक अशा सर्वांगीण विकासाची सर्वांगीण दूरदृष्टी लाभलेला, यशवंतराव चव्हाणांच्या विचारसरणीवर चालणारा, त्यांचे विचार ओतप्रोत भरलेला नेता म्हणजे कै.भेगडे साहेब होते. आज ते जरी आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेली वैचारिक शिदोरी मावळच्या पुढील कित्येक पिढ्यांसाठी सर्वांगीण विकासाची भूक शमविणारी ठरेल यात शंका नाही. त्यासाठी विचारांच्या वाटेवर चालण्याचा संकल्प प्रत्येकाने करायला हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com