कोंडीमुक्त वाहतुकीसाठी ‘ॲक्शन प्लॅन’
पिंपरी, ता. ९ ः ‘‘पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी आढावा बैठक घेण्यात येईल. त्यामध्ये महापालिका, एमआयडीसी, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग अशा संबंधित अधिकाऱ्यांना कालबद्ध कार्यक्रम आखून देण्यात येईल. भूसंपादनाचा प्रमुख अडथळा असल्यामुळे मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेईल. पुणे रिंगरोड, नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर यासारख्या प्रमुख प्रकल्पांचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार केला जाईल,’’ असे आश्वासन कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांनी दिले.
पुणे रिंगरोडचे काम रखडले असून त्याला गती मिळावी, यासह शहराच्या सभोवताली व अंतर्गत रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्राधान्याने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांनी विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधीद्वारे केली. त्यावर मंत्री भुसे यांनी वरील उत्तर दिले. भुसे म्हणाले, ‘‘पुणे रिंगरोड, पुणे - बंगळरू महामार्ग, पुणे - नाशिक महामार्ग यांच्या प्रस्तावित कामांसाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक अधिवेशन संपण्यापूर्वी नियोजित केली जाईल. स्थानिक पातळीवर असलेल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन भूसंपादन करत आहोत. नऊ पॅकेजमध्ये पुणे रिंगरोड होणार आहे. त्याचे काम सुरू झाले आहे. आगामी तीन वर्षांत रिंगरोड पूर्ण करण्याचे नियोजन आहे.’’
अधिकारी-लोकप्रतिनिधींची बैठक घ्या
पुणे - नाशिक महामार्गासाठी भूसंपादन करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपलिका, पुणे प्रादेशिक क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्यासोबत राज्य सरकारने निधी उभारावा. हिंजवडी आयटी हबची जगभरात ओळख आहे. पण, काही दिवसांपूर्वी पावसामुळे रस्ते कॅनॉल झाले. रस्त्यांची कामे निश्चित वेळेत पूर्ण होत नाहीत. कारण, भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. चांगला परतावा दिल्यास शेतकरी जागा देतील. भूसंपादनासाठी अडचणी येत आहेत; तर जिल्हाधिकारी प्रशासनाने ‘इंटिग्रेटेड ॲथॉरिटी’ तयार करावी. २०३० पर्यंत ‘महाराष्ट्र फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी’, असा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचे योगदान राहणार आहे. पण, त्यासाठी लागणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधांमधील प्रमुख सेवा रस्ते आहेत. त्यामुळे रस्ते कोंडीमुक्त झाले पाहिजेत. यावर उपाययोजना करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली.
आमदार महेश लांडगे म्हणाले...
हिंजवडी आयटी हब, ऑटो हब, पुणे विमानतळ अशा महत्त्वाच्या ठिकाणांच्या मध्यावर असलेले पुणे, पिंपरी चिंचवड शहर मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात आहे. नागरिकांमध्ये नाराजी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पुढील वर्षभरात एक लाखाहून अधिक वाहने रस्त्यावर येणार आहेत. तळेगाव- शिक्रापूर, वाघोली-शिरूर, हडपसर-दौंड या रस्त्यांची काम सुरू होत आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकारचे आभारी आहोत. पण, पुणे रिंगरोड, पुणे - नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते खेड या एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम भूसंपादनाअभावी रखडले आहे. तसेच पुणे-बुंगळरू महामार्ग आणि हिंजवडी आयटी हब कोंडीमुक्त करण्यासाठी रस्त्यांच्या प्रस्तावित कामांना गती देण्याची आवश्यकता आहे.
आमदार राहुल कुल म्हणाले...
पुण्यातील वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मन:स्ताप होत आहे. शहराच्या अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडी, शहराला जोडणारे रस्ते व त्यावरील वाहतूक समस्या असे दोन वेगळे विषय आहेत. महायुती सरकारने हडपसर ते यवत आणि पुणे ते शिरूर आणि पुणे रिंगरोडच्या कामाला मंजुरी दिली. सदर मार्ग चार वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहेत. निश्चित कालावधीमध्ये प्रकल्प पूर्ण होण्यासाठी समन्वय यंत्रणा तयार करावी. प्रत्येक महिन्याला बैठक घेऊन प्रकल्पाच्या प्रगतीबाबत लोकप्रतिनिधींना माहिती द्यावी. रस्त्यांची दुरवस्था, अतिक्रमण आणि स्मार्ट सिटीमुळे रस्त्यांची रुंदी
कमी झाली आणि पदपथ स्मार्ट झाले आहेत. त्यामुळे, पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात.
कोंडीवरुन कुल दुसऱ्यांदा आक्रमक
खुटबाव ः पुणे शहरातील व शहराबाहेरील वाहतूक कोंडी समस्येबाबत आमदार राहुल कुल हे आठवडाभरात सलग दुसऱ्यांदा विधानसभा सभागृहात आक्रमक झाले. त्यांचा प्रश्न लवकर संपवण्यासाठी तालिका अध्यक्ष समीर कुणावर आग्रही होते. त्यावर कुल यांनी वाहतूक कोंडीचे गांभीर्य आक्रमक शब्दांत मांडले. मंत्री दादा भुसे यांनी पुणे मेट्रोचा विस्तार यवतपर्यंत होणार असल्याची माहिती दिली.
विधानसभा अधिवेशनामध्ये कुल यांनी शुक्रवारी (ता. ४) पुणे शहरातील वाहतूक कोंडीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. आज दुसऱ्यांदा लक्षवेधी मांडताना ते म्हणाले, ‘‘पुणे परिसरातील वाहतूक कोंडीबाबत जिल्हाधिकारी, आयुक्त व लोकप्रतिनिधींची दर आठवड्याला आढावा बैठक घेणे गरजेचे आहे. पुण्याची ओळख जगातील वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरांमध्ये झाली आहे. स्मार्ट सिटी करताना पुण्यातील अनेक रस्त्यांची रुंदी कमी झाली. पादचारी मार्ग वाढवले आहेत. शहरात आणीबाणीची परिस्थिती आहे. वाहतूक पोलिसांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे पुणे रिंगरोड, हडपसर-यवत उन्नत मार्ग, पुणे-शिरूर उन्नत मार्ग व पुणे-छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड सहापदरी मार्ग यांचे काम कधी पूर्ण होणार?’’
मंत्री दादा भुसे म्हणाले, ‘‘पुणे शहराबाहेरील १६८ किलोमीटर लांब असणाऱ्या रिंगरोडचे काम नऊ ते १० टक्के पूर्ण झाले असून आगामी तीन वर्षांत हे काम पूर्ण होईल. हडपसर ते यवत उन्नत मार्ग तसेच वाघोली ते शिरूर उन्नत मार्गाचे काम आगामी चार वर्षांत पूर्ण होईल. ग्रीनफिल्ड महामार्गाचे कामही वेळेत पूर्ण होईल. याशिवाय हडपसर ते यवत महामार्गावर मेट्रो संरचना अंतर्भूत करण्यात आली आहे. यासाठी वाढीव खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.