स्तनपानाबाबत दिवसेंदिवस वाढतेय जागरुकता
अश्विनी पवार : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ३१ : आईचे दूध हे नवजात बालकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. ‘‘पहिल्या सहा महिन्यांमध्ये बाळाला आईचे दूधच पाजण्यात यावे,’’ असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. मात्र, काही वर्षांपूर्वी स्तनपानाबाबत महिलांमध्ये उदासीनता असायची. मात्र, आता हे चित्र बदलत असून नवमाता स्तनपानाबाबत जागरूक होत आहेत. हे स्वागतार्ह असले, तरी स्तनदा मातांसाठी आवश्यक सुविधा सार्वजनिक ठिकाणी व कार्यालयात असणेही गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने एक ते आठ ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. परिणामी, गेल्या काही वर्षांपासून मध्यमवर्गीय तरुण मातांमध्ये स्तपनानाबाबत जागरूकता वाढली आहे. पहिले सहा महिने स्तनपान करण्यासोबतच जास्तीत जास्त स्तनपान कसे करता येईल. ऑफिसला जाताना दूध कसे साठवता येईल, बाळाला पुरेसे दूध मिळण्यासाठी काय करावे लागेल. आहार कसा असावा असे अनेक प्रश्न नवमातांकडून डॉक्टरांना विचारले जात आहेत.
मिल्क बॅंकांची संख्या वाढावी
मागील दशकभरात इंटरनेटसह विविध स्रोतांतून उपलब्ध होणाऱ्या माहितीतून स्तनपानाचे फायदे समजल्याने माता सजग झाल्या आहेत. बाळाला दूध पुरत नसेल, तर वरचे दूध देण्याऐवजी मिल्क बॅंकेचाही पर्याय शोधला जातो. मात्र, पिंपरी चिंचवड शहरात ‘ह्युमन मिल्क बॅंके’ची अगदीच कमतरता आहे. सध्या दुधाची मागणी पाहता शहरातील प्रत्येक प्रभागात एक ‘ह्युमन बॅंक’ असावी, असे मत वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत
‘वायसीएम’मध्ये मिल्क बॅंकची प्रतीक्षा
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गर्भवती प्रसूतीसाठी येतात. या महिलांचे आरोग्य सुदृढ नसल्याने त्यांच्यामध्ये दुधाची कमतरता जाणवते. मात्र, बाळासाठी खासगी मिल्क बॅंकेतून दूध विकत घेणे या मातांसाठी परवडणारे नसते. महापालिका रुग्णालयांत ‘ह्युमन मिल्क बॅंक’ सुरू केल्यास या माता व त्यांच्या शिशुंची गैरसोय दूर होणार आहे. पिंपरीतील ‘वायसीएम’ रुग्णालयात अशी बॅंक सुरू करावी, हा प्रस्तावही रुग्णालयाने महापालिकेकडे पाठवला. मात्र, दोन वर्षांत याबाबत कोणतीही प्रगती झालेली नाही. तर, हा प्रस्ताव सध्या भांडार विभागाकडे असून त्यांनी निविदा प्रक्रिया सुरू केल्याचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले.
‘स्तनपानाचे अनेक फायदे आहेत. जास्त दिवसांपर्यंत स्तनपान केल्याने स्तनांचा कर्करोग होण्याचा धोका कमी होते. जास्त काळ आईचे दूध मिळालेल्या बाळाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. आई व बाळ यांच्यामध्ये उत्तम नाते निर्माण होते. तसेच महिलांमध्ये ‘पोस्टपार्टम डिप्रेशन’ अर्थात प्रसूतिपश्चात नैराश्य येण्याची शक्यता कमी होते. या बाबींचा अभ्यास महिला करत आहेत. त्यामुळे स्तनपानाबाबत जागरूकता निर्माण होत आहे.
- डॉ. शुभांगी चौधरी, स्त्रीरोग तज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.