अल्पवयीन मुलावर हत्याराने वार
पिंपरी, ता. ९ : ‘तू मोटू आहेस’ असे चिडविल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका अल्पवयीन मुलावर धारदार हत्याराने वार करण्यात आले. ही घटना पिंपळे सौदागर येथील येथे मंगळवारी घडली.
राजवीर नाणेकर (वय १४) असे या घटनेत जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. एक अल्पवयीन मुलगा पिंपळे सौदागर येथील एका शाळेत इयत्ता नववीत शिकत असून त्यास एकाने ‘तु मोटू आहेस’ असे चिडवल्याने त्यांच्यात बाचाबाची झाली होती. दरम्यान, याबाबत संबंधित मुलाने त्याच्या मोठ्या भावाला सांगितले. त्यानंतर त्या मुलाचा भाऊ त्याच्या दोन साथीदारांना घेऊन चिडवलेल्या मुलाला मारण्यासाठी आला. त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी तेथे राजवीर नानेकर आणि आणखी एकजण हजर होता. भांडण सुरू असताना राजवीर याने तुम्ही का भांडण करता असे विचारले असता अल्पवयीन आरोपींनी धारदार हत्याराने राजवीर याच्यावर वार केले. यामध्ये राजवीर याच्या डोळ्याला व पाठीला दुखापत झाली. याप्रकरणात दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू असल्याचे सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी सांगितले.