सिटी सर्व्हे कार्डसाठी नागरिकांचे हेलपाटे
प्रदीप लोखंडे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २८ : शहरातील अनेक नागरिक सिटी सर्वे कार्डसाठी (मालमत्ता पत्र) सरकारी कार्यालयांचे फेरे मारत आहेत. शहरी भाग असूनही काही भागात सातबारा उतारा लागू होत नाही, तर सिटी सर्व्हे कार्ड मिळविण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया नागरिकांना स्पष्टपणे समजत नाही. अनावश्यक कागदपत्रांची मागणी केली जात असल्याची तक्रार आकुर्डीतील एका नागरिकाने केली. महसूल विभाग, भूमी अभिलेख कार्यालय आणि महापालिका यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे नागरिक संभ्रमात सापडले आहेत. एका अधिकृत मालमत्तेच्या पुराव्यासाठी सामान्य नागरिकांची होत असलेली हेळसांड थांबण्याचे नाव घेत नाही. तर ऑनलाईन पद्धतीने कार्ड मिळविण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे अधिकारी सांगत आहेत.
पिंपरी-चिंचवड महानगर क्षेत्रामधील काही भागांमध्ये नागरिकांना मालमत्तेचा अधिकृत पुरावा म्हणून सिटी सर्व्हे कार्ड दिले जाते. हे कार्ड म्हणजे मालमत्तेच्या मालकीचे दस्तऐवज असून, त्यात त्या भूखंडाची माहिती, सीमारेषा, क्षेत्रफळ, धारकाचे नाव आणि इतर तपशील असतात. मात्र, सध्या अनेक भागांतील नागरिकांना हे कार्ड मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सिटी सर्व्हे कार्ड, ज्याला ‘प्रॉपर्टी कार्ड’ असेही म्हणतात, हे शहरी भागातील जमिनीच्या मालकीचे प्रमाणपत्र आहे. ग्रामीण भागात जिथे सातबारा उतारा (७/१२) लागू होतो, तिथे शहरी भागात सिटी सर्व्हे कार्ड हे अधिकृत दस्तऐवज मानले जाते.
पिंपरी-चिंचवडमधील काही नागरिकांनी महापालिकेची हद्द असतानाही आपली मालमत्ता ग्रामीण दाखवली गेल्यामुळे सात बारा उतारा मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, महसूल अधिकाऱ्यांकडून त्यांना सांगण्यात आले की, ‘तुमची मालमत्ता शहरी हद्दीत येते, त्यामुळे सात बारा लागू होत नाही. तुम्हाला सिटी सर्व्हे कार्ड घ्यावे लागेल. त्यानंतर नागरिक सिटी सर्व्हे कार्ड मिळवण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे गेले. परंतु तिथेही त्यांना वेगळी माहिती देण्यात येत आहे. कार्ड लवकर उपलब्ध होत नाही. परिणामी नागरिकांना वारंवार या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे.’
शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर कार्ड प्राप्त होत आहे. सातबारा देखील आता ऑनलाईन प्राप्त होत आहे. त्यामुळे ते मिळण्यात अडचणी येत नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. तरीही अडचणी आल्या तर कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन अधिकारी करत आहेत.
या उपाययोजना हव्यात
- सिटी सर्व्हे कार्ड आणि सातबाराची माहिती एकाच ठिकाणी मिळावी
- नागरिकांसाठी सोपा पोर्टल, जिथे ते आपल्या मालमत्तेची स्थिती, दस्तऐवज व प्रगती तपासू शकतील
- स्थानिक नगरसेवक, आमदारांनी नागरिकांसाठी माहिती सत्रांचे आयोजन करावे
- महापालिका आणि भूमी अभिलेख विभागाने संयुक्तरीत्या सिटी सर्व्हे कार्डसाठी शिबिर घ्यावे
- कोठे काय करावे लागेल, यासाठी माहिती फलक, हेल्पलाइन नंबर आणि मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध करावीत
या भागासाठी सर्व्हे कार्ड मिळते
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील काही भागातील सर्व्हे नंबरसाठी हे कार्ड प्राप्त होत आहे. यामध्ये पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, भोसरी, रहाटणी, वाकड, सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, मोशी, तळवडे, थेरगाव, दापोडी, चिखली, देहू, किवळे, रावेत आदी भागातील सर्व्हे नंबर नगरभूमापन कार्यालयाकडे आहेत. त्यानुसार हे कार्ड दिले जाते.
शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता पत्र प्राप्त होत आहे. त्यासाठी कोणत्याही अडचणी येत नाहीत. तरीही नागरिकांना काही अडचणी आल्यास कार्यालयात संपर्क साधावा. शंकांचे निरसन केले जाईल.
- अमित ननावरे, नगर भूमापन अधिकारी, पिंपरी-चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.