आमदार आक्रमक; नागरिकही संतप्त
पिंपरी, ता. ९ ः पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीसह परिसराला वाहतूक कोंडीने ग्रासले आहे. याबाबत ‘सकाळ’ने सोमवारी सायंकाळी शहरातील आठ मुख्य रस्त्यांवरील २१ ठिकाणची पाहणी करून बुधवारी (ता. ९) ‘शहरालाच कोंडीचा विळखा’ असे वृत्त प्रसिद्ध केले. त्यावर आमदार महेश लांडगे आणि आमदार राहुल कुल यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी ‘लक्षवेधी’ मांडली. शिवाय, वाहतूक कोंडीबाबत नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त करत कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर कारवाईची मागणी केली.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहर परिसरातील वाहतूक कोंडीची २६ ठिकाणे निश्चित केली आहे. शिवाय, ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीतही काही कोंडीची ठिकाणे आढळली आहेत. त्यातील आठ रस्त्यांवरील अधिक कोंडीची २१ ठिकाणे निश्चित करून ‘सकाळ’ने सोमवारी सायंकाळी वस्तुस्थिती जाणून घेतली. त्याबाबतचे वृत्त बुधवारी (ता. ९) प्रसिद्ध झाले. या कोंडीबाबत विधिमंडळ अधिवेशनात आमदार लांडगे व आमदार कुल यांनी ‘लक्षवेधी’ मांडली. दरम्यान, ‘सकाळ’ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनीही कोंडीमुक्त शहरासाठी आपली मते मांडली.
नागरिक म्हणतात....
शहरात सतत वाहतूक कोंडी होत आहे. कारण, अरुंद रस्ते, पदपथावर बेवारस व नादुरुस्त वाहने वर्षानुवर्षे पडून आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होते. चालू वाहने उभी करायला जागा मिळत नाही. बेवारस वाहनाखाली कचरा, घाण जमा होऊन रोगराई, डासांची उत्पत्ती होते. अशा वाहनांवर कारवाई करावी. याबाबत वारंवार भेटूनही अधिकारी, कर्मचारी कार्यवाही करत नाहीत. त्यांच्यावरही कारवाई करावी.
- दि. चं. बाफना, वाकड
‘सकाळ’च्या उपक्रमाला पिंपरी-चिंचवडकर म्हणून सलाम करतो. पिंपरी-चिंचवडमधील बीआरटी सेवा बंद केल्यास मोठ्या प्रमाणात कोंडी कमी होण्यास मदत होईल. सुशोभीकरण्याच्या नावाखाली करण्यात आलेल्या देखाव्यांची लांबी व रुंदी कमी करावी. चौकांतील रिक्षावाल्यांची जागा थोडी मागे किंवा पुढे करावी, त्यामुळे काही प्रमाणात कोंडी कमी होण्यास मदत होईल.
- दीपक दातीर
प्रथम ‘सकाळ’चे अभिनंदन. आज ‘टुडे’मध्ये आपण शहरातील मुख्य वाहतूक कोंडीवर प्रकाश टाकला. शहरातील कामगार, सर्वसामान्य नागरिक, शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक वाहतूक कोंडीमुळे खूपच त्रस्त आहेत. आज आपण शहरातील मुख्य व ज्वलंत प्रश्न मांडला आहे. वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सर्व आपल्या बरोबर आहोत.
- चंद्रकांत साहेबराव वाळके, दिघी
प्रामुख्याने चौक व छोटे-मोठे सिमेंट रस्त्यांवर डावीकडे वळण्यासाठी कोणतेही उपाययोजना नाही. सरळ जाणारा वाहनचालकही डाव्या बाजूला येऊन थांबतो. त्यामुळे डावीकडे वळणाऱ्यांची कोंडी होते. त्या वाहनचालकांना विनाकारण थांबवावे लागते. अशा ठिकाणी कायमस्वरूपी बॅरिकेड्स किंवा कॉंक्रिटचे मोठे ब्लॉक बसवायला हवेत. सरळ जाणारी वाहने मध्येच थांबणार नाहीत. डावीकडची वाहने निघून जातील. त्यांना सिग्नलची अट नसावी. मुंबई व इतर राज्यांच्या शहरांमध्ये अशी सोय आहे.
- मारुती भातकांडे
प्रफुल्ल बाबर म्हणतात...
- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी
- सम तारखेला ‘सम नंबर’ची वैयक्तिक वाहने रस्त्यावर आणणे
- विषम तारखेला ‘विषम नंबर’ची वैयक्तिक वाहने रस्त्यावर आणावीत
- वैयक्तिक वाहनधारकांनी (समान रस्त्यावर प्रवास करणार असतील तर) शक्यतो जास्तीत जास्त मित्रांना, शेजाऱ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना, प्रवाशांना (पैसे घेऊन अथवा मोफत) लिफ्ट द्यावी किंवा घ्यावी
- शनिवार-रविवारी साप्ताहिक सुट्टी देण्यापेक्षा कॉर्पोरेट कंपन्या, आस्थापना, कारखाने, शॉपिंग मॉल्स यांनी १/३ प्रमाणे कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्ट्यांचे वार ठरवून द्यावे.
- कर्मचाऱ्यांच्या सोयीनुसार सण-समारंभाच्या सुट्ट्या द्याव्यात, त्यामुळंच विशिष्ट दिवशीच होणारी गर्दी कमी घटून वाहनांच्या रांगा कमी होतील
- दररोज १०० टक्क्यांऐवजी किमान ३५ टक्केच वाहने रस्त्यावर यावीत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.