सेवारस्त्यासाठी जागेचा मोबदला मिळावा

सेवारस्त्यासाठी जागेचा मोबदला मिळावा

Published on

रावेत, ता. १७ ः मुंबई-बंगळूर महामार्गाच्या (देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग) किवळेतील देहूरोड फाटा ते रावेत येथील समीर लॉन्स दरम्यानच्या नियोजित सेवा रस्त्यासाठी महापालिकेने भूसंपादन केले आहे. मात्र, शेतकरी व जागा मालकांना अद्याप योग्य मोबदला मिळालेला नाही, त्यामुळे ते आक्रमक झाले आहेत. भूसंपादन प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले ‘अ’ आणि ‘ब’ अर्ज सुमारे ३० शेतकऱ्यांकडून भरून घेतले नाहीत. काही शेतकऱ्यांनी अर्ज भरून दिले आहेत, प्रत्यक्षात कोणालाही मोबदला न मिळाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

किवळे, रावेत भागातील जमिनीचा वापर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी व विकास आराखड्यानुसार महापालिकेच्या कामासाठी केला जाणार आहे. मात्र, मोबदला न देता मोजणी किंवा ताबा घेण्याची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू आहे. मात्र, आम्हाला आमचा मोबदला न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. मोबदला मिळेपर्यंत कोणतीही मोजणी होऊ देणार नाही, अशीही ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. यामध्ये शेतकरी व जागामालक सचिन भोंडवे, योगेश भोंडवे, राहूल भोंडवे, राजेंद्र भोंडवे, यज्ञेश भोंडवे, नितीन भोंडवे, सोनु भोंडवे, निखिल भोंडवे यांच्यासह २५ हून अधिक शेतकऱ्यांचा समावेश आहे. जमिनीचा मोबदला न मिळाल्याने नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

महापालिकेने आम्हाला आश्वासन दिले होती की, ‘अ’ व ‘ब’ अर्ज भरून घेतल्यानंतर लवकरच मोबदला दिला जाईल. मात्र, काही आठवडे उलटूनही कुठल्याही शेतकऱ्याला मोबदला मिळालेला नाही. कालपासून जमिनीचे मार्किंग सुरू केले आहे. आम्हाला टीडीआर किंवा कोणत्याही स्वरुपात मोबदला मिळाला तरी चालेल.
- धनंजय भोंडवे, शेतकरी, रावेत

महापालिका प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मोबदल्याबद्दल निर्णय घेतला आहे. आम्ही रस्त्याच्या उभारणीसाठी लागणारी जागा घेऊन त्यासाठी मजबूत रस्ता उभारत आहोत. महापालिका प्रशासन यासंदर्भात निर्णय घेऊन पुढील आठ दिवसांत शेतकऱ्यांना मोबदला देणार आहे.
- विनोदराजे पाटील, संपर्क अधिकारी, डीएमआय कंत्राटदार

राष्ट्रीय महामार्गालगत दोन्ही बाजूस १२ मीटर रुंद सेवारस्ता करणार आहोत. यासाठी शेतकऱ्यांकडून जमीन घेतली जाणार आहे. त्या बदल्यात टीडीआर किंवा एफएसआय देण्यासंदर्भात बैठकीमध्ये ठरले आहे. त्यासंदर्भात लवकरच कार्यवाही केली जाईल. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळेल.
- सुभाष घंटे, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

महापालिका जमिनीचा ताबा घेऊन संबंधितांना आगाऊ टीडीआर किंवा एफएसआय देईल. शेतकऱ्यांनी प्रपत्र ‘अ’ आणि ‘ब’ भरून नगररचना विभागाकडे लवकर फाइल दाखल करावी. नगररचना विभाग छाणणी करून मोबदला देईल. शेतकऱ्यांनी त्वरीत जमिनीचा ताबा देऊन रस्ता उभारणीसाठी सहकार्य करावे.
- अशोक कुटे, उपअभियंता, नगररचना विभाग, महापालिका

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जवळपास ८५ टक्के शेतकऱ्यांनी जमिनीचा ताबा दिला आहे. आता अतिक्रमणे हटविण्यासाठी मार्किंग सुरू आहे. शेतकऱ्यांना मोबदला मिळावा यासाठी त्यांनी त्वरीत नगररचना विभागात प्रस्ताव दाखल करावे. काही ठिकाणी कॅम्प लावून मोबदला दिला जाईल.
- प्रसाद गायकवाड- उपसंचालक, नगररचना विभाग, महापालिका
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com