खड्ड्यांकडे दुर्लक्ष करणे अभियंत्यांच्या अंगलट तब्बल २६ कनिष्ठ अभियंत्यांना बजावली कारणे दाखवा नोटीस
पिंपरी, ता. ११ ः पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहतूक आणि नागरिकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने अखेर कडक पावले उचलण्यास सुरवात केली आहे. खड्ड्यांबाबत वारंवार तक्रारी येत असूनही दुर्लक्ष करणारे तसेच खड्डे बुजवताना निकृष्ट काम करणारे अशा २६ कनिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने यंदाच्या वर्षी खड्डे व्यवस्थापन प्रणाली विकसित करत नागरिकांच्या तक्रारी जलदगतीने सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रणालीअंतर्गत पॉटहोल मॅनेजमेंट हे विशेष ॲप तयार करण्यात आले असून, त्याद्वारे नागरिकांना खड्ड्यांची माहिती व तक्रार नोंदवणे सुलभ झाले आहे. मात्र, तरीही काही कनिष्ठ अभियंते ॲपवर दाखल झालेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचे प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आले आहेत.
महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, शहरात एकूण १,८७५ खड्डे नोंदवले गेले होते. यापैकी १,४६४ खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. यात डांबर व कोल्ड मिक्सने ६५४, खडीने ७७, जीएसबीने ५७०, पेव्हिंग ब्लॉकने १४, तर सिमेंट काँक्रीटने १८७ खड्डे बुजविण्यात आले. सध्या शहरात केवळ ४११ खड्डे शिल्लक असल्याचा दावा प्रशासन करत आहे. दरम्यान, दापोडी ते निगडी समांतर रस्त्यावरही खड्ड्यांची स्थिती चिंताजनक असून, नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे.
खड्ड्यांबाबतच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या २६ अभियंत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. खड्डे का बुजवले नाहीत. बुजवलेल्या खड्ड्यांची काही दिवसांतच नादुरुस्ती का झाली ? याबाबत लेखी खुलासा मागवला आहे. खुलासा सादर करण्यास तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. निगडी, भक्ती-शक्ती चौक ते चिंचवड चौक पर्यंत मेट्रोच्या कामामुळे पडलेले खड्डे त्वरित दुरुस्त करावेत, असे पत्र देखील महापालिकेने मेट्रो प्रशासनाला दिले आहे.
खड्ड्यांकडे दुर्लक्ष करणारे अभियंते
क्षेत्रीय कार्यालये / अभियंते
अ / २,
ब/ ४,
क/ ७,
ड/ ४,
इ/१
फ/ ३,
ग /१
ह/४
एकूण /२६
‘‘शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सध्या सुरू असतानाच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यांविरोधात महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. कामाच्या दर्जाबाबत तक्रारी वाढत असल्याने संबंधित अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दिलेला खुलासा समाधानकारक न झाल्यास संबंधितांवर प्रशासनातर्फे शिस्तभंगासह योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- मकरंद निकम, शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.