गिरीश प्रभुणे यांना समाजसेवेत दिसला ईश्वर भैय्याजी जोशी यांचे गौरवोद्गार ः अमृतमहोत्सवानिमित्त अभीष्टचिंतन सोहळा
पिंपरी, ता. १२ ः ‘‘विचारांची भिन्नता असतानाही वेगवेगळ्या लोकांसोबत गिरीश प्रभुणे यांनी काम केले. त्यांना समाजसेवेतच ईश्वर दिसला. फळ मिळणारच आहे, अशा विश्वासाने कर्म मार्गावर त्यांनी वाटचाल केली.’’ असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी चिंचवड येथे काढले.
क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त शनिवारी (ता. १२ ) आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. जोशी यांच्या हस्ते प्रभुणे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी रवींद्र भोळे लिखित ‘गिरीश प्रभुणे, जसे कळले तसे’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले.
जोशी म्हणाले, ‘‘अंधारात उडी घेऊन साहसी काम करण्याचे कार्य गिरीश प्रभुणे यांनी केले. प्रकाश आहे, हा विश्वास ठेवून त्यांनी काम केले. काय केले पाहिजे, हे प्रभुणे यांना समजले. त्यातून यमगरवाडीचा प्रकल्प उभारला. भटके, विमुक्त यांच्या जीवनात बदल करण्याबरोबरच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाच्या आणण्याचे काम त्यांनी केले.’’
या कार्यक्रमाला अरुंधती प्रभुणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, पद्मश्री रमेश पतंगे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, डॉ. सुनील भंडगे, समितीचे कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, कोषाध्यक्ष रवी नामदे उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, ‘‘गेली अनेक वर्षे गिरीश प्रभुणे हे वंचित घटकांतील मुलांची सेवा करीत आहेत. प्रभुणे यांच्या मागणीनुसार केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून क्रांतिवीर चापेकर यांच्या नावाने टपाल तिकीट काढले. त्यांच्याच प्रयत्नामुळे चापेकरवाडा विकसित करण्यात आला आहे.’’
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलममध्ये वंचित घटकांतील मुलांना कौशल्यपूर्ण शिक्षण दिले जात आहे. गिरीश प्रभुणे यांच्या कामाचा प्रवाह नदीप्रमाणे आहे.’’
प्रभुणे म्हणाले, ‘‘समाजातील, तळागाळातील भटके, विमुक्त लोकांची सेवा करण्याची जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने माझ्याकडे दिली. पारधी समाजामध्ये काम करणे अतिशय जिकिरीचे आहे. ही कामाची सुरवात आहे. आणखी खूप कामे करायची आहेत. शेवटपर्यंत समाजासाठी काम करीत राहणार आहे.’’
पद्मश्री रमेश पतंगे, आमदार शंकर जगताप, यमगरवाडीच्या प्रकल्पातील माधवराव गायकवाड, ललिता जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. सुनील भंडगे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. संजय तांबट यांनी आभार मानले.
फोटोः 30838
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.