पीएमपी आगारासाठी एमआयडीसीत जागा द्या

पीएमपी आगारासाठी एमआयडीसीत जागा द्या

Published on

अविनाश ढगे ः सकाळ वृत्तसेवा

पिंपरी, ता. २४ ः चाकण, तळेगाव, रांजणगाव आणि भोसरी औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरात दररोज पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) बस सेवा दिली जाते. मात्र, एमआयडीसी परिसरातून बस सोडण्यासाठी आणि बस उभ्या करण्यासाठी जागा नाही. परिणामी, बस संचलनासाठी अडचणी येत असल्याने पीएमपीएमएल प्रशासनाने एमआयडीसी प्रशासनाकडे चाकण आणि रांजणगाव एमआयडीसी परिसरात जागेची मागणी केली आहे.
पिंपरी चिंचवडमधील भोसरीमध्ये तर चाकण येथे एमआयडीसी क्षेत्र विकसित झाले आहे. चाकण एमआयडीसी परिसर ६०७ एकरांवर; तर भोसरी एमआयडीसी परिसर ३ हजार ५०० एकर एवढ्या मोठ्या क्षेत्रफळामध्ये विस्तारलेला आहे. या परिसरामध्ये आठ हजारांहून अधिक भूखंडधारक असून बहुउद्देशीय कंपन्यांना सुटे भाग पुरविणारे पाच हजारांहून अधिक लघुउद्योग आहेत. तसेच महिंद्रा, स्कोडा, व्हेल्स वॅगन यासारख्या विविध वाहन बनविणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. एमआयडीसी आणि लगतच्या परिसरात लाखो कामगार काम करतात.

काय आहे स्थिती ?
- चाकण एमआयडीसी परिसरासाठी दररोज सुमारे ८१ बस सुटतात
- रांजणगाव एमआयडीसी परिसरात ४० बसच्या माध्यमातून सेवा
- दररोज सुमारे ४० ते ४५ हजार प्रवासी प्रवास करतात.
- प्रवाशांच्या तुलनेत बससंख्या अत्यंत तोकडी
- स्वतःची वाहने किंवा रिक्षा, ओला, उबेरचा आधार घेणे भाग

आगाराचा अभाव
प्रवाशांची मागणी लक्षात घेता पीएमपीएमएलकडून एमआयडीसी परिसरात आणखी बस संख्या आणि फेऱ्या वाढविण्याचे नियोजन आहे. पण, बस संचलन करण्यासाठी एमआयडीसी परिसरात आगारच नाही. परिणामी, बससेवा सुरू करण्यासाठी प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या बसही एमआयडीसी परिसरालगतच्या निगडी, भोसरी, पिंपरी, पुणे मनपा आणि वाघोली या आगारांमधून सोडाव्या लागत आहेत.

‘डेड’ किलोमीटरमध्ये वाढ
सध्याच्या बस आगारांचे एमआयडीसीपासून अंतर दूर असल्याने बस संचलन करताना अडचणी येत आहे. तसेच डेड (उपयुक्त नसलेले) किलोमीटर वाढत आहे. त्यामुळे पीएमपीएमएलचा आर्थिक तोटा वाढत आहे. या सर्व बाबींचा विचार करता पीएमपीएमएलच्या तत्कालीन अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनी चाकण एमआयडीसी परिसराची पाहणी केली होती. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाचा नव्याने कार्यभार स्वीकारल्यानंतर पंकज देवरे यांनी एमआयडीसी परिसरातील जागेबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. प्रशासनाने आता एमआयडीसी प्रशासनाबरोबर पत्रव्यवहार करुन जागेची मागणी करण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे.

चाकण आणि रांजणगाव एमआयडीसी परिसरात पीएमपीएमएलला जागा देण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. एमआयडीसी परिसरात जागा उपलब्ध झाल्यास बस संचलन करण्यास आणि भविष्यात बस संख्या आणखी वाढविण्यास मदत होईल. एमआयडीसी परिसरातील कामगारांसह सर्वांना याचा नक्कीच फायदा होईल.
- पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

पीएमपीएमएलने आम्हाला पत्र पाठविले आहे. पण, याबाबत ‘डीपीआर’ किंवा ठराव पाठविलेला नाही. तो जर मिळाला; तर वरिष्ठांकडे पाठवून त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल.
- संतोष भिसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी

एमआयडीसी परिसरात धावणाऱ्या बस
एकूण बस - १२१
एकूण फेऱ्या - ४१०
अंदाजे प्रवासी संख्या - ४० ते ४५ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com