२२० अग्निशामक कर्मचाऱ्यांसाठी राबवणार १० विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम

२२० अग्निशामक कर्मचाऱ्यांसाठी राबवणार १० विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम

Published on

अग्निशामक दलाची आधुनिकतेकडे वाटचाल

सव्वादोनशे कर्मचाऱ्यांसाठी राबविणार १० विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम

पिंपरी, ता. ११ ः शहरामध्ये उद्भवणाऱ्या नैसर्गिक व कृत्रीम आपत्तीचा सामना करण्यासाठी अग्निशामक दलाने आधुनिकतेकडे वाटचाल सुरू केली आहे. अचानक उद्भवणारी आपत्ती, अतिवृष्टीमुळे निर्माण होणारी पूरस्थिती, जुन्या धोकादायक इमारतींचे कोसळणे, रस्त्यावरील अपघात आदींबाबत अद्ययावत तांत्रिक माहिती, ज्ञान आणि प्रत्यक्ष परिस्थिती हाताळणे यासाठी प्रात्यक्षिक याबाबत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या अग्निशामक विभागाने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलत विभागातील जुने आणि नवीन मिळून २२० अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आपत्तीच्या प्रकारानुसार बचाव संबंधित प्रशिक्षण उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
या उपक्रमाअंतर्गत अग्निशमन विभागातील पूर्वीपासून कार्यरत असे ७० अनुभवी आणि १५० नव्याने नियुक्त अधिकारी-कर्मचारी सहभागी होणार आहेत. या कर्मचाऱ्यांसाठी अग्निशमन विभागाने १० विशिष्ट प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार केले आहेत. हे प्रशिक्षण संबंधित कर्मचाऱ्यांच्या वयोगट, जबाबदाऱ्या आणि शारीरिक क्षमतांचा विचार करून तयार करण्यात आले आहेत. हे अभ्यासक्रम १८ ते ५५ वयोगटातील कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त असून, त्यांचे आधुनिक तांत्रिक कौशल्य विकसित करणे हा मुख्य उद्देश आहे.

अग्निशामक जवानांना आधुनिक आव्हानांसोबतच झाड कापण्यासाठी कटरचा योग्य वापर, पाण्यात अडकलेल्या नागरिकांचे बचावकार्य, ड्रोनच्या साहाय्याने हरविलेल्या व्यक्तींचा शोध, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीस सामोरे जाण्याची क्षमता विकसित करणे, मानसिक तयारी, सामूहिक कार्यशैली आणि आधुनिक उपकरण हाताळणे बाबतचे प्रात्यक्षिके करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. यात प्राथमिक उपचार, जलदुर्घटना व बोट बचाव, उपकरणांची काळजी व देखभाल, उंचीवरील व मर्यादित जागेतील बचाव पद्धती, खोल पाण्यातील डायव्हिंग, ड्रोन हॅन्डलिंग ऑपरेशन आणि `के नऊ डॉग हँडलिंग’ अशा विविध कौशल्यांचा समावेश आहे.
------
शहर वाढत आहे तशा आपत्तींच्या शक्यता आणि स्वरूपही बदलत आहेत. त्यामुळे आमच्या अग्निशामक जवानांनी फक्त आग विझविण्यात नव्हे, तर कोणत्याही आपत्तीच्या वेळी तत्पर, प्रभावी आणि विश्वासार्ह प्रतिसाद देण्यास सक्षम असायला हवे. हे प्रशिक्षण त्यांचे धैर्य, कौशल्य आणि तयारी यामध्ये एक पाऊल पुढे नेणार आहे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com