‘ज्येष्ठानुबंध ॲप’ ठरतोय ज्येष्ठांना आधार

‘ज्येष्ठानुबंध ॲप’ ठरतोय ज्येष्ठांना आधार

Published on

पिंपरी, ता. ११ : ‘मुलगा मला त्रास देऊन घराच्या बाहेर काढत होता, मी ‘ज्येष्ठानुबंध ॲप’च्या माध्यमातून पोलिसांशी संपर्क साधला. काळेवाडी पोलिस ठाण्यातील दोन अंमलदार तत्काळ घराच्या ठिकाणी हजर झाले. पोलिसांनी माझ्या मुलाला वेळीच योग्य ती समज दिली. यामुळे मला खूप मोठी मदत झाली, असा अनुभव काळेवाडी येथील एका ६७ वर्षीय ज्येष्ठ महिलेला आला. दरम्यान, या ॲपबाबतची माहिती ज्येष्ठांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणखी व्यापक स्वरूपात प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ज्येष्ठ नागरिकांचे मत आहे.
एकटे -दुकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना औषधे, जवळील रुग्णालयांची नावे, रुग्णवाहिका सेवा, तत्काळ संपर्क क्रमांकाची मदत तसेच इतर आवश्यक मदत लागल्यास पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘ज्येष्ठानुबंध’ हे मोबाईल अॅप सुरू केले आहे. या अॅपच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कुशल व प्रशिक्षित अंमलदार यांचा स्वतंत्र विभाग आयुक्तालयात तयार केला असून, या अॅपमध्ये आतापर्यंत शहरातील २२ हजार ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी केली आहे.
पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क साधून या अॅपबाबत माहिती दिली असून, अनेकांनी मोबाईलमध्ये अॅप डाऊनलोड करून नोंदणी केली आहे.
या ॲपवरील कॉलच्या कामकाजासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात तीन ते चार कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. हे कर्मचारी संबंधित ज्येष्ठांच्या घरी जाऊन त्यांची चौकशी करतात. त्यांना आवश्यक असलेली मदत तत्काळ पोहोचवितात.

दिवसाला सरासरी पाच ते सहा तक्रारी
हे ॲप कार्यान्वित झाल्यापासून दिवसाला सरासरी पाच ते सहा कॉल प्राप्त होत आहेत. यामध्ये घरगुती अडचणी व इतर मदत, पोहोचवणे या प्रकारचे कॉल आहेत. सर्व कॉलची वेळीचा प्रश्न मार्गी लावला जात आहे.

या ॲपच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत पोहोचवली जात आहे. अधिकाधिक ज्येष्ठांनी नागरिकांनी या ॲपवर नोंदणी करावी. या कामासाठी स्वतंत्र अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.
- डॉ. विशाल हिरे, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड

या ॲपबाबत ज्येष्ठ नागरिकांना सखोल माहिती होणे आवश्यक आहे. यासाठी ज्येष्ठांना वेळोवेळी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. काही ज्येष्ठांकडे हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी त्या पद्धतीचा मोबाईल देखील नाही, अशी स्थिती आहे.
- वैशाली मरळ, ज्येष्ठ नागरिक महासंघ, पिंपरी-चिंचवड

Marathi News Esakal
www.esakal.com