मोरया गोसावी-तुकोबांच्या भेटीचा हृद्य सोहळा

मोरया गोसावी-तुकोबांच्या भेटीचा हृद्य सोहळा

Published on

पिंपरी, ता. २० : सकाळचे प्रसन्न वातावरण...रांगोळीच्या पायघड्या, संतभेटीच्या सोहळ्याची सज्जता...ढोलताशा पथकांची मानवंदना, पारंपारिक वेशभूषा करून दर्शनासाठी आलेल्या महिला व चिमुकले, सकाळी सातपासूनच दर्शनासाठी लागलेल्या रांगा आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन झाल्यावर उपस्थितांनी ‘ज्ञानबा...तुकाराम’ असा एकच गजर केला. असे भारावलेले वातावरण रविवारी (ता. २०) चिंचवडगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अनुभवायला मिळाले.

श्रीमन् महासाधू मोरया गोसावी आणि संत तुकाराम महाराज यांच्या संतभेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी हजारोंच्या संख्येने पिंपरी-चिंचवडकरांनी उपस्थिती लावली. चिंचवड देवस्थान ट्रस्ट, काळभैरवनाथ उत्सव समिती आणि चिंचवड ग्रामस्थांनी संयोजन केले. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पिंपरी-चिंचवडमधून आळंदीकडे मार्गस्थ झाला. शनिवारी पालखीचा मुक्काम पिंपरी गावातील श्री काळभैरवनाथ मंदिरात होता. शनिवारी रात्री भानुदास महाराज मोरे यांचे कीर्तन झाले. त्यानंतर जोग महाराज दिंडी व भजनी मंडळाने जागर केला. पहाटे संत तुकाराम महाराज पादुकांची महापूजा केली. सहा वाजता पालखी लिंक रस्तामार्गे चिंचवडगावाकडे मार्गस्थ झाली. फुलांची आकर्षक सजावट केलेला संत तुकोबारायांचा पालखी रथ सकाळी आठ वाजता चिंचवडगावात दाखल झाला. पालखीचा पहिला विसावा घेतला. दुतर्फा उभे राहून नागरिकांनी फुलांची उधळण करत स्वागत केले. चौकातील मंडप घातला होता. त्यामध्ये महासाधू मोरया गोसावी यांचा फुलांनी सजवलेला रथ सकाळीच दाखल झाला होता. तेथेच संतभेटीचा सोहळा अनुभवता आला. आरती होताच भाविकांनी संत दर्शनाचा लाभ घेतला.

अवतरली पंढरी
संतभेटीच्या ठिकाणी तुकोबांची पालखी दाखल झाल्यानंतर वातावरणात भारावले होते. तालवाद्य आणि टाळ-मृदंगांच्या गजरात खेळलेली पावली व फुगड्यांचे फेर रंगले. त्यात महिला, तरुणी व युवकांचा समावेश होता. सर्वत्र भाविकांची लगबग सुरू होती. या वातावरणामुळे जणू काही उद्योगनगरीत पंढरीच अवतरली आहे, असा अनुभव आला. रविवार सुटीचा दिवस असल्याने सहकुटुंब नागरिकांनी दर्शनाचा लाभ घेत संतभेटीचा सोहळा अनुभवला.

विविध सेवा व उपक्रम
अनेकांनी वारकरी व भाविकांसाठी फळे, चहा, फराळ व नाश्त्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. लिंक रस्त्यापासून सहभागी झालेल्या नवदुर्गा टाळ पाऊल पथकाच्या महिलांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पारंपारिक वेशभूषेतील महिलांनी सादर केलेली भजने, रिंगण हेदेखील सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी पर्यावरण व स्वच्छता विषयक जागृती करणारे फलक घेऊन सोहळ्यात सहभागी झाले. नऊच्या सुमारास संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गस्थ झाला. सव्वादहा वाजता सोहळा केएसबी चौकात विसाव्यासाठी थांबला. शाहूनगर, संभाजीनगर परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तासाभरानंतर पालखी भोसरी, लांडेवाडीकडे मार्गस्थ झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com