भाज्यांची आवक मंदावल्याने भाव दुप्पट

भाज्यांची आवक मंदावल्याने भाव दुप्पट

Published on

पिंपरी, ता. ११ : संततधार पावसामुळे भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पीक सडत असून, स्थानिक बाजारात दररोजची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव दुपटीने वाढले आहेत. प्रामुख्याने वेलवर्गीय गिलके, दोडके, भोपळा, कारले यांच्या भावात अडीच ते तीनपट वाढ झाली. तर शेवगा १६०, गवार ८०, भेंडी ८० रुपये असा किलो भावाने विक्री होत आहे.
शहरातील भाजी मंडईत दररोज पहाटे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शेतकरी भाजीपाला घेऊन येतात. परंतु पावसामुळे आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे भाव अचानक वाढले. काही भागात हिरव्या मिरचीवर ‘कोकडा’ रोग पडल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे बाजारपेठेत मिरचीला १०० रुपये किलोचा भाव आला आहे. या परिस्थितीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडल्याचे दिसून येते. सकाळी मंडईत भाजीपाला घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांकडून किरकोळ विक्रेते ठोक भाव देऊन कमी दराने भाजीपाला खरेदी करतात व किरकोळ बाजारात चढ्या भावाने विकत आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.

स्वयंपाकघरातून भाज्या गायब
भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाल्याने स्वयंपाकघरातून भाज्या गायब झाल्या आहेत. त्याऐवजी डाळ, उसळ यांचा वापर करत जेवणाची थाळी पूर्ण केली जात आहे. कारले, वांगी, दोडके यांच्या भावात तब्बल किलोमागे ३० ते ४० रुपयांची वाढ झाली आहे. तर, कोथिंबिरीच्या भावातही वाढ झाली असून एक जुडी २० रुपयांना मिळत आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात भाजीपाल्याचे भाव स्थिर होते. पावसाचे प्रमाण वाढले तसे भाजीपाल्याच्या भावातही वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, पालेभाज्यांची आवक जास्त प्रमाणात घटली आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या भावात वाढ झाली आहे. पावसाळ्यात भाजीपाला साठवून ठेवता येत नसल्याने आम्हालाही अनेकदा नुकसानीला सामोरे जावे लागते.
- आकाश बांगर, भाजीपाला विक्रेते, मोशी बाजारपेठ

भाजीपाला ः घाऊक भाव ः किरकोळ भाव (प्रतिकिलो)
कांदे ः १० - ३०
बटाटे ः १७ - ४०
टोमॅटो ः २५ - ४०
शेवगा ः ७०-१००
भेंडी ः ७०- १००
फ्लॉवर ः ४०-८०
कोबी ः १५- ३०
गवार ः १०० - १६०
मिरची ः ६०- १००
ढोबळी ः ६० - २०
वांगे ः ३०-८०
कारले ः ६०-१००
दोडके ः ६०-८०
भोपळा ः ३०-५०

Marathi News Esakal
www.esakal.com