प्रेमात फसवणूक, अनैतिकतेतून अत्याचार

प्रेमात फसवणूक, अनैतिकतेतून अत्याचार

Published on

मंगेश पांडे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २८ : प्रेम दाखवून भविष्याची स्वप्ने रंगवली जातात. लग्नाचे आमिष दाखवले जाते. मात्र, नंतर नकार दिल्याने प्रकरण बलात्काराची तक्रार देण्यापर्यंत प्रकरण जाते. यामध्ये समोरील व्यक्तीच्या बदललेल्या नीतिमत्तेमुळे तिची फसवणूक होते. विशेष म्हणजे, यात तरुणींसह विवाहिताही नराधमांच्या जाळ्यात अडकण्याचे प्रमाण अधिक आहे. पोलिस आयुक्तालय हद्दीत गेल्या सहा महिन्यांत अशा सुमारे १२७ प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. यातील बहुतांश प्रकरणे बहुतांश लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याच्या आहेत.

तरुणी, विवाहित महिला एखाद्याच्या प्रेमात पडतात. मात्र, पुढे काय होईल याचे त्यांना गांभीर्य नसते. जोडीदार चांगला मिळाल्यास सर्व ठीक होते. मात्र, तसे सर्वांच्याच बाबतीत घडेल याची खात्री नाही. आधी जवळीक साधली जाते. मात्र, लग्नाचा मुद्दा समोर येताच नकार देत वाद घातला जातो. अशातच तिच्यासोबतचे जुने फोटो, व्हिडिओ दाखवून धमकाविण्याचे प्रकार घडतात. यातून तिच्या जिवाला धोका निर्माण होतो.
‘‘स्त्रीने कोणत्याही नात्यात प्रवेश करताना भावनिक, मानसिक आणि शारीरिक पातळीवर स्वतःच्या मूल्यांचे भान ठेवणे फार आवश्यक आहे. स्त्रीने नात्यांची निवड ही ‘प्रेमाच्या अंधविश्वासाने’ नव्हे तर ‘स्वतःच्या आत्ममूल्याच्या जाणिवेने’ करावी,’’ असे समुपदेशिका वंदना मांढरे यांनी सांगितले.

कारणे
आत्यंतिक विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती
अचानक बाहेरच्या व्यक्तींशी संबंध येणे
प्रेम, आधार, कौतुक या भावना जर घर-जोडीदार किंवा समाजाकडून मिळत नसतील, तर स्त्री भावनिकदृष्ट्या दुर्बल होते आणि चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्याची शक्यता
घरात किंवा नातेसंबंधात संवाद नसणे, मानसिक दुरावलेपण, व्यावसायिक ताणतणाव
सोशल मीडियावरचे संबंध व डिजिटल फसवणूक
स्वतःच्या शरीर, अधिकार आणि भावनांची योग्य जाणीव नसणे

परिणाम
मानसिक आघात
कुटुंबीयांशी दुरावा
सामाजिक बदनामीची भीती
गर्भधारणा किंवा शारीरिक आजार
प्रेमाच्या नावाखाली शारीरिक संबंध आणि मग गप्प राहा म्हणत ‘ब्लॅकमेलिंग’
कुमारी/विवाहित/विधवा यांची कार्यशक्ती, त्यांच्यातील कौशल्ये, कर्तबगारी, कुटुंब, नाती, अशा नराधमांमुळे उद्ध्वस्त
कौटुंबिक व सामाजिक वातावरण दूषित

उपाय
स्वतःची भावनिक गरज समजून घेणे आणि ती पूर्ण करण्यासाठी योग्य माध्यम निवडणे
कोणत्याही नात्याचा ‘टाइम टेस्ट’ घ्यायला शिका
भावनिक गुंतवणूक न करता त्या व्यक्तीची पारख करणे आवश्यक
शरीर, भावना आणि अधिकार याबाबत शाळा-कॉलेज पातळीवर समुपदेशन आणि जागरूकता मोहीम राबवणे
‘नाही’ म्हणण्याचा आत्मविश्वास तयार करणे आणि फसवणुकीस तोंड देण्यासाठी वैयक्तिक बळ वाढवणे गरजेचे
घरात सकारात्मक संवाद ठेवणे
विवाहित/ विधवा यांनी माहेर, सासर यांच्याशी अशा गोष्टींबद्दल बोलणे
नकार देता आला पाहिजे, हे बळ अंगी बाळगा

कोणाच्याही शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवण्याआधी त्याच्या कृतीकडे बघणे. आपल्या आयुष्यात त्याचा सहभाग किती खरा आहे, हे तपासणे गरजेचे आहे. कोणी खरोखर लग्न करू इच्छित असेल तर ते वेळ घेऊन, स्पष्टपणे, घरच्यांना
सामावून हे नाते पुढे नेतात. केवळ गोड बोलणे, भेटी आणि ‘स्वतः च्या पद्धतीने लग्न मानणे’, यावर भर असेल, तर सावध राहायला हवे.
- प्रदीप सातपुते, समुपदेशक.

जानेवारी ते जूनदरम्यान घटना
जानेवारी : १५
फेब्रुवारी : १४
मार्च : २२
एप्रिल : २८
मे : २४
जून : २४

एकूण : १२७

Marathi News Esakal
www.esakal.com