गुंतवणुकीवर चांगला नफ्याचे आमिष; एक कोटी सात लाखांची फसवणूक
पिंपरी : गुंतवणुकीवर चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची १ कोटी ७ लाख ३७ हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी वाकड येथील एका व्यक्तीने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शेरॉन त्रिवेदी आणि मेहुल गोयल तसेच नऊ बँक खातेधारक व ॲप्लिकेशनधारक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादींना आरोपी शेरॉन याने एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड केले. त्या ग्रुपवर एक लिंक पाठवून त्याद्वारे फिर्यादींना एक बनावट शेअर मार्केट ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. व्हॉट्सअप ग्रुपचे ॲडमिन आरोपी शेरॉन आणि मेहुल यांनी त्या ॲपद्वारे गुंतवणूक केल्यास चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून शेअर ट्रेडिंगकरिता वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. एकूण ४ कोटी इतका आभासी परतावा आरोपींनी फिर्यादीला दाखवला. तसेच फिर्यादींना त्यांची रक्कम काढण्यासाठी वेगवेगळे सर्व्हिस चार्ज, सर्व्हिस टॅक्स भरण्यास सांगितले. यामध्ये आरोपींनी एकूण १ कोटी ७ लाख ३७ हजार ८८५ रुपये रक्कम भरण्यास भाग पाडून ते पैसे परत न देता त्यांची फसवणूक केली.
तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
पिंपरी : तडीपार केलेले असतानाही हद्दीत आलेल्या गुंडाला पोलिसांनी कोयत्यासह अटक केली. ही कारवाई निगडी येथे करण्यात आली. आदित्य उर्फ भाव्या किशोर बावीस्कर (वय २३, रा. राहुलनगर, ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी आदित्य याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २१ सप्टेंबर २०२३ रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. तरीही तो कुठलीही परवानगी न घेता शहरात आला. त्याने स्वतःकडे कोयता बाळगला. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करून त्याला अटक केली.
जुगारप्रकरणी पाच जणांवर गुन्हा
पिंपरी : जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई चिखली येथील कृष्णानगर चौकाजवळ पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने केली. नाना मरिभाऊ मरगुंड (वय ४९), कुमार मारुती थोरात (वय ३५), शहाजी विठ्ठल वाघमारे (वय ४८), गणेश सोमनाथ आडसुळ (वय ३६) आणि भगवान यशवंत पवार (वय २८, सर्व रा. साने चौकाजवळ चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी एक हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेत अभियंत्याचा मृत्यू
पिंपरी : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका स्थापत्य अभियंत्याचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई-बंगळूर महामार्गावर पुनावळे येथे घडली. सतीश चंद्रशेखर निघोजकर (वय ४३, रा. तळेगाव दाभाडे, मावळ) असे या अपघातात मृत्यू झालेल्या स्थापत्य अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी उदय मधुसूदन देशमुख (रा. घोडबंदर रोड, मुंबई) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांचे मेहुणे सतीश निघोजकर हे कामावरून सुटल्यानंतर त्यांच्या गाडीवरून पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होते. दरम्यान, पुनावळे येथे पवना नदी पुलावर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने सतीश निघोजकर यांचा मृत्यू झाला.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.