डुडुळगाव-मोशीत पालखीचे मनोभावे स्वागत
पिंपरी, ता. २० : ‘माउली-तुकाराम’ असा जयघोष करीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आळंदीच्या हद्दीतून डुडुळगाव येथे सोमवारी (ता. २१) सकाळी सातच्या सुमारास प्रवेश केला. मोशी, चिखली, तळवडेमार्गे सोहळा देहूकडे मार्गस्थ झाला. या वाटचालीत भाविकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून दर्शनाचा लाभ घेतला. एकादशी असल्यामुळे वारकऱ्यांना फराळ देऊन स्वागत केले.
आषाढी वारीनिमित्त देहू येथून पंढरपूरला गेलेला जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा परतीच्या प्रवासात आळंदी मार्गे आला. कारण यंदा संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७५० वा जन्मोत्सव आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठगमनाचे ३७५ वे वर्ष आहे. याचे औचित्य साधून परतीच्या प्रवासात संत तुकाराम महाराज पादुका पालखी रथ आळंदीमार्गे देहूला न्यावा, अशी विनंती आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानने देहू संस्थानला केली होती. तिचा स्वीकार करत संत तुकाराम महाराज देवस्थानने दरवर्षीप्रमाणे चिंचवडगाव, आकुर्डी, निगडी, देहूरोड, चिंचोली, झेंडेमळा मार्गे देहूला न जाता चिंचवडगाव, भोसरीमार्गे सोहळा रविवारी (ता. २०) आळंदीत पोहोचला होता. आळंदीकरांचा पाहुणचार आणि संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेऊन सोहळा सोमवारी (ता. २१) सकाळीच देहूकडे मार्गस्थ झाला. आळंदीत नगरप्रदक्षिणा करून आळंदी-देहू रस्त्यावरील डुडुळगाव येथील कमानीजवळ संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत प्रवेश केला. डुडुळगाव, मोशी, जाधववाडी येथे दुतर्फा थांबून भाविकांनी दर्शन घेतले. सकाळी अकराच्या सुमारास सोहळा चिखलीत पोहोचला. तिथे विश्रांती घेऊन तळवडेमार्गे सोहळा देहूकडे मार्गस्थ झाला.
टाळ आणि पादुकांना
चिखलीत दुग्धाभिषेक
चिखली : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सकाळी अकराच्या सुमारास टाळगाव चिखली गावठाणातील कमानीजवळ पोहोचला. ग्रामस्थांनी उत्साहात भक्तिभावाने स्वागत केले. आळंदी-देहू रस्त्यावर पालखी रथ थांबवून कमानीपासून टाळ मंदिरापर्यंत पालखी खांद्यावर उचलून नेली. या मार्गावर दोन्ही बाजूला पुष्पांच्या माळा लावलेल्या होत्या. ठिकठिकाणी पालखीवर पुष्पवृष्टी केली.
फटाक्यांची आतषबाजी आणि पुष्पवृष्टी करत चिखलीकरांनी पालखीचे स्वागत केले. संत तुकाराम महाराज वैकुंठ गमनाला जात असताना त्यांच्या हातातील टाळ चिखलीमध्ये पडले, तेव्हापासून टाळगाव चिखली म्हणून गावाला ओळखले जाते. इथे टाळ मंदिरही आहे. पालखी मंदिरात नेल्यानंतर पादुका आणि टाळांचे पूजन केले. दुग्धाभिषेक केला. आरती झाली. त्यानंतर सुमारे दोन तासांच्या विश्रांतीनंतर सोहळा देहूकडे मार्गस्थ झाला. दरम्यान, जयहरि ग्रूप व महिला भजनी मंडळाने एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या फराळची व्यवस्था केली होती. चिखली ग्रामस्थांनी देहू संस्थान आणि पालखी सोहळा प्रमुख, विश्वस्त व मानकऱ्यांचा पगडी घालून सन्मान केला. जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या विद्यार्थिनी ‘ज्ञानोबा-तुकाराम’ गजर करत दिंडी काढली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.