दुचाकींवर कारवाई, नो-पार्किंगमधील रिक्षांना अभय
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १५ : पिंपरी मेट्रो स्टेशनखाली उभी केलेली दुचाकी वाहने ‘टोइंग व्हॅन’द्वारे उचलून वाहतूक पोलिस दंड आकारत आहेत. पण, तेथेच ‘नो-पार्किंग’चा फलक असूनही रिक्षा उभ्या केल्या जातात. पण, या चालकांवर वाहतूक पोलिस कारवाई करत नाहीत. त्यामुळे रिक्षाचालकांसाठी वेगळा नियम आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर, वाहतूक पोलिसांच्या भूमिकेबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
पिंपरीतील मोरवाडी चौकातून पिंपरी गाव, चिंचवड, नेहरूनगर, लांडेवाडी, भोसरी, मोशीकडे जाता येते. वर्दळीच्या या चौकात सतत वाहतूक कोंडी होत आहे. विविध कामांमुळे रस्ते अरुंद झाले, त्यातच रिक्षा थांब्यामुळे वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होऊन कोंडीची स्थिती उद्भवत आहे. मोरवाडी चौकात रिक्षा चालकांनी दापोडी-निगडी रस्ता, मोरवाडी-पिंपरी कोर्ट रस्ता, निगडी-दापोडी रस्त्यावर महापालिकेसमोर आणि मोरवाडी-पिंपरी गाव या चारही रस्त्यांवर चार रिक्षा थांबे सुरू केले आहेत. त्यामुळे हा चौक रिक्षाचालकांच्या ताब्यात गेला आहे.
तर, याच चौकात मेट्रो स्टेशनखाली दुचाकी उभी करुन कामाला जाणाऱ्यांना वाहतूक पोलिस कारवाई करताना दिसून येतात. दुचाकी उचलून नेतात. दंड आकारतात. पण, रिक्षाचालकांना या बेशिस्तीतून सवलत देण्यात आल्याची स्थिती आहे.
नियम काय सांगतो?
इंडियन रोड काँग्रेसच्या (आयआरसी) नियमानुसार वळणाच्या मार्गावर कोठेही वाहने उभी करण्यास बंदी आहे. मुख्य चौकाच्या ७५ मीटर अंतरावर कोणताही बसथांबा असू नये. रिक्षाथांबाही चौकापासून ७५ मीटरपेक्षा दूर असला पाहिजे. मात्र, मोरवाडी चौकात तर एक-दोन नव्हे, तर तब्बल चार रिक्षा थांबे सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे चौकात अन्य वाहनांना अडथळे येत आहेत.
‘नो-पार्किंग’ फलक नसतानाही दंड
मोरवाडी चौकाच्या पुढे विजय सेल्ससमोर नो-पार्किंगचा फलक नसल्याने खासगी वाहन चालक चारचाकी पार्किंग करुन जातात. पण, काही वेळातच तेथे वाहतूक पोलस दररोज येथे पार्किंग केलेल्या वाहनांना जॅमर लावतात किंवा ती वाहने टोईंग करुन घेऊन जातात. त्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करताना दिसून येतात. त्यामुळे नो-पार्किंगचा बोर्ड नसताना कारवाई का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पिंपरी मेट्रो स्टेशनखाली दुचाकी उभी करुन मी कामानिमित्त पुण्यात गेलो. माघारी आलो, तर पोलिसांनी दुचाकी नेल्याचे समजले. पण, या चौकात नो पार्किंगचा बोर्ड असतानाही रिक्षा थांबतात. वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. त्यांच्यावर वाहतूक पोलिस कारवाई करत नाहीत.
- मनोज काळे, वाहनचालक
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्वच वाहनांवर पोलिस कारवाई करतात. नो पार्किंगमधील दुचाकी टोइंग व्हॅनद्वारे उचलून नेल्या जातात. तर, चारचाकी आणि तीनचाकी वाहनांवर जागेवर दंडात्मक कारवाई केली जाते. नागरिकांनी वाहतूक शिस्त पाळावी.
- वर्षाराणी पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग
PNE25V31129
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.