मेट्रो कामामुळे रस्ते अरुंद अन् रिक्षांचा थांबाही
पिंपरी, ता. १७ ः आकुर्डी ते चिंचवड दरम्यान शाळा आणि कॉलेज आहेत. त्यामुळे या मार्गावरुन विद्यार्थी आणि पालकांची वर्दळ असते. मेट्रो कामासाठी निगडी पवळे पूल ते चिंचवडपर्यंत पादचारी रस्त्याची रुंदी कमी करून सेवा रस्ता रुंद केला. परिणामी पादचाऱ्यांना चालायला पादचारी रस्ताच राहिलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. रिक्षा चालकही निगडी आणि आकुर्डी चौकातच रिक्षा थांबवत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. वाहतूक पोलिसांनी मेट्रोचे काम होईपर्यंत चौकातील रिक्षा थांबा हटवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पिंपरी ते निगडी भक्ती-शक्ती चौक या विस्तारित ४.५१ किलोमीटर एलिव्हेटेड मार्गिकेचे काम सुरू आहे. निगडीतील भक्ती-शक्ती चौक, पवळे उड्डाणपूल ते चिंचवड रेल्वे स्थानक चौकात पिलर उभारणीचे काम सुरू झाले आहे. मेट्रो कामासाठी निगडी पवळे पूल ते आकुर्डी रस्ता दरम्यान असलेला पादचारी रस्ता कमी करून सेवा रस्ता रुंदीकरण करण्यात आला आहे. आकुर्डी ते चिंचवड दरम्यानही मेट्रो कामामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक संथ झाली आहे. त्यात निगडी पवळे पूल चौक आणि आकुर्डी खंडोबा माळ चौकातच रिक्षा थांबत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे. आकुर्डीतील खंडोबा माळ येथे महापालिकेची गोदावरी हिंदी शाळा आहे. या शाळेसमोरच मेट्रोचे काम सुरू असल्याने विद्यार्थी आणि पालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. शाळेसमोरच रिक्षा थांबत असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांना चालणेही कठीण झाले आहे. या मार्गावर अवजड वाहनांसह पीएमपीएमएल बस आणि इतर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वाहतूक पोलिसही चौकात उभ्या असलेल्या रिक्षांवर कारवाई करत नसल्याने रिक्षा चालकांचा बेदारकपणा वाढला आहे. मेट्रोचे काम होईपर्यंत चौकातील रिक्षा थांब्यांना बंदी घालण्याची मागणी पालकांनी केली आहे.
आकुर्डीतील महापालिकेच्या शाळेत मुलांना घेऊन यावे लागते. पण, चौकातच रिक्षा थांबवत असल्याने चालण्यासाठीही जागा नसते. या मार्गावरुन वाहने मोठ्या प्रमाणात जात असल्यामुळे अपघाताचा धोका आहे. वाहतूक पोलिसांनी मेट्रो काम होईपर्यंत चौकातील रिक्षा थांबा हटवावा.
- मनिषा यादव, पालक
मेट्रो कामामुळे वाहतूक कोंडी आहे. शाळेसमोरही रिक्षा आणि इतर वाहने थांबत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करताना बऱ्याच अडचणी येतात. वाहतूक पोलिस या वाहनांवर कारवाई का करत नाहीत.
- राम तिवारी, पालक
निगडीकडून आकुर्डीकडे येणाऱ्या मार्गावर चौकात रिक्षा थांबत असल्याने येथून वाहन घेऊन जाणे कठीण होते. त्यामुळे बऱ्याच वेळा वाहतूक कोंडी होते. वाहतूक पोलिसही या रिक्षांवर करवाई करून चौक मोकळा करावा.
- राजेश धुमाळ, वाहनचालक
फोटो - ३२०६८, ३२०६९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.