कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे १४ लाख लाभार्थी
पिंपरी, ता. १४ : आकुर्डी येथील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सध्या १४ लाख ६३ हजार खातेदारांना ‘पीएफ’चा लाभ मिळत आहे. तसेच, १३ हजार ७०० कंपन्या नियमितपणे पीएफचा भरणा करतात. कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ७१ लाख ८७ हजार खातेदारांची संख्या आहे, अशी माहिती कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्र, भोसरी, तळवडे, ताथवडे, मुळशी, पिरंगुटसह तळेगाव, चाकण, लोणावळा, खेड, नारायणगाव व जुन्नरपर्यंतचा मोठा परिसर समाविष्ट आहे. औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या या भागांत लघु, मध्यम व मोठ्या कंपन्या मोठ्या संख्येने कार्यरत असून त्यामधील लाखो कर्मचारी ‘पीएफ’चा लाभ घेत आहेत. सध्या ‘पीएफ’वरील रक्कम काढण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी आपल्या ‘यूएन’द्वारे (युनिक आयडेंटिफिकेशन नंबर) पोर्टलवर जाऊन आपली माहिती भरून अर्ज करायचा असतो. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘जवळपास ५० टक्के पीएफ दावे केवळ ऑनलाइन प्रक्रियेद्वारे मंजूर होतात. काही वेळा ऑनलाइन प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आल्यास किंवा खातेदारांना मार्गदर्शन हवे असल्यास कार्यालयात येणाऱ्यांना तत्काळ मदत केली जाते.’’
औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होत असल्याने आकुर्डी कार्यालयाची जबाबदारी वाढली आहे. कामगारांना सहज, पारदर्शक व जलद सेवा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ऑनलाइन प्रक्रियेला प्राधान्य देऊन कार्यालयाचा ताण कमी करणे आणि खातेदारांना सुविधा पुरविणे हाच उद्देश असल्याचेही कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.
खातेदारांसाठी माहिती...
‘पीएफ’ खात्यातील शिल्लक रक्कम नियमितपणे तपासण्यासाठी खातेदारांनी ईपीएफचे पासबुक दररोज पाहावे. तसेच, मिस्ड कॉल सेवा व इतर पोर्टल सुविधेद्वारेही खात्यातील बॅलन्स तपासता येतो, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.