वारसा हक्क नोंदवण्यासाठी जाचक अटी

वारसा हक्क नोंदवण्यासाठी जाचक अटी

Published on

अमोल शित्रे ः सकाळ वृत्तसेवा

पिंपरी, ता. ९ ः म्हाडाच्या संत तुकारामनगर पुनर्वसन प्रकल्पातील सुमारे २५० घरे वारसदारांच्या नावावर करण्यात अडचणी येत आहेत. घराची मूळ कागदपत्रे गहाळ झाल्यामुळे ती मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. याशिवाय, ज्याच्या नावावर घर आहे; ती व्यक्ती निधन पावल्यानंतर वारसा हक्काने संबंधित मिळकत वारसदारांच्या नावे करण्यासाठी न्यायालयाचे संमतीपत्र मागितले जात आहे. अशा अनेक जाचक अटी लागू केल्यामुळे घरे नावावर करण्यासाठी रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

राज्य गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) अंतर्गत संत तुकारामनगर येथे ४० वर्षांपूर्वी बांधलेल्या ९४१ घरांची आता पडझड सुरू झाली आहे. रहिवाशांना नव्याने हक्काची घरे बांधून मिळावीत, यासाठी नागरिकांनी खासगी बांधकाम व्यावसायिकाच्या माध्यमातून पुनर्वसन प्रकल्प बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्व रहिवाशांनी एकत्र येऊन संत तुकारामनगर सहकारी गृहरचना संस्थेची स्थापना करण्यात केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून संत तुकारामनगर येथे म्हाडाचा खासगी पुनर्वसन प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. मात्र, ९४१ लाभार्थ्यांपैकी सुमारे २५० मालमत्ता ज्यांच्या नावावर आहेत; त्यातील अनेकजण सध्या हयात नसल्यामुळे त्या मालमत्ता वारसदारांच्या नावावर करण्यात अडचणी येत आहेत. सर्व कागदपत्रांसह वारसदारांची संमती असताना देखील घरे नावावर केली जात नाहीत. अनेकजणांची मूळ कागदपत्रे सापडत नसल्यामुळे मोठी अडचण झाली आहे. त्यातच म्हाडाच्या नवीन नियमांमुळे अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वारसदारांच्या संमतीवरही हरकत
निबंधक (रजिस्ट्रार) यांच्या माध्यमामधून मालमत्ता नावावर करण्याची प्रक्रिया होत असताना न्यायालयात सुनावणी घेऊन संमतीपत्र सादर करण्यास सांगितले जात आहे. एखाद्या व्यक्तीला तीन वारसदार असतील आणि एकाच्या नावावर मालमत्ता करण्यास दोघांनी संमती दिलेली असताना सुद्धा त्यावर हरकत घेतली जात आहे. त्यामुळे रहिवासी मेटाकुटीला आले असून या पुनर्वसन प्रकल्पाला गती मिळत नसल्याचे चित्र आहे.

काय आहेत जाचक अटी...
- मूळ कागदपत्र हरवले
- नाते संबंधाचा दाखला
- वारसांमधील वाद
- कायदेशीर गुंतागुंत
- थकीत हस्तांतरण शुल्क
- जुनी थकबाकी, देखभाल शुल्क
- नवीन नियमावलीचा परिणाम


सुमारे २५० घरे मूळ मालकांच्या व वारसदारांच्या नावावर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी म्हाडाचे नियम जाचक असल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नियम शिथील करण्याची म्हाडाकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. या घरांचा प्रश्न सुटल्यानंतर पुनर्वसन प्रकल्पाच्या विकासाला गती मिळेल.
- यशवंत भोसले, अध्यक्ष, संत तुकारामनगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com