सेवा रस्ता दुरुस्तीवरून मेट्रो-महापालिकेत जुंपली

सेवा रस्ता दुरुस्तीवरून मेट्रो-महापालिकेत जुंपली

Published on

अविनाश ढगे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ९ : पिंपरी ते निगडी भक्ती-शक्ती मार्गावर पावसामुळे खड्डे पडून रस्त्यांची चाळण झाली आहे. पण, आता या रस्त्याची दुरुस्ती करायची कोणी? यावरून मेट्रो आणि पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनात यांच्यात जुंपली आहे. दोन्ही प्रशासनांनी रस्ते दुरुस्तीवरून एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. या वादात प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

जुन्या पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी निगडी ते दापोडीदरम्यान ११ किलोमीटरचे तीन ग्रेड सेपरेटर, आठ भुयारी मार्ग आणि दोन उड्डाणपूल बांधण्यात आले. ग्रेड सेपरेटरमधून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. याच मार्गावरील सेवा रस्त्यावरूनही दररोज मोठ्या संख्येने वाहने ये-जा करतात. पण, गेल्या काही दिवसांत या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. यामुळे वाहनांचा वेग मंदावत आहे. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

पिंपरी ते भक्ती-शक्तीपर्यंत विस्तारित मेट्रो मार्गाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे सेवा रस्ता अरुंद झाला आहे. तेथेही खड्डे पडले आहेत. पण, हा रस्ता दुरुस्त करायचा कोणी, यावरून महापालिका प्रशासन आणि मेट्रो प्रशासन तू-तू मै-मै सुरु झाली यांच्यात ‘तू-तू-मै-मै’ सुरू आहे. मेट्रोच्या कामासाठी पिंपरी ते निगडी रस्ता महामेट्रो प्रशासनाकडे हस्तांतरित केल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले; तर मेट्रोचे काम सुरू आहे, तेथील रस्ता दुरुस्तीची जबाबदारी मेट्रोची असल्याचे सांगून उर्वरित रस्ता दुरुस्त करण्यावरून मेट्रो प्रशासनाने हात झटकले आहेत.
दरम्यान, मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणांव्यतिरिक्त अन्यत्रही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. ते दुरुस्त कोण आणि कधी करणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
---------
निगडी ते दापोडी मार्गावर कुठे आहेत खड्डे ?
- बजाज गेट
- फोर्स मोटर्स
- आकुर्डी खंडोबा माळ चौक
- गोदावरी हिंदी शाळेसमोर
- काळभोरनगर
- टायटन शोरूम
- सेंट झेविअर्स चर्च
- चिंचवड स्टेशन सिग्नल
- नाशिक फाटा (भोसरी मेट्रो स्टेशन)
- कासारवाडी
- कुंदननगर, फुगेवाडी
- शंकरवाडी
- कोहिनूर बी-झोनसमोर
- विजय सेल्स
- संत मदर टेरेसा उड्डाणपुलाच्या पुढे
- आकुर्डी तुळजाभवानी मंदिर
----------
निगडी ते चिंचवड प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत असते. रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा.
- आनंद वाघाडे, नागरिक

सेवा रस्त्यावरून दुचाकी घेऊन जाणे म्हणजे जीव धोक्यात घालून प्रवास करणे अशीच परिस्थिती आहे. इतके खड्डे पडले आहेत, ते प्रशासनाला दिसत नाही का?
- पैगंबर दिवाळे, दुचाकीचालक

खराब रस्त्यांमुळे मान-पाठीचा त्रास होत आहे. प्रशासनाला कररूपी महसूल देऊनही चांगले रस्ते नाहीत; हे पिंपरी-चिंचवडकरांचे दुर्भाग्य आहे.
- गणेश आल्हाट, ज्येष्ठ नागरिक

मेट्रोचे काम सुरू असल्याने तेथील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी मेट्रो प्रशासनाची आहे. मेट्रो प्रशासनाला ते रस्ते दुरुस्त करण्यासाठी सांगितले आहे.
- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

मेट्रोचे काम सुरू आहे, तेथील रस्ते दुरुस्ती आम्ही करू. पण, इतर ठिकाणच्या रस्ते दुरुस्तीची जबाबदारी मेट्रोची नाही. पालखी सोहळ्यापूर्वी सेवा रस्ता दुरुस्त केला. पण, पावसामुळे खराब झाला असेल. पुन्हा एकदा रस्ता दुरुस्तीचे काम लवकरच सुरू करणार आहोत.
- हेमंत सोनावणे, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो

PNE25V29969, PNE25V29966

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com