‘सुंदर साजिरा श्रावण आला...’

‘सुंदर साजिरा श्रावण आला...’

Published on

पिंपरी, ता. २४ : निसर्गाचा हिरवागार उत्सव म्हणजे श्रावण महिना! आषाढातील मुसळधार पावसामुळे जमिनीला मिळालेला थंडावा, शेतीत दंग बळीराजा, रानभाज्यांची रेलचेल आणि नटलेली सृष्टी... असा हा श्रावण शुक्रवारपासून (ता.२५) सुरू होत आहे. याच महिन्यापासून हिंदू धर्मातील अनेक सण-उत्सव सुरू होतात. त्यामुळे मंदिरांसह घरोघरी लगबग, खरेदीसाठी बाजारात गर्दी त्यामुळे श्रावण हा खऱ्या अर्थाने उत्साह व आनंद घेऊन येतो.

श्रावणातील सृष्टीसौंदर्याचे वर्णन कविवर्य कुसमाग्रजांनी
‘‘हासरा नाचरा जरासा लाजरा,
सुंदर साजिरा श्रावण आला...
तांबुस कोमल पाऊल टाकित
भिजल्या मातीत श्रावण आला...’’
अशा शब्दांत केले आहे.

या महिन्यात श्रावणी सोमवार, मंगळागौर, शुक्रवार, गोकुळाष्टमी, नागचतुर्थी, नागपंचमी, शनिवार असे अनेक उपवास या महिन्यात केले जातात. त्यामागे शास्त्रीय कारणेही आहेत. त्यामुळे ‘‘उपवास करा, मात्र त्यामागील शास्त्रीय कारणे जाणून घ्या’’ असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत.
वर्षा ऋतूतील हवामानामुळे आपली पचनक्षमता मंदावलेली असते. त्यामुळे वर्षभरातील या काळात सर्वांत कमी भूक लागते. त्यामुळे हलके पदार्थ खाऊन रोगांपासून दूर राहावे म्हणून उपवास केले जातात. त्यामुळे सात्विक व हलके अन्न सेवन करावे. साबुदाणा, रताळी व बटाटे पचायला जड असतात. अगदीच उपाशी राहिल्यानेही पित्त वाढते. त्यामुळे श्रावणात उपवास करताना हलके अन्न सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

उपवासाला काय सेवन करावे
- राजगीऱ्याची भाकरी, लाडू किंवा भाजी
- सुंठ, वेलची पावडर, जायफळ, साखर घातलेले दूध
- भाजून घेतलेल्या वरईच्या तांदळाचे पदार्थ
- या हंगामात नैसर्गिकरित्या उपलब्ध असणारी फळे
- काळे मनुके, खजूर, अंजीर
- ताजे व धने जिरे सैंधव घातलेले ताक
उपवासात काय टाळावे
- तेलकट व पचायला जड पदार्थ
- बटाटा, रताळे यांसारखी कंदमुळे
- साबुदाण्याचे आणि तळलेले पदार्थ
- अतिपरिश्रम टाळावेत
- हंगामा व्यतिरिक्त येणारी आंबट फळे उदा. आंबा

श्रावणात ऊन-पावसाचा खेळ सुरू असतो. या हवामानामुळे पचनशक्ती आणि रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली असते. त्यामुळेच या महिन्यात पौष्टिक खाणे आवश्‍यक आहे. श्रावणात व्रतवैकल्यानिमित्त अनेक उपवास केले जातात. त्यावेळी जड पदार्थांचे सेवन टाळावे. पचायला हलके तसेच रोगप्रतिकारक क्षमता वाढविणारे अन्न सेवन करावे. प्रकृती जपण्याचा हा महिना आहे.
- वैद्य नीलेश लोंढे, आयुर्वेदाचार्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com