कालबाह्य सिलिंडरमुळे ग्राहक ‘गॅस’वर
राहुल हातोले : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २४ : गॅस सिलिंडरचे तुटलेले वायसर किंवा फुटलेले-गंजलेले सिलिंडर, मुदत संपलेल्या सिलिंडरमुळे होणारी गॅस गळती ही गंभीर बाब आहे. ती अपघातास कारणीभूत ठरू शकते. दरम्यान, शहरात सध्या अशा कालबाह्य सिलिंडरचे वितरण होत असल्याचे समोर आले आहे. गॅस वितरण कंपन्यांनी आणि विशेषत: ग्राहकांनी या प्रकाराबाबत सजग राहणे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे.
ग्राहकांना वेळेत आणि सुरक्षित सिलिंडर पुरवणे ही गॅस कंपनी, त्यांचे वितरक आणि डिलिव्हरी बॉय यांची जबाबदारी आहे. सिलिंडर स्वीकारताना ग्राहकाने तातडीने तपासणी करूनच पावती घेणे आवश्यक आहे. तर, प्रसंगी नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या अशा घटनांना आळा घालण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती व खबरदारी घेणे आवश्यक आहे. चुकीच्या गॅस सिलिंडरच्या वापरामुळे पूर्वी अनेक अपघात घडले आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सिलिंडर आणि गॅस पाइपची वैधता तपासूनच त्याचा वापर करावा.
गॅस सिलिंडर वैधता तपासण्याची पद्धत :
प्रत्येक गॅस सिलिंडरवर ए, बी, सी, डी या मोठ्या अक्षरांचा कोड लिहिलेला असतो.
हे कोड प्रत्येक तिमाहीसाठी (अनुक्रमे जाने-मार्च, एप्रिल-जून, जुलै-सप्टेंबर, ऑक्टोबर-डिसेंबर) वापरले जातात.
अक्षरामागील आकडा सिलिंडरच्या वापराचा शेवटचा वर्ष दर्शवतो.
हा कोड म्हणजेच सिलिंडरची प्रेशर टेस्टिंगची अंतिम तारीख दर्शवतो.
उदाहरण : बी-२५ म्हणजे एप्रिल ते जून २०२५ या कालावधीपर्यंत सिलिंडर वैध आहे.
गॅस टाकीची वैधता :
प्रत्येक गॅस सिलिंडरची वैधता १५ वर्षांपर्यंत असते.
यामध्ये पहिली चाचणी : दहा वर्षांनंतर
दुसरी चाचणी : पुढील पाच वर्षांनंतर
यानंतर सिलिंडर धोकादायक ठरू शकतो आणि त्याचा वापर टाळावा.
गॅस पाइपची वैधता
गॅस पाइपवर त्याची वैधता तारीख स्पष्टपणे लिहिलेली असते.
घरगुती वापरातील गॅस पाइपची वैधता १८ ते २४ महिने इतकी असते.
वेळेत पाइप न बदलल्यास गॅस गळती आणि स्फोटाची शक्यता वाढते.
पाइपची नियमित तपासणी करून, तारीख संपण्यापूर्वी तो बदलून घ्या.
गंभीर संकेतांकडे दुर्लक्ष नको :
अनेक वेळा गॅस सिलिंडर वापरात नसल्याने त्यावर गंज चढतो.
गंजलेले व्हॉल्व किंवा सिलिंडरमधून गॅस गळतीची शक्यता अधिक
वापरण्याआधी व्हॉल्व, पाइप आणि सिलिंडरची स्थिती तपासणे आवश्यक
फुटलेल्या टाक्या, सैल झालेला रेग्युलेटर आणि वास आल्यास तत्काळ उपाययोजना करावी.
गॅस गळती झाल्यास काय कराल?
घरातील दरवाजे-खिडक्या उघडा
सर्व यांत्रिक, इलेक्ट्रिक उपकरणे बंद करा
गॅस बंद करा आणि घराबाहेर पडा
‘१९०६’ या टोल-फ्री क्रमांकावर तत्काळ संपर्क साधा
संबंधित कंपनीकडून एका तासात तक्रारीवर उपाय केला जातो.
ग्राहकांसाठी महत्त्वाच्या सूचना :
नवीन सिलिंडर घेताना कोड आणि वैधता तपासा
शेगडीला लावलेल्या पाइपची स्थिती नियमित तपासा
सिलिंडर कोरड्या, गंजलेल्या भागासह वापरू नका
शंका आल्यास कंपनीकडून सर्व्हिस इंजिनिअरकडून तपासणी करून घ्या
वैधता संपलेले सिलिंडर ग्राहकांना दिले जात असतील, तर या विरोधात ऑनलाइन तक्रार करता येते. तसेच १९०६ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा. सिलिंडर घरी आल्यावर ग्राहकांनी तो योग्य पद्धतीने तपासून पाहूनच घरात घ्यावा. अन्यथा वितरकांकडे तक्रार करावी.
दोन दिवसांपूर्वी सायंकाळच्या वेळी घरी सिलिंडर आला. वायसर तपासणी केली. मात्र, रात्री गॅसचा वास येत असल्याने तपासणी केली. त्यावर टाकीला केलेल्या वेल्डिंगमधून गॅसगळती होत असल्याचे समजले. त्यामुळे वितरकाशी संपर्क साधला असता कर्मचाऱ्यांनी एजन्सीची बंद होण्याची वेळ झाल्याचे सांगितले. मात्र, काही वेळाने वितरकाने सिलिंडर बदलून दिला.
- सतीश करवते, रावेत.
गॅस गळती किंवा अपघात झाल्यास
- ‘१९०६’ या क्रमांकावर तातडीने संपर्क साधा
PNE25V34060
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.