अधिकाऱ्यांनी झटकले; आयटीयन्सनी करून दाखवले

अधिकाऱ्यांनी झटकले; आयटीयन्सनी करून दाखवले

Published on

अश्विनी पवार : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १५ : हिंजवडीतील वाहतूक कोंडी व खड्डेमय रस्त्यांचे दुष्टचक्र सोडविण्यासाठी आयटी कर्मचाऱ्यांनीच पुढाकार घेतला आहे. या परिसराला पायाभूत सुविधा देण्यात सर्वच प्रशासकीय संस्था अपयशी ठरल्या आहेत. तर, येथे दररोज कामासाठी येणाऱ्या आयटीयन्सनी उपाययोजना मांडल्या आहेत. यातील उपाययोजनांनुसार लगेचच कार्यवाही करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

हिंजवडी, माण परिसरांतील समस्या आणि उपाययोजनांचा समावेश असणारा ५७ पानी अहवाल ‘अनक्लॉग हिंजवडी’ मोहिमेतील सदस्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर सादर केला. त्यावेळी पवार यांनीही या अहवालाची दखल घेतली. हिंजवडी आयटी पार्क क्षेत्रात खड्डेमय आणि अरुंद रस्त्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी, पावसाळ्यात साचणारे पाणी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांची अनास्था यावर वारंवार टीका होत आहे. तरीही, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नव्हती. त्यामुळे हिंजवडीला कोंडीमुक्त करण्यासाठी आयटी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत ‘अनक्लॉग हिंजवडी’ मोहीम सुरू केली. याला स्थानिक नागरिक व कर्मचाऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. एवढ्यावर न थांबता या मोहिमेतील सदस्यांनी हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न येत्या ३० ते ६० दिवसांत सोडविण्याबाबत विस्तृत अहवाल तयार केला आहे.

सकाळचा पाठपुरावा
दोहलर कंपनीसमोर गेल्या महिन्यात पावसाचे पाणी साचून जलकोंडी झाली. त्यावर ‘‘हिंजवडी आयटी पार्क आहे, की वॉटर पार्क’’ अशी टीका सोशल मीडियाद्वारे झाली. दरम्यान, या परिसरातील समस्या आणि आयटीएन्सची कोंडी याबाबत ‘सकाळ’ने वारंवार नागरिकांची बाजू मांडली आहे. हिंजवडीतील पायाभूत सुविधांचा अभाव, मेट्रो सुरू होताना आवश्‍यक ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’चे काम याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करून ‘सकाळ’ने या मुद्द्यांचा पाठपुरावा केला आहे.


अहवालात मांडलेल्या ठळक समस्या

- हिंजवडी फेज एक ते फेज तीन परिसरातील वाहतूक कोंडी आणि तिची ठिकाणे, कारणे.
- फेज -तीनमधील क्वाड्रॉन सर्कल, फेज-दोनमधील विप्रो सर्कल, ॲमस्टरडॅम हॉटेलजवळील चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक हे कोंडीचे ‘हॉटस्पॉट’.
- या चौकांतील अतिक्रमणे, दुभाजकांच्या अभावामुळे विरुद्ध दिशेने (राँग साइड) वाहन चालविणारे, तसेच ‘नो पार्किंग’मध्ये वाहने उभी केली जातात. त्यामुळे कोंडीत भर.
- या भागांतील खड्डे, निमुळते रस्ते, मेट्रोची कामे यामुळे वाहतुकीचा मंदावलेला वेग हे गुगल मॅपव्दारे दर्शवले आहे.
- फेज-तीनमध्ये ठिकठिकाणी निमुळते रस्ते, वाहतूक कोंडी व रस्ता निमुळता होण्याची कारणे
- फेज-दोनमधील विप्रो चौकातून ते लक्ष्मी चौकाकडे जाताना दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ
- विप्रो चौकात रस्त्यावरील दुचाकी पार्किंग, वाहतूक पोलिसांची कमतरता, अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी
- लक्ष्मी चौकातून फेज-दोनकडे जाणाऱ्या ॲमस्टरडॅम हॉटेल चौकाजवळ मेट्रोच्या जिन्यामुळे निमुळता झालेला रस्ता
- सीएनजी पंप, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्सबाहेर वाहनांच्या लागणाऱ्या रांगा व त्यामुळे होणारी कोंडी
- फेज-तीनच्या मार्गावरील खड्डे, दर्जाहीन रस्ते दुरुस्ती, रस्त्याकडेचा राडारोडा यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो
- छत्रपती शिवाजी चौकात पदपथावर अतिक्रमणे, अरूंद रस्ते, त्यावर उभ्या वाहनांमुळे कोंडी
- पिंपरी चिंचवड महापालिका व हिंजवडी ग्रामपंचायतीच्या हद्दीलगतच्या रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक


तातडीने करण्याच्या उपाययोजना
- क्वॉड्रान सर्कल, फेज-दोनमधील विप्रो सर्कल, ॲमस्टरम हॉटेल जवळील चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे किमान १५ तास वाहतूक पोलिस नेमणे
- बेशिस्त वाहनचालकांना जरब बसविण्यासाठी या चौकांमध्ये सीसीटीव्ही बसवणे तसेच रस्ता दुभाजक उभारणे
- फेज-दोन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्याची एक लेन वाढविणे
- कोंडी होणाऱ्या चौकांतील अतिक्रमणे काढणे, रस्त्यावर गाडी लावणाऱ्यांवर दंड करणे
- नो पार्किंग, नो एंट्री सारखे दिशादर्शक फलक चौकाचौकांत लावणे
- फेज-एकपासून मेट्रो स्टेशनला जोडणारे ‘स्कायवॉक’ उभारणे
- मेट्रोचे वेळापत्रक कार्यालयीन वेळांशी मिळतेजुळते ठेवणे
- हिंजवडीसाठी स्वतंत्र वाहतूक विभाग असावा
- इतर शहरांत जाण्यासाठी ‘ट्रान्सपोर्ट हब’ हवे
- मेट्रोसाठी ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ असावी
- हिंजवडीत ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्ते बांधावेत

‘अनक्लॉग हिंजवडी’ मोहिमेतील सदस्यांनी केलेली पाहणी व दिलेल्या सूचनांनुसार आम्ही हा अहवाल तयार केला आहे. यामध्ये तेथील प्रत्यक्ष फोटो, गुगल लिंक आणि मॅपद्वारे कोंडीची कारणे दिलेली आहेत, तसेच उपाययोजनाही सांगितल्या. या अहवालात दिल्याप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हिंजवडीत पाहणी केली. यातील दोन मुद्द्यांवर त्यांनी लगेचच लक्ष घालून कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत.
- सचिन लोंढे, आयटी कर्मचारी तथा ‘अनक्लॉग हिंजवडी’ मोहीम सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com