कीटकजन्य आजार रोखण्यासाठी तपासणी सत्र
पिंपरी, ता. २१ : डेंगी, मलेरिया यांसारख्या कीटकजन्य व जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने पाच लाखांपेक्षा अधिक घरांची तपासणी केली. यात ६२४ नागरिक व आस्थापनांवर थेट दंडात्मक कारवाई करत २२ लाख २४ हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच औषध फवारणीसह घरांची व कंटेनर तपासणी, भंगार दुकाने, बांधकामस्थळांची पाहणी, तसेच जनजागृती आणि दंडात्मक कारवाई यावर भर देण्यात येत आहे. अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
कीटकजन्य व जलजन्य आजारांबाबत जागृती करण्यावरही आरोग्य विभागाकडून विशेष भर दिला जात आहे. यामध्ये नियमित औषध फवारणी, घरोघरी माहितीपत्रकांचे वितरण, शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जागृती प्रशिक्षण, प्रभागस्तरावर विशेष जनजागृती कार्यक्रम, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिमा अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. डेंगी, मलेरिया सारख्या आजारांचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी देखील काळजी घ्यावी, दर आठवड्याला टाक्या आणि पाणी साठवणाऱ्या भांड्यांची स्वच्छता करावी, पाणी साठवणारी भांडी झाकून ठेवावीत, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
आठही क्षेत्रीय कार्यालयांमार्फत झालेली कारवाई
- आतापर्यंत एकूण ५ लाख ४३ हजार ७६६ घरांची तपासणी
- ९ हजार ६८० घरांच्या परिसरात डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण
- २८ लाख ९३ हजार ९३४ कंटेनरची तपासणी
- १० हजार ५४८ कंटेनरमध्ये डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण
- १ हजार २३८ भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली.
- १ हजार ६०९ बांधकाम स्थळांमध्ये अस्वच्छता व पाणी साचल्याचे निदर्शनास आले.
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून डेंगी, मलेरियाचा नायनाट करण्यासाठी जागृती करण्याबरोबरच डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी या उपक्रमात सहकार्य करून आपल्या परिसरातील स्वच्छता राखून या व्यापक मोहिमेस सहकार्य करावे.
- शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.