प्रेयसीला रबडीतून गोळी खायला घालून गर्भपात
पिंपरी, ता. ११ : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याने ती गरोदर राहिली असता तिच्या नकळत रबडीमध्ये गर्भपाताची गोळी खायला घालून तिचा गर्भपात केला. तसेच, तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याप्रकरणी हिंजवडी आयटी पार्कमध्ये इंजिनिअर असलेल्या प्रियकराच्या विरोधात हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हिंजवडी येथे घडला.
आदर्श वाल्मीक मेश्राम (वय २८, रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी फेज एक, मुळ-बल्हारशहा, चंद्रपूर) असे गुन्हा दाखल केलेल्या प्रियकराचे नाव आहे. तर २८ वर्षीय पीडित तरुणीने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये इंजिनिअर म्हणून नोकरीला असलेल्या आरोपीने फिर्यादी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून लैंगिक अत्याचार केला. यातून तरुणी गर्भवती राहिली. त्यामुळे आरोपीने तिच्या नकळत तिला रबडीमध्ये गर्भपाताची गोळी खायला घातली आणि तिच्या संमतीशिवाय व इच्छेविरुद्ध तिचा गर्भपात केला. त्यानंतर तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने पोलिसात धाव घेतली. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.