तांत्रिक बिघाडाचा शिधापत्रिकाधारकांना फटका
प्रदीप लोखंडे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २८ : सार्वजनिक वितरण प्रणालीच्या अंतर्गत रास्त धान्य दुकानात धान्य घेण्यासाठी ‘केवायसी’ प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र ‘सर्व्हर’ सतत ‘डाऊन’ असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
राज्य सरकारने शिधापत्रिकाधारकांची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी ‘केवायसी’ प्रक्रिया आवश्यक केली आहे. याअंतर्गत लाभार्थ्यांना आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, बायोमेट्रिक पडताळणी यांची नोंद करणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेमुळे अपात्र लाभार्थ्यांना वगळता येते. वितरण यंत्रणाही पारदर्शक राहते.
महापालिका क्षेत्रातील पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीन विभागांतून शासकीय धान्य वितरण कार्यालयांतर्गत ‘केवायसी’चे असंख्य अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी काही मंजूर झाले असले, तरी लाखो अर्ज अद्यापही प्रलंबित आहेत. हजारो अर्ज विविध कारणांमुळे रद्द करण्यात आले आहेत.
या अर्जांवर कार्यवाही करण्यात ‘सर्व्हर’मधील बिघाड हे मुख्य कारण असल्याचे विभागीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पडताळणी पूर्ण होत नसल्याने नागरिकांना लोकांना पुन्हा रांगेत उभे राहावे लागते. त्यात त्यांचा वेळ वाया जातो, आणि अनावश्यक त्रास सहन करावा लागतो. विशेषतः वयोवृद्ध, अपंग, आणि महिलांना याचा मोठा फटका बसतो आहे.
‘केवायसी’ पूर्ण झाले नाही तर दर महिन्याला धान्य मिळणार नाही, अशी भीती अनेकांना आहे. अनेक जणांची प्रक्रिया पूर्ण होऊनही ‘रद्द’ झाल्याचे संदेश येत आहेत. त्यामुळे नागरिक संभ्रमात आहेत. त्यातून कार्यालयांमध्ये तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. ‘केवायसी’ प्रक्रियेसाठी अधिक तांत्रिक सहकार्य मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. काही ठिकाणी फिरते वाहन तसेच विशेष शिबिर आयोजित करून ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्णत्वास नेली जाते. तसेच, सर्व्हर क्षमता वाढविण्याबाबत संबंधित विभागांशी संपर्क केला जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
---
कार्यालयनिहाय अर्जांची आकडेवारी
कार्यालय ः मंजूर झालेले ः रद्द झालेले ः प्रलंबित
चिंचवड ः ९५,८७६ ः ३२४ ः ४०,८९३
भोसरी ः १,११,८३८ ः ८७९७ ः २४,०६९
पिंपरी ः ७५७०३ ः १७३८ ः ४२,७५२
---
‘केवायसी’ मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले आहे. सध्या ‘सर्व्हर’ ‘डाऊन’ असल्यामुळे अर्ज मंजूर करण्याचे राहिले असेल. मात्र त्या अर्जांवरील कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. या कामाला गती मिळाली आहे.
- विजयकुमार क्षीरसागर, परिमंडळ अधिकारी, चिंचवड
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.