‘व्हॉट्सॲप’द्वारे वाहन ‘पार्किंग’ सुविधा
पिंपरी, ता. ९ ः महापालिकेच्या ‘पे अॅण्ड पार्क’ उपक्रमासह ‘व्हॉट्सॲप पार्किंग’ सुविधेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते उद्घाटन होईल. त्यामुळे वाहनचालकांना आता अधिक सुलभ पद्धतीने ‘पार्किंग बुक’ करता येईल.
महापालिका भवनात स्थायी समितीची बैठक आयुक्त सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप उपस्थित होते. पिंपळे निलख परिसरातील नाल्यांची स्थापत्य विषयक कामे करणे, नालेसफाई करणे, शहरातील दिव्यांगांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, त्यांचे सामाजिक व आर्थिक जीवनचक्राचे मॅपिंग करणे, कुकीनाला दुरुस्तीची कामे करणे, रस्ते- उद्याने- मोकळ्या जागांवर वृक्षारोपण करणे, मोशी कचरा डेपोतील जुन्या डंपिंग कचऱ्याचे बायोमायनिंग करणे, महापालिका पदव्यूत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे गरजू रुग्ण सहाय्यता निधी संस्था सुरू करणे, मोशीत छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी ताब्यात आलेल्या उर्वरित जागेत स्थापत्य व विद्युत विषयक कामे करणे आदी विषयांच्या खर्चास आयुक्तांनी मान्यता दिली.
‘पे ॲन्ड पार्क’ आणि ‘व्हॉट्सॲप पार्किंग’
- ‘व्हॉट्सॲप पार्किंग’ सुविधेमुळे नागरिक थेट ‘वाहन पार्किंग बुक’ करू शकतात, हे बुकिंग वापरकर्त्याच्या नावाने निश्चित वेळेसाठी ठेवले जाते
- वाहन वेळेत पार्क न केल्यास वापरकर्त्याला तत्काळ सूचना पाठवली जाते आणि ती जागा पुढील नागरिकासाठी खुली केली जाते
- पार्किंग सेवेमुळे कागदपत्रे किंवा तिकिटाची गरज नसून, प्रत्यक्ष (रिअलटाईम) माहिती आणि आरक्षण स्थिती (बुकिंग स्टेटस) व्हॉट्सऍपवरच मिळणार
शहरातील १० ठिकाणी ‘पे ॲन्ड पार्क’ आणि ‘व्हॉट्सॲप पार्किंग’ सुविधा कार्यान्वित झाली आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाचून पार्किंग व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होईल. स्मार्ट अलर्ट्सद्वारे वेळेचे व्यवस्थापन होऊन पार्किंग प्रक्रियेत सुसूत्रता आणि वेळेचा अपव्यय टळून वाहतूक व्यवस्थेतही सुधारणा होईल.
- बापूसाहेब गायकवाड, सहशहर अभियंता, महापालिका