बस मार्गांपेक्षा जाहिरातींचाच ‘आवाज’

बस मार्गांपेक्षा जाहिरातींचाच ‘आवाज’

Published on

पिंपरी, ता. २२ : वल्लभनगर एसटी महामंडळ स्थानकात स्वयंचलित उद्घोषणा यंत्राद्वारे दिली जाणारी बसची माहिती नीटशी ऐकू येत नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांच्या बस निघून जात आहेत. स्वयंचलित उद्घोषणा यंत्रणेत बस क्रमांक, मार्ग या पेक्षा जाहिरातींचाच भरणा अधिक आहे. त्यामुळे ही यंत्रणा बसची माहिती देण्यासाठी आहे, की जाहिरातींसाठी? हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

शहरातील वल्लभनगर आगारातून दररोज मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र येथून ३२७, तर मुंबईहून येणाऱ्या १८३ एसटी बसेस ये-जा करतात. पिंपरी-चिंचवड आगाराच्याही तीस बस येथून सुटतात. दररोज हजारो प्रवासी चढ-उतार करतात. आगारात येणाऱ्या प्रत्येक बसची प्रवाशांना माहिती मिळावी, यासाठी बस क्रमांक, मार्ग आणि वेळ याची उद्घोषणा केली जाते. पूर्वी चौकशी खिडकीतील वाहतूक नियंत्रक (कंट्रोलर) फलाटावर लागलेल्या बसची उद्घोषणा करत होते. पण, आता प्रशासनाने स्वयंचलित उद्घोषणा यंत्रणा सुरू केली आहे. यावर बस क्रमांक, मार्ग, वेळ याच बरोबर जाहिरातींची उद्घोषणा केली जाते. पण, वल्लभनगर आगारात ध्वनिक्षेपक (साउंड) कमी असल्यामुळे बस क्रमांक, मार्ग आणि वेळ याचा आवाजच येत नाही. परिणामी, आगारात बस आल्याची माहिती प्रवाशांना मिळत नाही. गर्दीच्या वेळेस फलाटावर बस लावण्यासाठी जागा नसल्याने अनेक चालक बस मागील बाजूला उभी करून नियंत्रकाची सही घेऊन निघून जातात. त्यात स्वयंचलित यंत्रणेद्वारे केलेल्या उद्घोषणेमुळे बस येऊन गेलेली प्रवाशांना कळतही नाही. एखादी बस गेल्यानंतर प्रवाशांना बराच वेळ वाट पाहत थांबावे लागते किंवा शिवाजीनगर, स्वारगेट आगारात जावे लागते. एसटीच्या प्रशासनाच्या या तांत्रिक त्रुटींचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

आगारात बसची स्पीकरवर बसची माहिती दिली जाते. पण, आवाज एकदम कमी त्यात तो स्पष्ट नसतो. त्यामुळे कोणती बस आली ते कळतच नाही. आगारातील ध्वनिक्षेपक यंत्रणा सुधारण्याची गरज आहे.
- मारुती दिवटे, प्रवासी

स्वयंचलित उद्घोषणा यंत्रणेचा आवाज वाढविणे किंवा कमी करणे आमच्या हाती नाही. त्याचे नियंत्रण शिवाजीनगर येथे आहे. त्यामुळे जर काही बदल करायचे असतील तर आम्ही त्यांना कळवितो. आगारात अजून दोन ध्वनिक्षेपक बसविण्याचे नियोजित आहे.
- वैशाली कांबळे, वल्लभनगर स्थानक प्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com