मोबाइलचे व्यसन, अपघाताला निमंत्रण
अविनाश ढगे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २६ : वाहन चालविताना मोबाइलवर बोलण्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत. यामध्ये काही जण जखमी होत आहेत. तर, काहींनी जीवदेखील गमावला आहे. मात्र, अजूनही काही महाभाग वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, रील्स तयार करणे, चित्रपट पाहताना दिसून येत आहेत. अशा नऊ हजार ३४४ जणांवर कारवाई केली आहे. पण, या माध्यमातून वाहतूक नियम मोडून अपघाताला निमंत्रण देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
शहरात दररोज सरासरी दोन जणांचा अपघातात मृत्यू होत आहे. बहुतांश अपघात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे होत आहेत. काही वेळा वाहतूक पोलिस दुचाकी, चारचाकी, मालवाहतूक वाहनचालकांवर कारवाई करतात. मात्र, तरीही रस्त्यावर वाहन चालवताना स्टंट करणं, मद्यपान करून वाहन चालवणं, रेसिंग यासारखे प्रकार घडताना दिसतात. सोशल मीडियामुळे या गोष्टींचं प्रमाण निश्चितच वाढले आहे. वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, रील तयार करणे गुन्हा असला, तरी अनेकजण अजूनही असे प्रकार करताना आढळून येत आहेत.
कायदा काय सांगतो ?
१. वाहन चालवताना मोबाइलवर बोलताना आढळल्यास मोटार वाहन अधिनियम २५० (अ) नुसार संबधित वाहनधारकास किमान हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे.
२. मोटर वाहन अधिनियम १८४ नुसार वाहन वेगाने तसेच निष्काळजीपणे चालविणाऱ्यास दोन हजार रुपये दंड आकारला जातो.
३. भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १२५ अन्वये निष्काळजीपणे तसे वाहतूक नियमांचा भंग करुन वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येते.
सुमारे दीड कोटीचा दंड वसूल
वाहन चालवताना मोबाइलवर बोणाऱ्या वाहनचालकांवर ९ हजार ३४४ वाहन चालकांवर एक जानेवारी ते ३० जून दरम्यान वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये तब्बल एक कोटी ४३ लाख ३१ हजार रुपयांचा दंड वसूल केला. यात सर्वाधिक दंड कार आणि दुचाकीचालकांवर आकारण्यात आला आहे.
रील्सच्या नादात अपघात
सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याचे काही जणांना व्यसनच लागले आहे. रील्स तयार करून सोशल मीडियावर अपलोड केले जातात. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाइक्स मिळावेत, यासाठी या मंडळांची कोणत्याही थराला जाण्याची तयारी असते. बऱ्याच वेळा रील तयार करताना समोरुन येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे मोठे अपघात घडल्याची प्रकरणे समोर आली आहेत. अशा प्रकरणांमध्येही वाहतूक पोलिसांकडून विविध कलमांतर्गत कारवाई केली जात आहे.
वाहन चालवताना मोबाइलचा वापरू नये. बऱ्याच अपघातांवेळी वाहनचालक मोबाइलवर बोलत असल्याचे आढळून आले आहे. आपल्या एका चुकीमुळे कुटुंबातील सदस्यांसह आणि इतरांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे वाहनचालकांनी सुरक्षित वाहन चालवावे.
- विवेक पाटील, वाहतूक पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड
-----------
मोबाइलवर बोलत वाहन चालविल्यास दंड किती?
पहिल्यांदा : दुसऱ्यांदा : तिसऱ्यांदा
दुचाकी चालक - १,००० : १०,००० : कोर्टात केस
तीनचाकी चालक - १,००० : १०,००० : कोर्टात केस
मोटरकार चालक - २,००० : १०,००० : कोर्टात केस
अवजड वाहनचालक - ४,००० : १०,००० : कोर्टात केस
फोटो - ३२६६७, ३२६६८